पाण्याचा बेकायदा वापर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

पुणे - अवैध बांधकामे उभारण्यापाठोपाठ म्हात्रे पूल ते राजाराम पुलापर्यंतच्या काही व्यावसायिक बेकायदा नळजोड घेऊन पाण्याचा बेसुमार वापर करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिसरातील मंगल कार्यालये, लॉन आणि हॉटेल व्यावसायिकांनी जेमतेम अर्धा ते एक इंच नळजोडणी घेतल्याची महापालिकेकडे नोंद आहे. प्रत्यक्षात हिरवळ, झाडे आणि स्वच्छतेच्या कामांसाठीदेखील पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याचे या व्यावसायिकांकडील कामगारांनी सांगितले.

म्हात्रे पूल ते राजाराम पुलाच्या दोन्ही बाजूना जवळपास साठपेक्षा अधिक व्यावसायिक असूनही त्यातील केवळ २८ जणांनी कायदेशीर नळजोडणी घेतली आहे. तर गेली पाच-सात वर्षे बेकायदा पाणीपुरवठा घेतलेल्या १२ व्यावसायिकांचे नळजोड तोडल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले. तसेच या व्यावसायिकांनी गेल्या चार वर्षांत मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे केली आहेत. ती पाडण्याचा आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) महापालिका आणि पाटबंधारे विभागाला दिला आहे. 

या आदेशाचे पालन करण्यात येणार असल्याचे दोन्ही यंत्रणांनी जाहीर केल्यानंतरही या बांधकामांकडे दुर्लक्ष होत असल्याचे सध्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. या व्यावसायिकांनी मंगल कार्यालये, लॉन आणि हॉटेलसाठी अनधिकृत नळजोड घेतले आहेत. या मिळकतींच्या पाहणीदरम्यान बेकायदा नळजोड तपासण्यात आले. त्यात जेमतेम १२ व्यावसायिकांकडे बेकायदा नळजोड असल्याचे पाणीपुरवठा खात्याला आढळून आले. उर्वरित व्यावसायिक पिण्याच्या पाण्याचा किती वापर करतात, त्यांच्याकडील नळजोडणीचे स्वरूप आणि परवानग्या याची कोणतीही माहिती पाणीपुरवठा खात्याकडे नाही. त्यामुळे हे व्यावसायिक सर्रास बेकायदेशीररीत्या पाण्याचा वापर करीत असल्याचे सिद्ध होत आहे. 

नदीपात्रातील मिळकतीकडील पाणीपुरवठ्याची पाहणी करण्यात आली असून, परिसरातील २८ व्यावसायिकांकडे अधिकृत नळजोडणी आहे. ज्यांच्याकडे बेकायदा नळजोडणी आढळून आली, ती लगेच तोडण्यात आली आहे. बेकायदा नळजोड घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. 
- व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

Web Title: pune news water illegal use