‘ससून’च्या प्रयोगशाळेत पाणीगळती!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

देखभाल दुरुस्तीअभावी इमारतीचे आयुष्य कमी; बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांची माहिती

देखभाल दुरुस्तीअभावी इमारतीचे आयुष्य कमी; बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांची माहिती

पुणे - गर्भवतींची आरोग्य तपासणी होणाऱ्या जागेतच थेट पडणारे पावसाचे पाणी, प्रयोगशाळांमध्ये स्लॅबमधून ठिबकणारे पाणी साठवण्यासाठी ठिकठिकाणी ठेवलेल्या बादल्या आणि जागोजागी भिंतींना आलेली ओल अशा अवस्थेत ससून रुग्णालयात रुग्णसेवा सुरू असल्याचे चित्र मंगळवारी दिसले. देखभाल दुरुस्तीअभावी सुमारे साठ वर्षांच्या या इमारतीचे आयुष्य वेगाने कमी होत असल्याचे ‘निदान’ही बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले.
पुण्यात सोमवारी मॉन्सूनचा पहिला पाऊस कोसळला. त्यामुळे ससून रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात पाणी शिरले. त्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांसह ससून रुग्णालयाच्या केलेल्या पाहणीतून हा निष्कर्ष पुढे आला आहे. 

स्त्रीरोग व प्रसूती विभागात साचलेले पाणी
गर्भवतींच्या आरोग्याची तपासणी होत असलेल्या भागात पावसाचे पाणी थेट आतमध्ये शिरले. काही कळायच्या आत बाहेरच्या पावसाच्या सरी गर्भवती बसलेल्या ठिकाणी येऊ लागल्या. त्याठिकाणी गर्भवतींचे रक्त तपासणीसाठी घेतले जात होते. त्याच वेळी पावसाला सुरवात झाल्याने तेथे एकच धांदल उडाली. गुळगुळीत फरशीवर पावसाचे पाणी पडल्याने तेथून चालतानाही गर्भवतींना कसरत करावी लागत असल्याची माहिती यातून पुढे आली. त्यावर पर्याय म्हणून पाणी येणाऱ्या ठिकाणी प्लॅस्टिक टाकण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातून देण्यात आली. 

प्रयोगशाळेच्या भिंतीवर पाण्याची गळती
प्रयोगशाळेच्या भिंतीवर पाण्याची गळती होत असल्याची तक्रार येथील डॉक्‍टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. मात्र, त्यावर तात्पुरती डागडुजी करण्याचे कष्टही अधिकाऱ्यांनी घेतले नसल्याची माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली. अंतर्गत जलवाहिन्यांमधून रुग्णालयाच्या भिंतींमध्ये पाणीगळती सातत्याने होतेच; पण पावसाळ्यात पाण्याच्या अक्षरशः धारा लागतात. हे पाणी साठवण्यासाठी ठिकठिकाणी प्लॅस्टिकचा कागद घालून बादल्या ठेवाव्या लागतात. अशा परिस्थितीत तेथे रुग्णाच्या रोगनिदानाचे काम चालते, अशी टिप्पणीही एका कर्मचाऱ्यांनी केली. 

वैद्यकीय अधीक्षकांच्या कक्षेजवळही स्लॅबगळती
ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या कक्षेजवळही बादली ठेवल्याचे दिसले. रुग्णालयातील अंतर्गत जलवाहिन्यांची नियमित देखभाल दुरुस्ती झाली नाही, त्यामुळे पाण्याची गळती होत असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.

इमारतीला झालेला ‘कॅन्सर’
बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी ‘सकाळ’बरोबर या इमारतीची पाहणी केली. ठिकाठिकाणी होणारी पाण्याची गळती, त्यामुळे भिंतींना आलेली ओल यामुळे इमारतीचे आयुष्य कमी होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. अत्यंत मजबूत अशा इमारतीला झालेला हा ‘कॅन्सर’ आहे, अशा शब्दांत त्यांनी या स्थितीचे वर्णन केले.

देखभाल दुरुस्तीसाठी निधी नाही
ससून रुग्णालयाचे सुमारे दहा लाख चौरस फूट बांधकाम आहे. तेथे सुमारे चार हजार रुग्ण दररोज येतील, याप्रमाणे पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. पण, रुग्णालयात आठ ते दहा हजार रुग्ण येतात. त्यामुळे येथील इमारतीची नियमित देखभाल दुरुस्ती आवश्‍यक आहे. पण, गेल्या वर्षभरापासून देखभाल दुरुस्तीचा निधी सार्वजनिक बांधकाम खात्याने मंजूर केलेला नाही. त्यामुळे रुग्णालयाचे आरोग्य धोक्‍यात आल्याची माहिती जाणकारांनी दिली.

Web Title: pune news water leakage in sasoon hospital laboratory