'गुरुमुखी विद्येला दुसरा पर्याय नाही'

'गुरुमुखी विद्येला दुसरा पर्याय नाही'

पुणे - ""यु-ट्यूब, व्हॉट्‌सऍप, फेसबुक अशा वेगवेगळ्या माध्यमातून सध्या शास्त्रीय संगीत शिकवले जात असले तरी ही नवी माध्यमे गुरुमुखी विद्येला पर्याय ठरू शकणार नाहीत आणि तुम्हाला चांगला कलाकार तर कधीच बनवू शकणार नाहीत'', असे स्पष्ट मत ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांनी व्यक्त केले. गुरूकडे आठ-दहा वर्षे राहून संगीत शिकलात तर थोडेफार जमेल, असेही ते म्हणाले. 

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात मोलाचे योगदान देणाऱ्या कलावंतास मध्य प्रदेश सरकारतर्फे "तानसेन सन्मान' दिला जातो. शास्त्रीय संगीतात मानाचा समजला जाणारा हा सन्मान ग्वाल्हेर-आग्रा-जयपूर घराण्याच्या गायकीत प्रभुत्व असलेले डॉ. कशाळकर यांना बुधवारी जाहीर झाला. गुरुकुल पद्धतीने विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देण्यासाठी डॉ. कशाळकर सध्या बांगलादेशात आहेत. तेथेच त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी कळली आणि तिथूनच त्यांनी "सकाळ'शी संवादही साधला. 

पं. कशाळकर म्हणाले, ""नवी पिढी मोठ्या उत्सुकतेने शास्त्रीय संगीताकडे वळत आहे. संगीत शिकू पाहत आहे. संगीत समजून घेत आहे. त्यामुळे शास्त्रीय संगीताच्या भविष्याबाबत चिंता करण्याची अजिबात गरज नाही. मी तर आशावादी आहे. अनेक चांगले-चांगले कलाकार तयार होताना दिसत आहेत; पण हल्ली नवनवीन माध्यमे आली आहेत. या माध्यमातून संगीत शिकणे हे एकतर्फी शिकण्यासारखे होईल. तुम्ही शिकत आहात, ते योग्य आहे की नाही? हे कसे कळणार. त्यासाठी गुरूच समोर असावा लागतो. गुरूपुढे ही नवी साधने कमी महत्त्वाची आहेत.'' 

माझा जन्म नागपूरचा. तेथेच संगीताचे सुरवातीचे शिक्षण ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा वारसा लाभलेल्या वडिलांकडून मिळाले. पुढील काळात पं. राम मराठे यांच्याकडून आग्रा घराण्याची आणि गजाननबुवा जोशींकडून ग्वाल्हेर घराण्याची तालीम मिळाली. संगीतात झालेले हे माझे मोठ्ठे शिक्षण, असे मी मानतो. असे नामवंत गुरू वेगवेगळ्या टप्प्यावर मिळाले आणि गाणे फुलत गेले. कोलकत्यात गेल्या 25 वर्षांपासून मुलांना गुरुकुल पद्धतीने संगीत शिकवत आहे. त्यासाठी इतकी वर्षे कोलकत्यात राहावे लागले; पण आता पुण्यात आलो आहे. तसा मी मूळचा पुणेकरच आहे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. 

"तानसेन सन्मान' हा महत्त्वाचा सन्मान आहे. तो मी माझ्या गुरूंना अर्पण करतो. त्यांनी माझ्यावर मेहनत घेतली. त्या मेहनतीचे हे फळ आहे. याच्या सोबतीलाच असंख्य श्रोत्यांचे प्रेमही आहे.'' 
- पं. उल्हास कशाळकर, ज्येष्ठ गायक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com