सारे एकत्र जमूया, पर्यावरण संवर्धन करूया 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 डिसेंबर 2017

पुणे - "भिशी' म्हटली की सर्वसाधारणपणे पैशांची गुंतवणूक हेच समीकरण आपल्या डोळ्यांसमोर येतं; पण याला छेद देत पुण्यात वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी "वृक्ष भिशी'ची नवी संकल्पना रुजू होत आहे. महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनीने हा आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे. 

पुणे - "भिशी' म्हटली की सर्वसाधारणपणे पैशांची गुंतवणूक हेच समीकरण आपल्या डोळ्यांसमोर येतं; पण याला छेद देत पुण्यात वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी "वृक्ष भिशी'ची नवी संकल्पना रुजू होत आहे. महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनीने हा आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे. 

शहरीकरणात बेसुमार वृक्षतोड होत असून, त्यावर तोडगा काढण्यासाठी वृक्ष लागवडीबरोबरच संवर्धनावरही भर द्यायला हवा, या उद्देशाने आणि वृक्ष लागवड व संवर्धनासाठी ही अनोखी चळवळ शहरात उभी राहत आहे. झाडे लावून त्यांच्या संवर्धनासाठी एकत्र जमायचे, शक्‍य तितके पैसे काढायचे आणि त्यातून जमलेल्या भिशीच्या माध्यमातून वृक्षसंवर्धनासाठी उपक्रम राबवायचे, अशी ही संकल्पना असल्याचे संवर्धिनीच्या सदस्या प्रीती एडगावकर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. "वृक्ष भिशी' उपक्रमाबाबत नागरिकांना माहिती होण्यासाठी नुकतीच एक बैठकही आयोजिली होती. 

दररोजच्या कामातून थोडासा विरंगुळा मिळावा, निसर्गाजवळ काही वेळ घालविता यावा आणि हे करताना आपली सामाजिक बांधिलकी जपली जावी, यासाठी "वृक्ष भिशी' सुरू केली आली. संस्थेच्या या उपक्रमाशी सध्या 50 ते 60 वृक्षप्रेमी जोडले गेले आहेत. या उपक्रमाचा विस्तार वाढविण्यासाठी संस्था प्रशिक्षणावर आधारित कार्यशाळा आयोजित करणार आहेत. 

एडगावकर म्हणाल्या, ""वृक्ष भिशीचा उपक्रम सर्वांसाठी खुला असून, सध्या महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक असे वृक्षप्रेमी यात सहभागी होत आहेत. स्वयंस्फूर्तीने काम करणारे यात सहभागी होऊ शकतात. संस्थेतर्फे झाडे लावण्यासाठी रोपे आणि जागा शोधून दिली जाणार आहे. वृक्ष भिशीद्वारे जमणाऱ्या निधीतून रोपे घेणे, रोपे लावण्यासाठी खड्डे खणणे, छोट्या रोपांना पाणी देणे, वृक्षारोपणासाठी साहित्य खरेदी करणे, रोपांची वाढ लक्षात घेऊन खत घालणे, त्याची निगा राखणे अशी कामे केली जाणार आहेत.'' 

"वृक्ष भिशी' सुरू करणे शक्‍य असणारे गट 
- ज्येष्ठ नागरिक संघ 
- शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे ग्रुप 
- एखाद्या कार्यालयातील कर्मचारी 
- मित्र-मैत्रिणींचा ग्रुप 
- महिला मंडळ व बचत गट 
- विविध छोट्या-मोठ्या स्वरूपातील गट

Web Title: pune news tree plantation