जागृती यात्रेतून चैतन्याची ऊर्मी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

पुणे - ‘‘शासकीय अधिकारी म्हणून काम करताना नेहमीच नवीन संकल्पना, नवीन प्रकल्प यावर सातत्याने काम करायला मिळते. बहुतांश वेळा हे काम ‘टीमवर्क’ स्वरूपाचे असते. मात्र समाजातील विविध स्तरांतील, देशाच्या विविध भागांतील सामाजिक प्रश्‍न सोडविण्यासाठी एकट्यानेच धडपडणाऱ्या तरुणाईला पाहून कामाची एक नवीन ऊर्मी मला मिळाली,’’ अशा शब्दांत पुणे महानगर प्रदेश  विकास प्राधिकरणाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी विद्युत वरखेडकर यांनी आपल्या अनुभवांचे कथन केले.

जागृती सेवा संस्थेच्या १८ दिवसांच्या रेल्वे यात्रेतील अनुभवांवर आधारित ‘डायरी ऑन व्हील्स’ पुस्तकाचे  प्रकाशन नुकतेच झाले. ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक, जागृती यात्रेचे संस्थापक शशांक मनी त्रिपाठी, मानदेशी बॅंकेच्या संस्थापक-अध्यक्षा चेतना गाला सिन्हा आणि इंडियन रिसर्च ॲकेडमीच्या प्रमुख डॉ. शबाना खान हे व्यासपीठावर उपस्थित होते. 

त्रिपाठी म्हणाले, ‘‘यात्रेत सहभागी होणाऱ्या प्रवाशांमधील सकारात्मकता, त्यांची जिद्द ही प्रत्येकाला एक नवी ऊर्जा देते. देशातील तरुणाईला महत्त्वाच्या प्रश्‍नांशी जोडल्यास नक्कीच त्यांची उत्तरे मिळू शकतात. या यात्रेद्वारे तरुणाईला आवश्‍यक मार्गदर्शन आणि मदत उपलब्ध करून देत राष्ट्रनिर्मितीला हातभार लावणे हेच जागृती यात्रेचे उद्दिष्ट आहे.’’ 

नाईक म्हणाले, ‘‘प्रवासात कायमच नावीन्य अनुभवास येते. त्यातून विचारांना चालना 
मिळून संशोधनाला वाव मिळतो.’’ 

संपूर्ण यात्रेमध्ये देशातील आणि जगातील विविध भागांमधील तरुणाईशी संवाद साधता आला, त्यांच्या कामाबद्दल जाणून घेता आले. हा एक विलक्षण अनुभव होता. नवउद्योजक, त्यांच्या संकल्पना, त्यांच्या समस्या आणि त्यावर जिद्दीने मात करत त्यांनी उभारलेले काम याबाबत जाणून घेताना क्षणोक्षणी नवचैतन्याची जाणीव होत होती.
- विद्युत वरखेडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

Web Title: pune news vidyut varkhedkar