मंगलमय वातावरणात रंगला तुलसी विवाह

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

पुणे - ‘स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं...’, ‘शुभमंगल सावधान...’ मंगलाष्टकांचे कानांवर पडणारे स्वर... येणाऱ्या पाहुण्यांना अक्षदा वाटण्यात व्यग्र मंडळी... अन्‌ ‘राधाकृष्ण, गोपाल कृष्ण’चा घोष... लग्न लागताच आलेल्या वऱ्हाडी मंडळींना भरविण्यात आलेला पेढा... अशा वातावरणात बॅंडच्या सुरावटीत कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाहसोहळा साजरा झाला.

बुधवार पेठेतील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि महात्मा फुले मंडई येथील साखरे महाराज मठ-मंदिर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे तुलसी विवाह समारंभ आयोजिला होता. ट्रस्टच्या मंदिरापासून बॅंडच्या सुरावटीत निघालेल्या वरातीद्वारे बाळकृष्णाची मूर्ती आणि तुलसी वृंदावन मठापर्यंत आणण्यात आले. वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी उत्सुक असलेली वऱ्हाडी मंडळी मात्र या विवाह सोहळ्यानंतर देवाच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाली. सर्वांना उत्तम आरोग्य, सुख, समाधान लाभो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. 

ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष सुनील रासने, मठाचे प्रमुख विश्‍वस्त विनायक मोडक, राजाभाऊ घोडके, उल्हास भट, बाळासाहेब सातपुते, संगीता रासने उपस्थित होते.  

ट्रस्टच्या श्रींच्या मंदिरात श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीत फुगड्या घालत फेर धरून महिलांनी मोठया संख्येने सहभाग घेतला. प्रभात व दरबार ब्रास बॅंडने विवाहसोहळ्यानिमित्त आपली सेवा अर्पण केली. रांगोळीच्या पायघड्यांनी मिरवणूक मार्ग सुशोभित करण्यात आला होता. रासने म्हणाले, ‘‘गणपती मंदिरात महिनाभर सुरू असलेल्या काकड आरतीचा समारोप विवाह सोहळ्याने होतो. सोहळ्यात महिलाही उत्साहाने सहभागी होतात.’’ मोडक म्हणाले, ‘‘मठात अनेक वर्षांपासून तुलसी विवाहाची परंपरा आहे. हा सोहळा मांगल्याचे प्रतीक आहे. सर्व समाजाचे नागरिक उत्साहाने सहभागी होतात.’’

Web Title: pune news tulsi vivah