एव्हरी डे इज व्हॅलेंटाइन डे फॉर अस...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

‘फर्ग्युसन’मधील तरुणाईशी सौरभ गोखले, रूपाली कृष्णरावचा संवाद
पुणे - प्रेमाचे ‘ते’ दिवस, मनात फुललेल्या ‘त्या’ भावना, ‘ती’ अन्‌ ‘त्या’च्या बद्दलचे आकर्षण आणि आकर्षणातून झालेली मैत्री... मैत्रीतून जुळले आमचे नाते.... ‘बट एव्हरी डे इज व्हॅलेंन्टाइन डे फॉर अस’. ‘वुई आर एन्जॉइंग अवर लाइफ ऑलवेज’.... अभिनेता सौरभ गोखले आणि अभिनेत्री रूपाली कृष्णराव यांच्यासोबत फर्ग्युसन महाविद्यालयातील तरुण-तरुणी उत्स्फूर्तपणे मनातले प्रेम व्यक्त करत होते. प्रेम व्यक्त करता-करता ‘व्हॅलेंटाइन डे’चा आनंद घेत सेल्फीतून ‘तारुण्याची आठवण’ टिपत होते. 

‘फर्ग्युसन’मधील तरुणाईशी सौरभ गोखले, रूपाली कृष्णरावचा संवाद
पुणे - प्रेमाचे ‘ते’ दिवस, मनात फुललेल्या ‘त्या’ भावना, ‘ती’ अन्‌ ‘त्या’च्या बद्दलचे आकर्षण आणि आकर्षणातून झालेली मैत्री... मैत्रीतून जुळले आमचे नाते.... ‘बट एव्हरी डे इज व्हॅलेंन्टाइन डे फॉर अस’. ‘वुई आर एन्जॉइंग अवर लाइफ ऑलवेज’.... अभिनेता सौरभ गोखले आणि अभिनेत्री रूपाली कृष्णराव यांच्यासोबत फर्ग्युसन महाविद्यालयातील तरुण-तरुणी उत्स्फूर्तपणे मनातले प्रेम व्यक्त करत होते. प्रेम व्यक्त करता-करता ‘व्हॅलेंटाइन डे’चा आनंद घेत सेल्फीतून ‘तारुण्याची आठवण’ टिपत होते. 

‘व्हॅलेंटाइन डे’ला तरुणाईला भेटायला सौरभ आणि रूपाली यांनी फर्ग्युसनमध्ये प्रवेश केला. पडद्यावर दिसणारे दोघे प्रत्यक्ष भेटीला आल्याचे पाहून तरुण-तरुणी उत्साहित झाली होती. दोघांसोबत मनमोकळ्या गप्पा मारायला मिळाल्या. मग काय परीक्षेचा ताण कुठल्या कुठे निघून गेला. मुले-मुली समूहाने कॅम्पसमध्ये फिरत होती. सौरभ आणि रूपाली त्यांच्याकडे जाऊन ‘व्हॅलेंटाइन डे’बद्दल विचारत होते. 

मराठी आणि इंग्लिश भाषेत संमिश्र संवाद साधत आजची तरुणाई त्यांच्या भावना व्यक्त करीत होती. सौरभ आणि रूपालीने विचारले, ‘व्हॉट्‌स युवर टुडेज प्लॅन, बिकॉज टू. इज स्पेशल डे फॉर यूथ’ त्यावर मुलांनी पटकत प्रतिक्रिया दिली... ‘टुडे इज अ रोमॅंटिक डे फॉर अस’. ‘अव्यक्त प्रेम व्यक्त करायचा हा दिवस’. महाविद्यालयात अनेक झाडे असतात. कोणत्या झाडाखाली बसावे, कधी कधी असा प्रश्‍न पडतो. लाइफमध्येही असंच काहीसं होतं. मित्र-मैत्रिणीपैकी कोणाला प्रपोज करायचं. होतं असं...कधी कधी.

चित्रपट, मालिकांतून अनेक जण एकमेकांना ‘प्रपोज’ करतात. पण ‘विदाऊट एनी प्लॅन वुई एन्जॉय अवर कॉलेज लाइफ’. कारण प्रत्येक दिवस आमच्यासाठी ‘व्हॅलेंटाइन डे’च आहे. उस्मानाबाद, नगर अशा विविध ठिकाणांहून शिक्षणासाठी आलेली ही मुले. नेहमीच्या दिवसांपेक्षा आजचा दिवसच निराळाच. कॉलेजमध्ये परीक्षा होती म्हणून समूहाने अनेक जण अभ्यास करत होते. सौरभ अन्‌ रूपाली आल्याने त्यांच्यासमवेत सेल्फी काढण्यासाठी ते गर्दीही करत होते. सौरभ, रूपालीही हे क्षण एन्जॉय करत होते. एकमेकांना शुभेच्छा देत होते... ‘हॅपी व्हॅलेंटाइन डे’. 

समर्पित भावनेतून प्रेम बहरत जाते - स. प. महाविद्यालयात अभिनेत्री सोनाली शेवाळेसोबत धमाल
‘‘आपले प्रेम समोरच्या व्यक्तीच्या हृदयात साठवता आले पाहिजे. दुसऱ्यावर समर्पित भावनेने प्रेम केल्यास आपोआप प्रेम बहरत जाते. प्रेम ठरवून होत नाही, तर मनातून होते. प्रेमाचा आनंद वेगळा असतो,’’ अशा भावना व्यक्त करत स. प. महाविद्यालयातील तरुणाईने अभिनेत्री सोनाली शेवाळेसोबत ‘व्हॅलेंटाइन डे’ला धमाल, मस्ती केली. 

व्हॅलेंटाइन डेनिमित्त तरुणाईला सेलिब्रेशन करण्यासाठी ‘सकाळ’ने व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. महाविद्यालयातील तरुणाईने जीवनात आलेले प्रेमाचे अनुभव शेअर करत वातावरणात बहर आणला. अलगद पण निखळ शब्दांत प्रेम व्यक्त करण्यासाठी महाविद्यालयातील तरुणाई सरसावली अन्‌ व्यक्तही झाली. 

प्रेमाचे प्रतीक असलेले बॅंड, गुलाब, शुभेच्छापत्रांनी महाविद्यालय सजविले होते. अंध मुलांनी पथनाट्य सादर करून कलेच्या माध्यमातून ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा केला. प्रेमाला वयासोबत नात्याची चौकट नसते, जो स्वतःवर निखळ प्रेम करू शकतो, तो दुसऱ्यावरही तेवढ्याच तन्मयतेने प्रेम करू शकतो. प्रेम संवादातून व्यक्त करता आले पाहिजे,’’ अशा भावना व्यक्त करत महाविद्यालयातील काही तरुण-तरुणींनी आयुष्यात आलेल्या सुखद आणि विरह भावना सांगत अश्रूंना वाट करून दिली.

‘लग्नबंधनात अडकल्यानंतर मर्यादा येतात. जबाबदारी वाढत जाते. त्यामुळे कॉलेजमध्ये असतानाच हवी तेवढी मजा-मस्ती करावी,’ असा सल्ला काही तरुणांनी दिला. ‘कभी-कभी मेरे दिल में, खयाल आता है... के जैसे तुझको बनाया गया मेरे लिये...,’ हे गाणे गुणगुणत सोनालीने वेगळा अनुभव विद्यार्थ्यांना दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप सेठ आणि डॉ. सरोज हिरेमठ या वेळी उपस्थित होते.  

प्रेम हा प्रत्येकाचा स्थायी भाव आहे. त्यामुळे आयुष्याची सुरवात प्रेम आणि आनंदाने झालेली असते. प्रेमात ब्रेकअप झाल्यानंतर आयुष्य संपल्यासारखे वाटते; पण आयुष्याची खरी सुरवात त्या क्षणापासून होते.
- सोनाली शेवाळे, अभिनेत्री

तरुणाईचा मनमोकळा संवाद - एच. व्ही. देसाई महाविद्यालय
‘‘या हॉलमध्ये एक खास व्यक्ती बसलेली आहे. मी त्याला खूप ‘हर्ट’ केले आहे. त्यामुळे आज ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने मी त्या खास व्यक्तीची मनापासून माफी मागत आहे. मला अपेक्षा आहे की ती व्यक्ती मला माफ करेल...,’’ एका मुलीने आपल्या मित्राला उद्देशून केलेल्या या विनंतीला कडकडून टाळ्याही पडल्या आणि अनेकांच्या भुवयाही उंचावल्या. 

‘सकाळ’तर्फे एच. व्ही. देसाई महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘व्हॅलेंटाइन डे’ सेलिब्रेशनच्या निमित्ताने मॉडेल आणि अभिनेत्री स्नेहा अरुण यांच्याशी तरुणाईने मनमोकळा संवाद साधला. आपल्या ‘व्हॅलेंटाइन’विषयी, आवडत्या अभिनेता, अभिनेत्रीविषयी, प्रेमाविषयीच्या भावना या वेळी मुला-मुलींनी व्यक्त केल्या. 

‘‘मी खूप वेळा प्रेम केलं; पण ‘व्हॅलेंटाइन डे’पर्यंत ते पोचलंच नाही...,’’ ‘‘माझी व्हॅलेंटाइन ट्रॅफिकमध्ये अडकली आहे, येईलच थोड्या वेळात,’’ ‘‘माझे आई-बाबाच माझे व्हॅलेंटाइन आहेत,’’ या आणि अशा अनेक प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. कॉलेजमधील ‘लव्ह गुरू’ कोण या प्रश्‍नावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि मागच्या बाजूला बसलेल्या एका घोळक्‍यातून उभा राहिलेला मुलगा पाहून महाविद्यालयातील शिक्षकांनाही आश्‍चर्य वाटले.

Web Title: pune news valentine day