वाहनांची अचानक तपासणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

पुणे - नगर रस्त्यावरील लोणीकंद येथे टॅंकरची धडक बसून झालेल्या अपघाताची प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) गंभीर दखल घेतली आहे. या भागात डंपर आणि टॅंकरची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर पथक नेमून या वाहनांची अचानक तपासणी करण्याचा निर्णय आरटीओने घेतला आहे.

नगर रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी हा अपघात झाला होता. त्यात सात जणांचा मृत्यू झाला होता. लोणीकंद आणि वाघोली परिसरात दगडखाणी आहेत. तसेच या भागात बांधकामेही मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. यामुळे या भागात पाण्याचे टॅंकर, डंपर इत्यादी वाहनांची कायम वर्दळ असते. यासाठी अनेक ठिकाणी रस्ता दुभाजकही बेकायदेशीरपणे तोडण्यात आले आहेत. ही वाहने जुने असल्यामुळे अनेकदा अपघातही होतात. डंपर व टॅंकरचालकांचे ‘नो एंट्री’तून येणे, मध्येच वळणे इत्यादी प्रकारांमुळे या रस्त्यावरील वाहतूक धोकादायक झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर आरटीओने विशेष पथक नेमून या रस्त्यावरील टॅंकर, डंपर, मोठे ट्रक इत्यादींची अचानक तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे आरटीओचे मुख्याधिकारी बाबासाहेब आजरी यांनी सांगितले. वर्षातून एकदा या गाड्यांची योग्यता पडताळणी करून घेणे आवश्‍यक आहे. अशा तपासणीच्या वेळेस गाड्यांची दुरुस्ती करून त्या आणल्या जातात. त्यानंतर त्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे वर्षभर दुर्लक्ष केले जाते. तसेच त्यांचा क्षमतेपेक्षा जास्त वापर होतो. त्यातून अपघातही होतात, हे लक्षात घेऊन मालक आणि चालकांनी किमान दोन ते तीन महिन्यातून आपल्या वाहनांची तपासणी करून घेणे आवश्‍यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: pune news vehicle cheaking