पुणे: परिटेवाडीच्या उत्तुंग धबधब्याची पर्यटकांना साद

गणेश बोरुडे
मंगळवार, 25 जुलै 2017

मावळखेडच्या सीमेवरील वरसूबाईची डोंगररांग पावसाळ्यात अगदी मोहरुन जाते. कधी धो धो तर कधी रिमझिम पाऊस, कधी ऊन तर कधी दाट धुके असे निसर्गाविष्कार पावसाळ्यात इथे दिवसभर पहावयास मिळतात. उंच कड्यांवरुन स्वतःला झोकून देणारे छोटे मोठे धबधबे अगदी पर्यटकांच्या साहसाला उद्दीपित करणारे असतात.

तळेगाव स्टेशन : हिरव्यागार वनराईची दुलई पांघरलेला मावळ खेड तालुक्याच्या सीमेवरील वरसूबाईच्या डोंगरावरुन आंदर मावळातील इंगळूण-परिटेवाडी परिसरात फेसाळत वाहणारे धबधबे आणि येथील निसर्गसौदर्य चिंब भटकंतीसाठी आसुसलेल्या हौशी पर्यटकांना पर्वणीच आहे. इंगळूण-परिटेवाडीच्या गावकुसाचा अडीचशे फुटांवरुन कोसळणारा उत्तुंग शुभ्र धबधबा धबधबा पर्यटकांना खुणावत साद घालत आहे.

मावळखेडच्या सीमेवरील वरसूबाईची डोंगररांग पावसाळ्यात अगदी मोहरुन जाते. कधी धो धो तर कधी रिमझिम पाऊस, कधी ऊन तर कधी दाट धुके असे निसर्गाविष्कार पावसाळ्यात इथे दिवसभर पहावयास मिळतात. उंच कड्यांवरुन स्वतःला झोकून देणारे छोटे मोठे धबधबे अगदी पर्यटकांच्या साहसाला उद्दीपित करणारे असतात. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पाणी कड्यांवर दरीत न कोसळता उलटे हवेत उडते त्यामुळे उलट्या धबधब्यांचे मनोहारी दृश्य इथे जागोजागी पाहवयास मिळते. सोनेरी भातशेतांतून, घनदाट झाडीमधून डोंगराकडे जाणाऱ्या वाटा आणि धबधब्याखाली डोंगराच्या कपारीत बसण्याचा वेगळाच आनंद इथे अनुभवायास मिळतो. पैकी इंगळून परिटेवाडीचा साधारणतः अडीचशे फूट उंचावरुन कोसळणारा धबधबा कदाचित मावळ तालुक्यातील सर्वात मोठा धबधबा ठरावा एवढा अजस्त्र आहे.

परिटेवाडीच्या गावकुसाला अगदी अर्धा-पाऊण किलोमीटरवरच असलेला हा महाकाय धबधबा साधारणतः जुलै ते सप्टेंबर असे जवळपास तीन महिने किमान प्रवाहित राहतो. मात्र पुरेसा प्रचार आणि सुविधा नसल्याने अद्यापही हा धबधबा चोखंदळ पर्यटकांच्या दृष्टीक्षेपापासून दूरच आहे.पर्यटन आणि वनविभागाने संयुक्तरित्या या आणि जवळपासच्या इतर धबधब्यांकडे जाणारे साधारणतः जास्तीत जास्त अर्धा किलोमीटरपर्यंतचे रस्ते बनवून लोखंडी कठडे बसविल्यास, पर्यटनदृष्ट्या बाकी नैसर्गिक सुरक्षितता इथे आहेच. तळेगावहून पुढे निगडे कशाला मार्गे अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या या धबधब्याचा विकास केल्यास आजपावेतो पर्यटकांच्या नजरेआड असेलेले एक लुप्त पर्यटनस्थळ पर्यटकांच्या दिमतीला उतरेल. आजमितीला मावळातील पवन मावळ आणि लोणावळा-खंडाळ्याचे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी येणारे पर्यटक आगामी काळात निश्‍चितपणे इंगळूण-परिटेवाडी परिसरातील धबधब्याकडेही मोठ्या संख्येने वळतील, असा विश्‍वास तरुणांनी व्यक्त केला. पर्यटकांचा ओघ वाढलयास इंगळून, परिटेवाडी, कुणे, माळेगाव, पिंपरी, कशाळ आदी दुर्गम भागांतील अनेक आर्थिक दुर्बलांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होऊन विकासाला चालना मिळेल.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: Pune news waterfall in Paritewadi