"ज्ञानपीठ'काराचे लवकरच कोल्हापूरमध्ये स्मारक 

"ज्ञानपीठ'काराचे लवकरच कोल्हापूरमध्ये स्मारक 

पुणे - 
असे जगावे दुनियेमध्ये, 
आव्हानाचे लावून अत्तर... 
नजर रोखुनी नजरेमध्ये, 
आयुष्याला द्यावे उत्तर... 

अशा अनेक कवितांमधून वाचकांना प्रेरणा देणारे, कधी खळखळून हसविणारे तर कधी गंभीर होऊन विचार करायला लावणारे कविवर्य विंदा करंदीकर यांचे स्मारक उभे राहण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी आणि कोल्हापूर येथील "न्यू इंग्लिश स्कूल'ने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांमध्ये हे स्मारक आकाराला येणार आहे. 

"तेच ते नि तेच ते', "तुकोबाच्या भेटी शेक्‍सपिअर आला', "जितकी डोकी तितकी मते', "माझ्या मना बन दगड' अशा कितीतरी कवितांमधून विंदांनी सामाजिक स्थितीवर भाष्य केले. या कविता जितक्‍या लोकप्रिय झाल्या तितक्‍याच त्यांच्या बालकविताही गाजल्या. साहित्यातील योगदानाबद्दल त्यांचा "ज्ञानपीठ पुरस्कारा'नेही सन्मान झाला होता. त्यांची जन्मशताब्दी उद्यापासून (ता. 23) सुरू होत आहे. या पार्श्‍वभूमीवर, "सकाळ'ने त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. 

विंदांच्या कन्या जयश्री काळे म्हणाल्या, ""विंदांचे शिक्षण कोल्हापूरमध्ये झाले. त्यामुळे तेथील शाळेने विंदांचे स्मारक उभारण्याची कल्पना आमच्यासमोर मांडली. त्यासाठी जागा देण्याची तयारीही शाळेने स्वत:हून दर्शवली आहे. त्यामुळे तेथे स्मारक उभारण्याचे आमचे एकत्रित प्रयत्न सुरू आहेत. स्मारकात विंदांची पुस्तके, दुर्मिळ हस्तलिखिते, छायाचित्र, त्यांच्या ध्वनिफिती, त्यांना मिळालेले काही सन्मान... अशा अनेक वस्तू पाहायला मिळतील. पुस्तके वाचायला मिळतील. याशिवाय, आम्ही कुटुंबीय महाराष्ट्रात ठिकठिकाणी जाऊन त्यांच्या कवितांचे वाचन करतोय. विंदा आयुष्याचा कशा पद्धतीने विचार करत होते, त्यांची जीवनदृष्टी कशी होती, वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्व कसे होते... हे नव्या पिढीला समजावे, या उद्देशाने काव्यवाचन करत आहोत.'' 

बालकवितांचे संग्रह पुन्हा वाचकांसमोर 
""विंदांचे बालकविता संग्रह गेल्या आठ वर्षांपासून बाजारात उपलब्ध नव्हते. वाचकांकडून सातत्याने या कविता संग्रहांबद्दल विचारणा होत होती. त्यामुळे "राणीची बाग', "सशाचे कान', "ऐटू लोकांचा देश', "परी गं परी', "अडम्‌ तडम्‌', "सात एके सात', "बागुलबुवा', "पिशी मावशी आणि तिची भुतावळ', "एकदा काय झाले', "सर्कसवाला' हे बालकविता संग्रह आम्ही नव्याने वाचकांसमोर आणत आहोत.

जन्मशताब्दीनिमित्ताने या संग्रहांचे लवकरच प्रकाशन होईल'', अशी माहिती पॉप्युलर प्रकाशनाच्या अस्मिता मोहिते यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com