आवक वाढूनही भाव तेजीतच!

आवक वाढूनही भाव तेजीतच!

पुणे - शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे विस्कळित झालेला भाजीपाला पुरवठा सुरळीत होऊ लागला आहे. मंगळवारी घाऊक बाजारात आवक वाढली असली, तरी किरकोळ विक्रीच्या भावांत फारशी घट न झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला नाही. 

गेल्या गुरुवारपासून शहरातील भाजीपाला पुरवठा विस्कळित झाला आहे. या रविवार, सोमवार आणि मंगळवार असे तीन दिवस मार्केट यार्ड येथील भाजीपाल्याच्या घाऊक बाजारात सरासरीपेक्षा कमीच आवक झाली. मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने भाजीपाल्याचे भाव कडाडले. या शेतकऱ्यांनी राज्यव्यापी बंद केल्यानंतर मंगळवारी बाजारात गेल्या पाच दिवसांतील सर्वांत जास्त आवक वाढली. 

आवक वाढली त्या तुलनेत वाढलेल्या भावांत अपेक्षित घट झाली नाही. विशेषत: पालेभाज्यांच्या भावांतील तेजी अद्याप टिकून राहिली आहे. मे आणि जून महिन्यात पालेभाज्यांचे उत्पादन घटल्याने भाव तेजीतच असतात. यावर्षी संपाची भर त्यात पडली आहे. कोथींबिरीच्या सुमारे ३६ हजार, मेथीच्या दहा हजार, पालकच्या २१ हजार जुड्या इतकी आवक झाली. इतर पालेभाज्यांच्या आवक तुलनेत खूप कमी आहे. आवक कमी असल्याने कोथिंबिरीच्या एका जुडीचा भाव हा १६ ते ३० रुपये, मेथीच्या जुडीचा भाव १५ ते २५ रुपये, कांदापातीच्या जुडीचा भाव १० ते २० रुपये असा निघाल्याचा दावा बाजार समितीचे प्रशासन करीत आहे, तर किरकोळ विक्रेत्यांनी यापेक्षा जास्त भावांत माल खरेदी करावा लागल्याचा दावा केला आहे.  

मंगळवारी बाजारात भाजीपाल्याची सुमारे १३ हजार ९२६ क्विंटल, कांदा आणि बटाटा यांची ९ हजार ७८९ क्विंटल, फळांची सुमारे २ हजार ४९३ क्विंटल इतकी आवक झाली. पिंपरी, मोशी, खडकी अणि मांजरी येथील उपबाजारातही आवक झाली असून, ती कमीच आहे. घाऊक बाजारातील भावांत अपेक्षित घट न झाल्याने किरकोळ विक्रीच्या भावांत घट न झाल्याने ग्राहकांना अद्याप दिलासा मिळाला नाही.

बारामतीत सरकारचा ‘गोंधळ’
बारामती - स्थळ ः प्रशासकीय भवन...वेळ सकाळी साडेदहाची...अधिकारी येण्याची वाट पाहणाऱ्या अनेक लाभार्थ्यांना अचानक संबळाचा आवाज ऐकू येतो...आणि फाटकासमोर ज्वारीची ताटे मांडून जागरण गोंधळ सुरू होतो...संबळ वाजवीत सुरू असलेल्या गोंधळात ‘‘तुमच्या विश्वासावर पिकवतो बघा शेतकरी धान्य...अहो, सरकारजी...शेतकरी पिकवतो धान्य...त्याच्या मागण्या मान्य करा...त्याचं पूर्ण कर्ज माफ करा...’’ असा गोंधळ घालत कर्जमाफीसाठी जागरण गोंधळ सरकारच्या दरबारात सुरू होतो. शेतकरी संपाचा सहावा दिवस आज शेतकरी आंदोलकांनी अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने गाजला.

बारामतीत आज सकाळी प्रशासकीय भवनासमोर शेतकरी आंदोलकांनी जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला. यासाठी सोमवारी (ता. ५) शेतकरी क्रांती मोर्चातर्फे निवेदन देण्यात आले होते. आज सकाळी साडेदहाला प्रशासकीय इमारतीचे फाटक आंदोलकांनी बंद केले. या वेळी गोंधळ्यांनी गोंधळ मांडला. 

या गोंधळात कर्जमाफीच्या अभिनव गीतांचा समावेश करण्यात आला होता. या अभिनव आंदोलनामुळे प्रशासकीय इमारतीसमोर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी १८ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून नंतर त्यांना वैयक्तिक जामिनावर मुक्त केले. 

देवा कशासाठी गोंधळ घातला?
जागरण गोंधळात कार्यकर्त्यांपैकी एकाच्या अंगातही आले. मग देवाला कशासाठी गोंधळ घालता? असा सवालही करण्यात आला. शेतकऱ्याचे दुखणे फारच वाढले असल्याने इंद्रराजा काही ऐकत नाही, त्यामुळे आता गोंधळाशिवाय पर्याय नाही, तुम्ही तुमचा गोंधळ घाला, असा अंगात संचारलेल्या देवाने आंदोलकांना आशीर्वादही दिला.

आठवडे बाजार बंदच
तळेगाव ढमढेरे - रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे उद्या बुधवारी (ता. ७) भरणारा आठवडा बाजार बंद राहणार आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बाजार बंद राहणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला हमीभाव मिळाला पाहिजे, संपूर्ण कर्ज माफ झाले पाहिजे व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू कराव्यात आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

शेळगावचा आठवडे बाजार बंद
निमगाव केतकी - शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी शेळगाव (ता. इंदापूर) येथील आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला होता. दिवसभरात कोणताच शेतीमाल बाजारात विक्रीसाठी आला नाही. सरकारने सरसकट कर्जमाफी करावी, शेतीमालाला हमीभाव द्यावा, या प्रमुख मागण्यांवर शेतकरी ठाम होते. 

शेळगावच्या सरपंच अलका ननवरे, उपसरपंच विठ्ठल शिंगाडे, छत्रपती कारखान्याचे संचालक ॲड. लक्ष्मणराव शिंगाडे, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती यशवंत माने, जिल्हा परिषद सदस्या भारती मोहन दुधाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल जाधव, कर्मयोगी कारखान्याचे संचालक अंबादास शिंगाडे यांच्यासह ग्रामस्थांनी सरसकट कर्जमाफी व्हावी, अशी मागणी केली आहे. याच मागणीसाठी सोमवारी सर्व व्यवहार बंद ठेवले होते.

सरकारी कार्यालयांना टाळे
शिनोली - घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील शेतकऱ्यांनी ‘सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करा, शेतीमालाला हमीभाव द्या,’ अशा घोषणा देत तहसील कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन केले.  मंगळवारी (ता. ६) सरकारी कार्यालये बंद करण्यासाठी शेतकरी व विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मागण्यांचे निवेदन तहसीलदार रवींद्र सबनिस यांना देण्यात आले. तहसील कार्यालयाला टाळे लावून आंदोलन केले. 

पालिका, पंचायत समितीला टाळे
गराडे - सासवड नगरपालिका, पंचायत समिती व ओव्हाळ मिल्कला आज (मंगळवारी) शेतकऱ्यांनी टाळे ठोकले. बळिराजा शेतकरी संघाच्या वतीने उद्या (ता. ७) आंदोलन सुरूच राहणार असून खासदार, मंत्री, आमदार यांच्या कार्यालयांना टाळे ठोकण्याचा कार्यक्रम राज्यभर करण्यात येणार आहे, अशी माहिती बळिराजा शेतकरी संघाचे राज्य अध्यक्ष व शेतकरी आंदोलनाच्या सुकाणू समितीचे सदस्य गणेश जगताप यांनी दिली. हिवरे (ता. पुरंदर) येथील ओव्हाळ मिल्कला बळिराजा शेतकरी संघटनेच्या वतीने पत्र देऊन दूध संकलन बंद करा व संपात सामील व्हा, अशी विनंती मिल्कचे संस्थापक अशोक ओव्हाळ व व्यवस्थापकीय संचालक विनोद ओव्हाळ यांना करण्यात आली. 

बाजारातील आवक ही वाढली, परंतु काही मालाचा तुटवडा आहेत. ठराविक मालाची आवक जास्त आणि ठराविक मालाची आवक कमी अशी स्थिती आहे. पालेभाज्यांचे भाव कमी झाले नाहीत. 
- प्रकाश ढमढेरे, किरकोळ विक्रेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com