विलासराव असते तर फडणवीस सरकार नसते - डॉ. श्रीपाल सबनीस

विलासराव असते तर फडणवीस सरकार नसते - डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे - ""दोन्ही कॉंग्रेस भ्रष्टाचारामुळे बुडाल्या. त्यामुळे सबंध समाजाला नको असलेले भारतीय जनता पक्षाचे सरकार दिल्ली आणि महाराष्ट्रात आले; पण विवेकी लोकांनी यापुढे कॉंग्रेसला, त्यांच्या विवेकवादाला आणि त्यांच्या राष्ट्रभक्तीला साथ देऊन देशातील बिघडलेली संस्कृती शुद्ध करावी,'' असे परखड मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आपल्यात असते, तर राज्यात फडणवीस सरकार आले नसते. त्यांनी कॉंग्रेसची एवढी वाताहत होऊ दिली नसती, असेही ते म्हणाले. 

विलासराव देशमुख यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त "साहित्य शिवार'तर्फे "आठवणींचा जागर' हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. या वेळी सबनीस यांनी भाजप सरकारवर टीका केली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब शिवरकर, मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, आयोजक व्यंकट बिरादार, "साहित्य शिवार'चे जयराम देसाई उपस्थित होते. 

सबनीस म्हणाले, ""सध्या इतिहासातून मोघलांचे धडे वगळले जात आहेत. सरकारी विद्वानांच्या कृपाशीर्वादाने हे पाप घडत आहे. ताजमहलला तेजोमहाल म्हटले जात आहे. गोरक्षकांच्या प्रश्‍नावरून अल्पसंख्याक समाजाला धोके निर्माण होत आहेत. गांधी-नेहरूंचा कधी नव्हे इतका द्वेष होत आहे. आजच्या सरकारच्या काळातील हे चित्र चिंताजनक आहे. लोकशाही मूल्य जपणारे विलासराव आज असते तर महाराष्ट्राचे चित्र निराळे असते.'' हर्षवर्धन पाटील यांच्याकडे पुढची काही वर्षे भरपूर रिकामा वेळ असणार आहे. त्यामुळे त्यांनी विलासरावांच्या आठवणी लिहाव्यात, अशी टिप्पणीही त्यांनी केली. 

त्यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता 
""विलासरावांची आठवण निघाली की हृदय दाटून येते. ते आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्‍वास बसत नाही. ते असते तर नक्कीच पंतप्रधान झाले असते. तितकी त्यांच्यात क्षमता होती. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे, देशाचे मोठे नुकसान झाले आहे. ते सर्वांनाच आपले वाटायचे. सत्ता असो की नसो त्यांच्याभोवती कायम गर्दी असायची. ते "मासलिडर' होते. आमच्यासारख्यांना त्यांनीच घडवले. पुढे आणले. मोठी पदे दिली,'' अशा शब्दांत पाटील यांनी आठवणींना उजाळा दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com