‘भांडारकर’मध्ये ‘व्हर्च्युअल म्युझियम’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

पुणे - दुर्मिळ हस्तलिखिते हा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचा ठेवा आहे. त्यामुळे ही हस्तलिखिते कशी तयार होतात, ती कशी लिहिली जातात, त्यावर चित्र केव्हा काढली जातात, त्याची ‘बॉर्डर’ कशी काढली जाते... अशी माहिती जगभरातील वाचक-अभ्यासकांना मिळावी, यासाठी संस्थेने ‘व्हर्च्युअल म्युझियम’ सुरू केले आहे. संस्थेच्या संकेतस्थळावरून ते पाहता येणार आहे. 

पुणे - दुर्मिळ हस्तलिखिते हा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचा ठेवा आहे. त्यामुळे ही हस्तलिखिते कशी तयार होतात, ती कशी लिहिली जातात, त्यावर चित्र केव्हा काढली जातात, त्याची ‘बॉर्डर’ कशी काढली जाते... अशी माहिती जगभरातील वाचक-अभ्यासकांना मिळावी, यासाठी संस्थेने ‘व्हर्च्युअल म्युझियम’ सुरू केले आहे. संस्थेच्या संकेतस्थळावरून ते पाहता येणार आहे. 

भांडारकर संस्थेचे शताब्दी वर्ष आजपासून (ता. ६) सुरू झाले. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. भूपाल पटवर्धन, राहुल सोलापूरकर, एम. के. ढवळीकर, डॉ. श्रीकांत बहुलकर, डॉ. मैत्रेयी देशपांडे, डॉ. सदानंद मोरे, प्रा. हरी नरके, विजय बेडेकर यांच्यासह संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी आगामी उपक्रमांची माहिती दिली.

देशपांडे म्हणाल्या, ‘‘भांडारकर संस्थेत संग्रहालय उभारले जाणार, अशी चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. हे दगड-विटांचे संग्रहालय होईलच; पण त्याआधी तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगळे काही संग्रहालय उभारता येईल का? हा विचार करताना ‘व्हर्च्युअल म्युझियम’ची कल्पना पुढे आली. या संग्रहालयाची सुरवात हस्तलिखितांची माहिती देण्यापासून करत आहोत. वेगवेगळ्या पद्धतीने हे संग्रहालय वाढवले जाईल.’’ संस्थेतील नव्या सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, ते लवकरच खुले केले जाणार आहे. हेरिटेज वास्तूबाबतच्या सर्व नियमांचे पालन करतच ही वास्तू उभारली जात आहे. शिवाय, संग्रहालय उभारणीचे कामही सुरू आहे, असे सोलापूरकर यांनी सांगितले.

दुर्मिळ खजिना होणार खुला
भांडारकर संस्थेकडे एक लाख ३८ हजार दुर्मिळ पुस्तके, तर २८ हजार पोथ्या आहेत. यातील अनेक ग्रंथ शंभर वर्षांपूर्वीचे आहेत. त्याचे ‘डिजिटायझेशन’ सध्या सुरू आहे. आत्तापर्यंत २ हजार पुस्तकांचे काम पूर्ण झाले आहे. तीन ते साडेतीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. शिवाय, संस्थेचे ई-ग्रंथालयही सुरू होईल. या उपक्रमांमुळे संस्थेतील दुर्मिळ खजिना सर्वांसाठी खुला होईल, असे बेडेकर आणि पटवर्धन यांनी सांगितले.

आगामी उपक्रम
संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा अर्थ लावणारे ग्रंथ प्रकाशित करणार
काश्‍मीरमधील तत्त्वज्ञ अभिनव गुप्त यांच्या योगदानावर चर्चासत्र घेणार
विविध देशांतील गणेश या देवतेच्या दुर्मिळ छायाचित्रांचे फिरते प्रदर्शन घेणार
संस्थेत येणाऱ्या प्रत्येक अभ्यासकाला मोफत वाय-फायची सुविधा उपलब्ध

Web Title: pune news vertual musium in bhandarkar