‘मेघदूत’मधून पाणीबचतीचा संदेश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

पुणे - कवी कालिदास रचित ‘मेघदूत’ या अभिजात खंडकाव्याचे रंगमंचावर नाट्य स्वरूपात सादरीकरण करताना पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या संयोजनातून प्रवेश या संस्थेने नाट्य स्वरूपात तो सादर केला. 

पुणे - कवी कालिदास रचित ‘मेघदूत’ या अभिजात खंडकाव्याचे रंगमंचावर नाट्य स्वरूपात सादरीकरण करताना पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या संयोजनातून प्रवेश या संस्थेने नाट्य स्वरूपात तो सादर केला. 

कडव्यांच्या या रचनेचे ‘पूर्वमेघ’ आणि ‘उत्तरमेघ’ अशा दोन भागांत नाटक स्वरूपात सादरीकरण केले. रामगिरीतील विरह व्याकूळ यक्षाने अलकापुरीला जाऊन आपल्या प्रेयसीला आपले क्षेमकुशल सांगणारा संदेश घेऊन जाण्याची वर्षा ऋतूतील मेघाला केलेली विनंती, या मार्गातील डोंगरदऱ्या, नद्या, तिथला निसर्ग, रम्य परिसर याचे वर्णन पूर्वमेघात करण्यात आले आणि उत्तरमेघात यक्षाने विरहवण्यात होरपळणाऱ्या आपल्या पत्नीला द्यावयाचा उत्कट संदेश कथन केला. 

भरत नाट्यम व कथक अशी मिश्र नृत्य शैली आणि सारंगी, सतार, सरोद, तबला, पखवाज अशा केवळ पारंपरिक वाद्यांचा वापर हे या नाटकाचे एक वैशिष्ट्य होते. प्रथम पटवारी यांनी लेखन केले. निखिल शेटे यांनी या प्रयोगाचे दिग्दर्शन केले. जयदीप वैद्य आणि शमिका भिडे यांनी सहभाग घेतला.
कोथरूड मतदारसंघात पाणी बचतीसाठी रेनवॉटर हार्वेस्टिंगसारखे प्रकल्प राबविण्यासाठी जनजागृती करणार असल्याची माहिती आमदार कुलकर्णी यांनी दिली. खासदार अनिल शिरोळे, व्यंग्यचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी पाण्याचे महत्त्व सांगून पाणी बचत करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध होण्याचे आवाहन केले.

मेघदूतसारख्या नाटकांचे प्रयोग महत्त्वाचे
पाणी हे जीवन आहे. पाणी वाचविण्यासाठी जनजागृती करण्याची आवश्‍यकता आहे, त्यासाठी  मेघदूतासारख्या नाटकांचे प्रयोग महत्त्वाचे असल्याचे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. 

Web Title: pune news water saving message in meghdoot