ताल-स्वरांनी फुलला ‘वसंतोत्सव’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

पुणे - फरुखाबाद घराण्याचे तबलावादक पं. अनिंदो चटर्जी आणि बनारस घराण्याचे तबलावादक पं. कुमार बोस हे दोघेही नामवंत कलावंत... दोघांची घराणी वेगवेगळी... शैली वेगवेगळी... पण दोघांचे वाद्य एकच आणि उत्साहही तोच. तो घेऊन त्यांच्या तबलावादनाला सुरवात झाली अन्‌ पुढच्या काही वेळातच वादनातील माधुर्य, कोमलता याने त्यांनी श्रोत्यांची मने जिंकायला सुरवात केली. अशा वातावरणातच ‘वसंतोत्सव’ फुलायला सुरवात झाली. त्यावर तरुणाईचा आवडता गायक असलेल्या राहुल देशपांडे यांनी आपल्या सुरेल स्वरांनी कळसच चढवला.

पुणे - फरुखाबाद घराण्याचे तबलावादक पं. अनिंदो चटर्जी आणि बनारस घराण्याचे तबलावादक पं. कुमार बोस हे दोघेही नामवंत कलावंत... दोघांची घराणी वेगवेगळी... शैली वेगवेगळी... पण दोघांचे वाद्य एकच आणि उत्साहही तोच. तो घेऊन त्यांच्या तबलावादनाला सुरवात झाली अन्‌ पुढच्या काही वेळातच वादनातील माधुर्य, कोमलता याने त्यांनी श्रोत्यांची मने जिंकायला सुरवात केली. अशा वातावरणातच ‘वसंतोत्सव’ फुलायला सुरवात झाली. त्यावर तरुणाईचा आवडता गायक असलेल्या राहुल देशपांडे यांनी आपल्या सुरेल स्वरांनी कळसच चढवला.

ख्यातनाम गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीनिमित्त ‘सकाळ’ प्रस्तुत ‘वसंतोत्सवा’चे उद्‌घाटन ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी ‘सकाळ’च्या संचालिका मृणाल पवार, ‘मराठे ज्वेलर्स’चे मिलिंद मराठे, ‘रावेतकर ग्रुप’चे अमोल रावेतकर, ‘वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान’चे प्रमुख बापू देशपांडे उपस्थित होते. ज्येष्ठ गायक व बंदिशकार पं. विजय बक्षी यांचा विशेष सन्मान याप्रसंगी झाला.

‘जुगलबंदी म्हणजे एकमेकांशी स्पर्धा नव्हे. आमचे एकमेकांतील हे प्रेमच आहे,’ असे सांगत पं. अनिंदो चटर्जी आणि पं. कुमार बोस यांनी जुगलबंदीला सुरवात केली. यानिमित्त भारतीय अभिजात संगीतातील तबल्याच्या सहा घराण्यांपैकी पूरब अंगाचे म्हणून ओळखल्या गेलेल्या फरुखाबाद व बनारस घराण्याच्या वादनातील वैशिष्ट्यांची लयलूटच अनुभवायला मिळाली.

तीनतालात गत, तोडे, तुकडे यांची आतषबाजी त्यांनी केली. चटर्जी यांच्या वादनातील पेशकाराचे प्राधान्य आणि बोस यांच्या वादनातील वेगळेपण राखत त्यांनी परस्परांशी मेळ साधला. या वेळी श्रोत्यांनी त्यांना उत्स्फूर्त दादही दिली. फरुखाबाद शैलीतील माधुर्य आणि कोमलता मोहून घेत होती, तर बनारस ढंगाचे काहीसे दणकट, पण अनुनाद निर्माण करणारे आघात वारंवार दाद द्यायला भाग पाडत होते.

वसंतराव देशपांडे यांचे नातू असलेल्या गायक राहुल देशपांडे या तरुण, तडफदार गायकाने ‘दरबारी कानडा’ या रागाने स्वरपूजेचा आरंभ केला. मध्यरात्रीचा राग असूनही रात्र सुरू होताच तो घेतला तरी राहुल यांनी आपल्या धीरगंभीर मांडणीतून रागभाव अधोरेखित केला. कर्नाटकातून हिंदुस्तानी संगीतात येऊन मिळालेल्या या रागात मुरकी व खटका यांसारख्या अलंकारांप्रमाणेच मींड व आंदोलनांची महती मोठी. विलंबितमध्ये उपज करायला वाव असतो. या साऱ्याचे दर्शन राहुल यांनी उत्कटतेने घडवले. याला जोडून राहुल यांनी ‘अनोखा लाडला, खेलन को माँगे चाँद’ या चीजेच्या सादरीकरणातून या रागातील भावपूर्णता गडद केली. एका-एका स्वराची दोन किंवा तीनदा पुनरावृत्तीने होणारा नादगुंजारव मोहून घेत होता. नंतर परजमधील ‘लाल आये मोरे मंदर में’ आणि ‘पवन चलत आली’ या छोटेखानी रचना पेश करताच वातावरणात प्रसन्नतेचा शिडकावा झाला. आजोबांची ‘ए री सखी, कल ना परे’ ही ठुमरी राहुल यांनी मोठ्या समर्पित भावनेने सादर केली. पुढे श्रोत्यांच्या आग्रहामुळे ‘बगळ्यांची माळ फुले’, ‘गुरुजी मैं तो एक’ हे निर्गुणी भजन सादर केले. ज्ञानेश्‍वर माउलीच्या ‘सावळे परब्रह्म आवडे या जिवा’ या भैरवीतील पदाने त्यांनी वसंतोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता केली.

या महोत्सवाचे ‘मराठे ज्वेलर्स’ टायटल स्पॉन्सर आहेत. पॉवर्ड बाय ‘रावेतकर ग्रुप’ या उत्सवासाठी ‘हॅशटॅग’ आणि ‘महामेट्रो’ सहप्रायोजक, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. बॅंकिंग पार्टनर, ९१.१ एफएम रेडिओ सिटी रेडिओ पार्टनर, महेफिल केटरिंग सर्व्हिसेस, जनसेवा भोजनालय फूड पार्टनर, गिरिकंद हॉलिडेज ट्रॅव्हल पार्टनर, हंड्रेड पर्सेंट पब्लिक रिलेशन्स पीआर पार्टनर, सेतू ॲडव्हर्टायझिंग कम्युनिकेशन पार्टनर आणि व्हाइट कॉपर प्रा. लि. एक्‍झिक्‍युटिंग पार्टनर आहेत.

मनाला उन्नत करणारी संगीत कला - भागवत
‘‘संगीत हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही. ती आपली आपलेपणाची अभिव्यक्ती आहे. मनाला एका उन्नत अवस्थेत घेऊन जाणारी ही एक कला आहे. त्यात साधना झाल्यानंतरचे जे स्वर कानी येतात, त्याचा आनंद तर अप्रतिमच असतो. असे संगीत ऐकणे भाग्याचीच गोष्ट आहे. ती मी अनुभवत आहे,’’ अशा शब्दांत रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. ‘वसंतोत्सव’ अधिकाधिक फुलत राहावा, असे सांगत त्यांनी श्रोत्यांमध्ये बसून राहुल देशपांडे यांच्या सुरेल गायनाचा आस्वाद घेतला. ‘सकाळ’च्या संचालिका मृणाल पवार यांच्या हस्ते मोहन भागवत यांचा विशेष सत्कारही झाला. या वेळी श्रोत्यांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला.

तबलावादकांची वेगवेगळी घराणी आहेत; पण या घराण्यांपेक्षा तबला हा विषय खूप मोठा आहे. तो गुरूंकडे जाऊनच शिकता येतो; पण हल्लीचे कलाकार शिकतात कमी आणि सांगतात जास्त, अशी स्थिती आहे.
- पं. अनिंदो चॅटर्जी

पुण्यात येऊन वादन 
करतो, त्या वेळी आम्हा कलाकारांचा एक वेगळाच ‘मूड’ तयार होतो. त्यामुळे इथे येणे कलाकारांसाठी गौरवास्पदच असते. असे का, तर इथले श्रोते कमालीचे जाणकार आहेत.
- पं. कुमार बोस

Web Title: pune news vasantotsav mahotsav start