विश्वास योगदान आणि जीवनदान

योगिराज प्रभुणे
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

पुणे - रस्त्यावरील अपघातात जेमतेम पंचवीस वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला... त्याला उपचारांसाठी संजीवन रुग्णालयात दाखल केले... त्याचे प्राण वाचविण्याचा शर्थीने प्रयत्न केला; मात्र त्याच्या मेंदूचे कार्य थांबले होते. त्याचे हृदय धडधडत असले, तरीही मेंदूपर्यंत कोणत्याच संवेदना पोचत नव्हत्या. हा तरुण हे जग सोडून गेला असला, तरीही त्याचे अवयव चांगले आहेत. तो निर्व्यसनी होता, तसेच त्याला इतर कोणतेही आजार नव्हते. त्यामुळे याच्या दान केलेल्या अवयवांनी इतर रुग्णांना जीवदान मिळेल, या डॉक्‍टरांच्या आवाहनाला नातेवाइकांनी प्रतिसाद दिला.

पुणे - रस्त्यावरील अपघातात जेमतेम पंचवीस वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला... त्याला उपचारांसाठी संजीवन रुग्णालयात दाखल केले... त्याचे प्राण वाचविण्याचा शर्थीने प्रयत्न केला; मात्र त्याच्या मेंदूचे कार्य थांबले होते. त्याचे हृदय धडधडत असले, तरीही मेंदूपर्यंत कोणत्याच संवेदना पोचत नव्हत्या. हा तरुण हे जग सोडून गेला असला, तरीही त्याचे अवयव चांगले आहेत. तो निर्व्यसनी होता, तसेच त्याला इतर कोणतेही आजार नव्हते. त्यामुळे याच्या दान केलेल्या अवयवांनी इतर रुग्णांना जीवदान मिळेल, या डॉक्‍टरांच्या आवाहनाला नातेवाइकांनी प्रतिसाद दिला. शहरातील छोट्या आणि मध्यम रुग्णालयातील अवयवदानाची ही सुरवात ठरली. 

शहर आणि उपनगरांमध्ये छोट्या आणि मध्यम म्हणजे सुमारे ३० ते १०० खाटांच्या सक्षम रुग्णालयांचे जाळे निर्माण झाले आहे. यापैकी बहुतांश रुग्णालयांमधून डॉक्‍टरांच्या पिढ्यान पिढ्या रुग्णसेवा करीत आहेत. त्यातून रुग्ण आणि डॉक्‍टर यांचे वर्षानुवर्षांचे नाते झाले आहे. रुग्णालयेदेखील आधुनिक काळात अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज होत आहेत. अवयवदानाबाबत येथील डॉक्‍टरांमध्ये जागृती होऊ लागली आहे. डॉक्‍टर अवयवदानाबाबत नातेवाइकांशी विश्वासाने बोलू लागले आहेत. ओळखीचे आणि विश्वासातील डॉक्‍टर ‘ब्रेन डेड’ रुग्णाच्या अवयवदानाचा सल्ला देत असल्याने नातेवाइकांचाही त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, असे निरीक्षण ‘इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर’च्या (आयएससीसीएम) पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. सुभाल दीक्षित यांनी ‘सकाळ’शी बोलताना नोंदविले.

सुविधांचे जाळे विणण्याची गरज
शहरातील छोट्या आणि मध्यम रुग्णालयांकडे अवयवदान किंवा प्रत्यारोपणासाठी आवश्‍यक सरकारी परवानगी नाही, त्यामुळे अवयवदानाबद्दल या रुग्णालयांमध्ये फारसे काम होत नव्हते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून हा दृष्टिकोन बदलला आहे. मात्र, रुग्णावर उपचार करणे, उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्यास मेंदूविकारतज्ज्ञ आणि मेंदू शल्यचिकित्सक यांच्यासह इतर वैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीने ‘ब्रेन डेड’ची खात्री करणे, अवयवदानाबाबत रुग्णांच्या नातेवाइकांना समजावून सांगणे, त्याच वेळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे, अशा असंख्य आघाड्यांवर रुग्णालयातील डॉक्‍टर लढत असतात. त्यातून मार्ग काढण्यासाठी या रुग्णालयांमधून या प्रकारच्या सुविधांचे जाळे निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ऑन कॉल एमएसडब्ल्यू
अवयवदानाच्या चळवळीमध्ये वैद्यकीय समाज सेवकाची (एमएसडब्ल्यू) भूमिका महत्त्वाची आहे. ब्रेन डेड रुग्णांच्या नातेवाइकांना दिलासा देणे, त्यांना अवयवदानाचे महत्त्व सांगणे आणि प्रत्यक्ष अवयवदान होईपर्यंतची कायदेशीर प्रक्रिया अचूकपणे पूर्ण करण्यासाठी ‘एमएसडब्ल्यू’ आवश्‍यक असतो. छोट्या रुग्णालयांमध्ये पूर्णवेळ अशा प्रकारे ‘एमएसडब्ल्यू’ नियुक्त करणे शक्‍य होत नाही, त्यामुळे ऑन कॉल एमएसडब्ल्यूची संकल्पना पुढे आली आहे. 

अवयवदान चळवळीबाबत शहरात सकारात्मक जनजागृती
विश्वासातील डॉक्‍टर ‘ब्रेन डेड’ रुग्णाच्या अवयवदानाचा सल्ला देत असल्याने नातेवाइकांचाही त्याला सकारात्मक प्रतिसाद

रुग्णालयेदेखील आधुनिक काळात अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज

शहर, उपनगरांमध्ये ३० ते १०० खाटांच्या सक्षम रुग्णालयांचे जाळे

‘डॉक्‍टरांवरील विश्वास’ याच मोठ्या भांडवलाच्या आधारावर छोट्या रुग्णालयांमधून ‘ब्रेन डेड’ रुग्णांचे नातेवाईक अवयवदानासाठी पुढे येत आहेत. अवयवदान चळवळीची व्याप्ती वाढण्यासाठी पोषक वातावरण शहरात निर्माण होत आहे, असा विश्वास वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. 

आतापर्यंत मोठ्या रुग्णालयांपर्यंत मर्यादित असणाऱ्या अवयवदानाच्या चळवळीला छोट्या रुग्णालयांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. पुण्यात हा अभिनव प्रयोग सुरू आहे. त्यामुळे पुणे हे त्यासाठी एक आदर्श शहर ठरले आहे.
- डॉ. सुभाल दीक्षित

 

Web Title: pune news Trust contribution and life-giving