विद्यापीठाचे मुद्रणालय बंद पाडण्याचा घाट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने टेंडरवर डोळा ठेवत उत्तरपत्रिकांच्या पुरवणी छापाईचे काम विद्यापीठबाह्य मुद्रणालयाकडून करून घेण्याचा प्रयत्न विद्यापीठाच्या मुद्रणालय विभागानेच हाणून पाडला. आता विद्यापीठातील प्रत्येक विभागाला छपाईचे काम विद्यापीठातच करून घ्यावे लागणार आहे.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने टेंडरवर डोळा ठेवत उत्तरपत्रिकांच्या पुरवणी छापाईचे काम विद्यापीठबाह्य मुद्रणालयाकडून करून घेण्याचा प्रयत्न विद्यापीठाच्या मुद्रणालय विभागानेच हाणून पाडला. आता विद्यापीठातील प्रत्येक विभागाला छपाईचे काम विद्यापीठातच करून घ्यावे लागणार आहे.

सध्या विद्यापीठाकडून एक कोटी उत्तरपत्रिकांची छपाई विद्यापीठबाह्य मुद्रणालयाकडून करून घेतली जाते. मात्र, पुरवणी उत्तरपत्रिका, प्रात्यक्षिक उत्तरपत्रिका, विज्ञान आणि वाणिज्य विभागासाठी आवश्‍यक असलेला सेंटिमीटर ग्राफ आदी कामेच छापखान्यात केली जातात. यातील पुरवणी उत्तरपत्रिकांचे काम देखील परीक्षा विभागाकडे ओढून घेण्याचा प्रयत्न चालविला होता. यामुळे विद्यापीठाच्या मुद्रणालयाचे 40 लाख पुरवणी उत्तरपत्रिका छपाईचे मोठे काम बंद होणार होते. तसेच, कर्मचाऱ्यांना बसून राहावे लागणार होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

परीक्षा विभागाने पुरवणी उत्तरपत्रिका छपाईचे काम बाहेरून करून घेण्याबाबत प्रयत्न सुरू केल्याने छापखाना बंद होणार असल्याची चर्चा विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरू झाली. त्यानंतर मुद्रणालय विभागाने छपाईचे काम बाहेरून करून घेण्यास विरोध दर्शविला. विद्यापीठाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे देखील याविषयी बाजू मांडली. त्यामुळे पुरवणी उत्तरपत्रिकांचे काम या विभागाकडे कायम राहिले आहे. या विभागाचे प्रमुख डॉ. दत्तात्रेय कुटे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी या प्रकाराबद्दल बोलण्याचे टाळले. परंतु पुरवणी उत्तरपत्रिकांची छपाई करण्याचे आदेश विद्यापीठाकडून आम्हाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठातील छपाईचे काम छापखान्यातच करावे, अशी भूमिका या विभागाने घेतल्याने विद्यापीठाच्या कुलसचिवांनी त्यासंबंधीचे परिपत्रक सर्व विभागांसाठी जारी केले आहे. त्यात म्हटले आहे, की "विद्यापीठाची छपाईची कामे विद्यापीठ मुद्रणालयामार्फत झाल्यास ती कमी दरात, कमी वेळेत होतील. विद्यापीठाचा खर्च वाचण्यासही यामुळे मदत होईल. गोपनीय कामांबाबत हा निकष विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार कायम राहील.'

Web Title: pune news The university's printing press was closed