कमी पावसामुळे विदर्भात पाणीटंचाईचे संकट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

पुणे - राज्यातील धरणांमधील 15 ऑक्‍टोबरपर्यंतच्या पाणीसाठ्यावरून आगामी रब्बी हंगाम आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात येते. त्यानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पुणे आणि कोकण विभागात सर्वाधिक पाऊस झाला आहे. मात्र, अमरावती आणि नागपूर विभागात तुलनेने कमी पाऊस झाल्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गहिरे होण्याची भीती राज्य जलसंपदा विभागाकडून व्यक्त केली जात आहे.

राज्यातील पाणीसाठ्याचा आढावा जलसंपदा विभागाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार पुणे विभागामध्ये गेल्यावर्षी सुमारे 89.91 टक्के पाणीसाठा झाला होता. या वर्षी 91.10 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे सुमारे 1.19 टक्के पाणीसाठा जास्त झाला आहे.

राज्यात पुणे विभाग हा पाणीसाठ्यामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. राज्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागात पावसाचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्यावर्षी 93.53 टक्के पाणीसाठा होता. यंदा 94.93 टक्के साठा झाला आहे.

राज्यात पाणीसाठ्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर नाशिक विभाग आहे. नाशिकमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी असला, तरी समाधानकारक स्थिती आहे. सध्या या विभागातील धरणांमध्ये सुमारे 83.75 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी 88.71 टक्के पाणीसाठा झाला होता. मराठवाडा विभागात दिलासादायक परिस्थिती आहे. या विभागामध्ये सुमारे 70.04 टक्के पाणीसाठा झाला आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी आहे. गेल्यावर्षी या विभागात सुमारे 77.78 टक्के पाणीसाठा झाला होता.

विदर्भातील धरणांत कमी पाणीसाठा !
नागपूर आणि अमरावतीचे प्रमाण पाहता, भविष्यात पाण्याबाबतीत स्थिती चिंताजनक होण्याची शक्‍यता आहे. नागपूर विभागात गेल्यावर्षी 58.65 टक्के पाणीसाठा होता. यंदा 43.43 टक्केच धरणे भरली गेली आहेत. अमरावती विभागाची स्थिती गंभीर आहे. गेल्यावर्षी 78.10 टक्के पाणीसाठा असलेल्या या विभागात यंदा जेमतेम 40.95 टक्के पाणीसाठा धरणांमध्ये असल्याने भविष्यात पाणीटंचाईची शक्‍यता निर्माण झाली आहे.

Web Title: pune news water shortage disaster