विमाननगर सर्वांत "स्मार्ट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

विविध प्रश्‍नांवर पुण्याची नेमकी स्थिती काय, हे सहजपणे समजावे, यासाठी वेगळ्या दृष्टिकोनातून शहराकडे पाहण्याचा प्रयत्न "चेंजभाई डॉट इन' या स्टार्टअपने केला आहे. त्याद्वारे शहराचा मध्यवर्ती भाग आणि उपनगरांना गुणांकन देण्यात आले. अर्थात ज्यांचे गुणांकन चांगले तो भाग शहरातील चांगला भाग ठरणार आहे. यातून "सर्वांत चांगले विभाग' आणि "सर्वांत वाईट विभाग' या दोन भागांत वर्गीकरणही करता येणार आहे. 

पुणे - विमाननगर पुण्याच्या पूर्वेला वसलेले उपनगर. ते तुलनेने शहरातील सर्वांत कमी समस्या असलेले उपनगर ठरले आहे. "चेंजभाई डॉट इन'ने केलेल्या पाहणीत विमानगरमधील समस्या शहराच्या इतर भागांपेक्षा खूपच सौम्य असल्याचे आढळून आले. या पाहणीसाठी रस्ते, कचरा, वाहतूक कोंडी अशा एकूण 19 समस्यांचा विचार केला आहे. "स्मार्ट सिटी'मध्ये समावेश केलेले औंध तिसऱ्या क्रमांकावर, तर बड्या व्यक्तींचा निवास असलेले कोरेगाव पार्क चौथ्या स्थानी आहे. 

"चेंजभाई डॉट इन' दर आठवड्याला शहर आणि उपनगरांतील समस्यांची पाहणी करून त्याचे संगणकीय विश्‍लेषण करते. वरील चित्र मागच्या पंधरवड्यातील आहे. पुण्याचे "सेंटर' असलेल्या शिवाजीनगरमध्ये खराब रस्ते ही सर्वांत मोठी समस्या आहे. त्याखालोखाल पादचारी मार्ग, कचरा, अवैध फलके आणि पार्किंग या समस्यांचा क्रमांक लागतो. हा परिसर किती सुरक्षित आहे, या निकषावर शिवाजीनगर दहापैकी सहा गुण मिळवत कसेबसे पास झाले आहे. 

निवडलेल्या 19 समस्यांच्या निकषांवर शहरातील सर्व भागांची पाहणी करण्यात येते. त्यासाठी केवळ छायाचित्रे आणि व्हिडिओ हेच माध्यम वापरले जाते. उदा. शिवाजीनगर भागात चमू जातो आणि या 19 समस्यांचे छायाचित्रण करतो. मिळालेल्या माहितीचे संगणकीय विश्‍लेषण करण्यात येते आणि त्याद्वारे त्या कालावधीत संबंधित भागात कोणते महत्त्वाचे विषय ठरले, हे निश्‍चित केले जाते. अशा प्रकारे शहरातील वीसहून अधिक भागांतून माहिती मिळवून त्याचे विश्‍लेषण केले जाते. 

Web Title: pune news vimannagar smart