वीर धरण पूर्ण भरले; 4500 क्युसेक्स विसर्ग नदीत

संतोष शेंडकर
रविवार, 30 जुलै 2017

आज सकाळी सहापर्यंतची धरणांची स्थिती 
धरण           क्षमता (TMC)  पाणीसाठा    टक्केवारी  

नीरा देवघर      11.53                9.6               80.53  
भाटघर           23.93                18.8              79.18    
वीर                 9.83                 9.3               95        

सोमेश्वरनगर : नीरा डावा व उजवा कालवा या अमृतवाहिन्यांचा 'अमृतसाठा' मानले गेलेले वीर धरण आज पूर्ण भरले असून दुपारी तीनपासून साडेचार हजार क्युसेक्स प्रतिसेकंद या वेगाने नदीमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. चालू पावसाळ्यात आजिबात पाऊस न झालेल्या 'वीर'च्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी ही गूड न्यूज ठरणार आहे! दरम्यान नीरा देवघर आणि भाटघर ही धरणेही भरण्याच्या मार्गावर आहेत.

नीरा नदीच्या खोऱ्यातील वीर धरणावर पुरंदर, बारामती, इंदापूर खंडाळा, फलटण, माळशिरस आदी तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान अवलंबून आहे. नेमका या पट्ट्यात या पावसाळ्यात पाऊसच झालेला नाही. ऐन उन्हाळ्यात जगविलेली पिके ऐन पावसाळ्यात धोक्यात आली आहेत. अशा स्थितीत कोकण पट्ट्यातील पावसावर धरणे भरू लागल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या पट्ट्यातील शेतकऱ्यांनी ऊस लागवडीसाठी सऱ्या काढून ठेवल्या होत्या परंतु लागवडी करण्यास धजावत नव्हते. वीर धरण भरू लागल्याने नीरा डावा व उजव्या कालव्यास पाणी सोडल्याने शेतकरी ऊस लागवड करू लागले आहेत.
आता वीर धरण भरल्याने शेतकऱ्यांचा जीव मोठा झाला आहे. वीर धरणातून नीरा डाव्या कालव्यास 827 क्युसेक्स प्रतिसेकंद तर उजव्या कालव्यास 1550 क्युसेक्स प्रतिसेकंद इतक्या पूर्ण क्षमतेने शेती सिंचनासाठी पाणी सुरू आहे. वीर पूर्ण भरण्याच्या मार्गावर असताना धरणाच्या प्रभावक्षेत्रात आणखी पाण्याचा लोट येत असल्याने पुढे धोका उदभवू नये म्हणून एक गेट चार फुटांनी उघडून आज साडेचार हजार क्युसेक्स प्रतिसेकंद वेगाने नीरा नदीत सोडण्यास सुरवात केली आहे, अशी माहिती पाटबंधारे खात्याच्या तांत्रिक विभागाचे अधिकारी दत्तात्रेय शिंदे यांनी दिली. धरणात येणारे पाणी वाढल्यास नदीमध्ये आणखी पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे पाटबंधारे खात्याने नदीकडेच्या गावांमध्ये सावधानतेचा इशारा दिला आहे. भाटघर व नीरा देवघर धरणाच्या प्रभावक्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणे मात्र ऐंशी टक्क्यांच्या पुढे गेली आहेत. पंचवीस ते पन्नास मिलीमीटरच्या दरम्यान पाऊस सुरूच आहे.

पाऊस नाही तरीही धरण भरले!
भाटघर व नीरा देवघर धरणाच्या प्रभावक्षेत्रात संततधार पावसाने धरणे भरली. परंतु वीर धरणाच्या प्रभावक्षेत्रात अवघा 85 मिलीमीटर पाऊस झाला आहे. मागील पंधरवड्यात तर दररोज शक्यतो शून्य मिलीमीटर पावसाची नोंद होत आहे. तरीही गुंजवणी धरण भरून येणारे पाणी, खेड-शिवापूरहून येणाऱ्या शिवगंगा नदीचे पाणी आणि नीरा देवघर धरणाच्या खालच्या टप्प्यात होणाऱ्या पावसाचे पाणी यावरच वीर भरले आहे!

Web Title: pune news veer dam water storage full