कात्रजचा कचरा प्रकल्प बंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

पुणे - कात्रजमध्ये लाखो रुपये खर्च करून महापालिकेने कचरा प्रकल्प उभारला आहे. त्याच्या देखभाल व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत नसल्याने गेल्या पाच महिन्यांपासून तो बंद आहे. शहरात नवे प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन असताना, जुन्या प्रकल्पांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत होत असल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे. 

पुणे - कात्रजमध्ये लाखो रुपये खर्च करून महापालिकेने कचरा प्रकल्प उभारला आहे. त्याच्या देखभाल व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत नसल्याने गेल्या पाच महिन्यांपासून तो बंद आहे. शहरात नवे प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन असताना, जुन्या प्रकल्पांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत होत असल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे. 

कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या कात्रज येथील फुलराणीच्या शेजारील दहा गुंठे जागेत हा प्रकल्प उभारला आहे. यासाठी 2011मध्ये सुमारे 50 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. खासगी कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प चालविण्यात येत आहे. उभारणीनंतर पुढील सहा वर्षे म्हणजे, जानेवारी 2017पर्यंत प्रकल्प सुरू होता. या काळात त्याची क्षमता दुप्पट म्हणजे जवळपास दहा टन इतकी झाली. अपेक्षित वीजनिर्मिती होत असल्याने प्रकल्पासह आजूबाजूच्या परिसरात पदपथावरील दिव्यांसाठी तिचा वापर करण्यात आला. याप्रकल्पाची आणखी क्षमता वाढविण्याची मागणी नगरसेवक वसंत मोरे यांनी लावून धरली. त्यानुसार नियोजन करण्याचे आश्‍वासनही त्यांना देण्यात आले. प्रत्यक्षात प्रकल्पाची क्षमता वाढविण्याऐवजी त्याच्या देखभाल-दुरुस्तीकडेच दुर्लक्ष झाल्याने हा प्रकल्प सध्या बंद पडला आहे. 

शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नवी प्रकल्प उभारण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. त्याबाबत राज्य सरकारला आराखडाही सादर केला आहे. मात्र यशस्वी झालेले प्रकल्प व्यवस्थितपणे चालविता येत नसतील, नव्या प्रकल्पांचे काय होणार, असा प्रश्‍न यानिमित्ताने विचारला जात आहे. 

हा प्रकल्प यशस्वी झाला असून, त्याची क्षमताही वाढविण्यात आली होती. त्यामुळे अशा प्रकल्पांवर अधिक देण्याची गरज होती. मात्र त्याची देखभाल-दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यासाठी निधीही दिला जात नसल्याने सध्या बंद आहे. गेल्या पाच महिन्यांपासून पाठपुरावा करूनही निधी उपलब्ध करण्यात आला नाही. 
- वसंत मोरे, नगरसेवक 

कात्रजचा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याची देखभाल-दुरुस्तीही नियमित करण्यात येईल. 
-सुरेश जगताप, प्रमुख, घनकचरा विभाग, महापालिका 

Web Title: pune news waste project katraj pmc