वन मोअर, वेल डन, ग्रेट

वन मोअर, वेल डन, ग्रेट

पुणे - ‘वन मोअर’, ‘वेल डन’, ‘ग्रेट’, ‘सुपर्ब’... अशी दाद श्रोत्यांमधून उत्स्फूर्तपणे येत होती, जेव्हा भारतीय जॅझचे प्रणेते लुई बॅंक्‍स यांनी त्यांच्या ‘निर्वाणा’ बॅंडची जादूगिरी सुरू केली. तरुणाई ताल धरत मान डोलावू लागली. हीच किमया पुढे तरुणाईच्या गळ्यातला ताईत असलेल्या नीलाद्रीकुमार यांच्या सतार वादनातून घडली आणि एक अविस्मरणीय ‘स्वर सोहळा’ रंगत गेला, कधीही संपूच नये असा...

सकाळ प्रस्तुत ‘वसंतोत्सवा’च्या तिसऱ्या आणि अखेरच्या दिवसाची सुरवात झाली ती लुई बॅंक्‍स यांच्या ‘निर्वाणा’ या बॅंडच्या फ्युजनने. पियानो, बेसगिटार, ड्रम, इलेक्‍ट्रॉनिक गिटार, मृदंगम अशा विविध वाद्यांचा एकत्रित आविष्कार श्रोत्यांना अनुभवायला मिळाला. तो खऱ्याअर्थाने रंगत गेला लुई बॅंक्‍स यांच्याबरोबरच मृदंगम्‌ वादक श्रीधर पार्थसारथी, ड्रम वादक जिनो बॅंक्‍स, बेसगिटार वादक शेल्डन डिसूझा, इलेक्‍ट्रिक गिटार वादक संजय दिवेचा या कलावंतांमुळे.

तरुणांना धुंद करणाऱ्या पाश्‍चात्त्य जॅझ या संगीतशैलीचा ऱ्हिदम आणि इलेक्‍ट्रिक गिटारचे नादनाट्य रंगले. लुई बॅंक्‍स यांची की बोर्डवर विजेच्या चपळाईने फिरणारी बोटे पाश्‍चात्त्य सुरावटीची कारंजी उसळवत होती. श्रीधर पार्थसारथी यांनी कधी डफली, कधी मृदंगम्‌ तर कधी मोरसिंग अशी वाद्यं वापरत निर्माण केलेली तालाची पखरण जिंकून घेत होती. डिसूझा यांनी धावणाऱ्या रेल्वेचा ‘स्वर’ बेसगिटारमधून उभा केला. या कलाविष्काराला श्रोते उत्स्फूर्त दाद देत होते.

महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात सतारवादक नीलाद्रीकुमार श्रोत्यांना नमस्कार करतच स्वरमंचावर आले. ‘इजाजत दीजिए’ म्हणत त्यांनी सुरेल वादनाला सुरवात केली. त्यांनी सतारीवर वाजविलेल्या जयजयवंती रागाचा गुंजारव कानांना तृप्त करून गेला. भारतीय अभिजात संगीताची परंपरा जपत, स्वतःची आगळीवेगळी वादनशैली निर्माण करणाऱ्या या कलावंताने सतारीवरील मींडकामाच्या कमालीच्या सूक्ष्म कारागिरीने चकित केले. पंडित रविशंकरांचे शिष्य असलेले कार्तिककुमार यांचा पुत्र व शिष्य असलेल्या नीलाद्रीकुमार यांच्या वादनातही तसाच तंत्रकारी व गायकी अंगाचा कल्पकतेने मेळ दिसून येतो. ‘जयजयवंती’ पेश करत त्यांनी मध्येच ‘बगळ्याची माळ फुले’ या डॉ. वसंतराव देशपांडे यांनी गायलेल्या प्रसिद्ध सुगम गीताची सुरावट छेडत सुखद धक्का दिला. 

नीलाद्रीकुमार यांनी नंतर ‘झितार’ या स्वतःच विकसित केलेल्या वाद्यावर भैरवीची मधुर सुरावट छेडली. त्यासाठी त्यांनी लुई बॅंक्‍स यांना की-बोर्ड व जीनो बॅंक्‍स यांना ब्रासवर साथ करण्यासाठी पाचारण केले. सतारीच्या वीस तारांऐवजी पाचच तारांचा वापर व इलेक्‍ट्रिक गिटारच्या मिलाफातून घडवलेले हे वाद्य नीलाद्रीकुमार यांच्या बोटांच्या करामतीमुळे ‘वसंतोत्सवा’च्या मेजवानीतील अफलातून मिष्टान्नाप्रमाणे वाटत होते.

विजय घाटे यांच्या तबलासाथीने या वादनाची गहराई अधिकच जाणवली.
डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या ध्वनिमुद्रित ‘छैलुवा डारे गुलाल’ या भैरवीने वसंतोत्सवाची सांगता झाली. महोत्सवातील सुरेल स्वर काना-मनांत साठवत, प्रसन्न वातावरणात श्रोते परतत होते. महोत्सवाचे ‘मराठे ज्वेलर्स’ टायटल स्पॉन्सर होते. पॉवर्ड बाय ‘रावेतकर ग्रुप’ या महोत्सवासाठी ‘हॅशटॅग’ आणि ‘महामेट्रो’ सहप्रायोजक, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. बॅंकिंग पार्टनर, ९१.१ एफएम रेडिओ सिटी रेडिओ पार्टनर, महेफिल केटरिंग सर्व्हिसेस, जनसेवा भोजनालय फूड पार्टनर, गिरिकंद हॉलिडेज ट्रॅव्हल पार्टनर, हंड्रेड पर्सेंट पब्लिक रिलेशन्स पीआर पार्टनर, सेतू ॲडव्हर्टायझिंग कम्युनिकेशन पार्टनर आणि व्हाइट कॉपर प्रा. लि. एक्‍झिक्‍युटिंग पार्टनर होते.

वसंतराव देशपांडे यांच्यावर चित्रपट
‘‘माझे आजोबा (डॉ. वसंतराव देशपांडे) सर्व कलांवर मनापासून प्रेम केलेले व्यक्तिमत्त्व होते. ते श्रोत्यांना पूर्णत्वाने कळावेत म्हणून आम्ही त्यांच्यावर लवकरच चित्रपट काढणार आहोत,’’ अशी घोषणा गायक राहुल देशपांडे यांनी या वेळी केली. तुम्ही मला गायक, नाटकातील अभिनेता म्हणून पाहिलेले आहे. मीही लवकरच एका चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकत आहे. माझे हेही रूप तुम्हाला आवडेल, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

पटवर्धन, घोरपडे यांचा सन्मान 
संगीतक्षेत्रात विद्यादान करणारे गुरुजन आणि उदयोन्मुख कलाकार यांना ‘वसंतोत्सवा’त सन्मानित केले जाते. यंदा ज्येष्ठ गानगुरू डॉ. सुधा पटवर्धन आणि युवा गायक ईश्‍वर घोरपडे यांचा या महोत्सवात गौरव करण्यात आला. ‘वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान’चे बापू देशपांडे, ‘रावेतकर ग्रुप’चे अमोल रावेतकर, ‘महामेट्रो’चे ब्रिजेश दीक्षित, ‘हॅशटॅग’चे अमोल नहार, ‘गिरिकंद हॉलिडेज ट्रॅव्हल’चे अखिलेश जोशी, ‘व्हाइट कॉपर’च्या शोभा चिडगोपकर उपस्थित होत्या.

वसंतोत्सव हा सांगीतिक कार्यक्रम पुण्याचा संगीत वारसा सांगतो. हजारो पुणेकर ‘वसंतोत्सवा’शी जोडले गेलेले आहेत. महामेट्रोही आता पुण्याशी जोडली गेली आहे. त्यामुळे पुणेकरांशी जोडून घेण्यासाठी ‘वसंतोत्सव’ हे अगदी उत्तम व्यासपीठ आहे. ‘महामेट्रो’चे एक स्टेशन संभाजीपार्क येथे होणार आहे. संभाजीपार्क हे ठिकाण बालगंधर्व नाट्यमंदिराजवळ आहे. बालगंधर्व नाट्यमंदिर म्हणजे पुण्याचा सांगीतिक वारसा. त्यामुळे येथील स्टेशनची वास्तुरचना व अंतर्गत सजावट ही पुण्याची सांगीतिक परंपरा दाखविली जाणारी असावी, या गोष्टीवर आम्ही कटाक्षाने भर दिला आहे. ‘सकाळ’ पुण्यातील आघाडीचा माध्यम समूह आहे. ‘सकाळ’ प्रस्तुत ‘वसंतोत्सवा’चे सहप्रायोजकत्व महामेट्रोने घेतल्यामुळे पुण्याचा वारसा, पुण्याची परंपरा आणि पुणेकर यांच्याशी महामेट्रो जोडली जात आहे, असे मला वाटते.
- ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

वसंतोत्सव म्हणजे स्वरांची मेजवानी
‘‘वसंतोत्सव म्हणजे स्वरांची मेजवानीच असते, त्यामुळे हा महोत्सव वर्षातून दोनदा व्हावा, असे कधी-कधी वाटते. इतके कमालीचे कलाकार इथे येतात. त्यामुळे स्वरांचा मेळावाच आपल्याला श्रोत्यांमध्ये बसून पाहायला, अनुभवायला मिळतो. अशा ठिकाणी आल्यानंतर मला वेगळाच आनंद मिळतो. तसाच आनंद बाबा आमटे यांच्या आनंदवनात, हेमलकसा येथे अनुभवायला मिळतो...,’’ अशा शब्दांत अभिनेते नाना पाटेकर यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. ‘वसंतोत्सवा’शी नाना पाटेकर यांचे घट्ट नाते आहे. पुढच्या वर्षी या महोत्सवाचे सूत्रसंचालन मी करेन, असेही नानांनी या वेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com