मुलींच्या जन्माचे स्वागत - डॉक्‍टरांचे व्हावे जनआंदोलन

नंदकुमार सुतार
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

पुणे - नेहमीच नवे लोकहितकारी पायंडे पाडणाऱ्या पुण्याने मुलींच्या जन्माचे आगळेवेगळे स्वागत करावे, येथील सर्व डॉक्‍टरांनी मुलगी जन्माला आली तर बाळंतपण निःशुल्क करावे... ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या सूचना आल्या, त्यात ही सूचनादेखील होती. खरेच असे झाले, तर ऐतिहासिक पुणे शहराने पुन्हा नवा इतिहास लिहिलेला असेल. हे शक्‍य आहे?

पुणे - नेहमीच नवे लोकहितकारी पायंडे पाडणाऱ्या पुण्याने मुलींच्या जन्माचे आगळेवेगळे स्वागत करावे, येथील सर्व डॉक्‍टरांनी मुलगी जन्माला आली तर बाळंतपण निःशुल्क करावे... ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या सूचना आल्या, त्यात ही सूचनादेखील होती. खरेच असे झाले, तर ऐतिहासिक पुणे शहराने पुन्हा नवा इतिहास लिहिलेला असेल. हे शक्‍य आहे?

मुलींचा जन्म हा तसा नेहमीच चर्चेचा विषय; परंतु एका मातेने पोटच्या नवजात मुलीला नदीत फेकून देण्याच्या घटनेनंतर सर्वजण हळहळले. केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज संस्था, सरकारी रुग्णालये मुलींच्या जन्मासाठी विविध उपक्रम राबवत असताना, सवलती आणि रोख बक्षिसे देत असतानाही अशा घटना का थांबत नाहीत, हा मोठा प्रश्‍न आहे. या विषयावर समाजातील विविध घटकांना व्यक्त व्हायचे आहे, हे लक्षात घेऊन या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महिला संघटना, महिला प्रतिनिधींनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना, अनेक चांगले उपायदेखील सुचवले. 

कुटुंबांचे, समाजमनाचे परिवर्तन हा चर्चेचा धागा होता, त्यासाठी दीर्घकालीन उपाय योजनांबरोबरच प्रत्येक घटकाने आपले योगदान देण्याची गरज आहे, असा सूर चर्चेतून निघाला. खरेच हा खूप गहन विषय आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार मुलींसाठी जगात सर्वांत धोकादायक देश भारत आहे.

येथे शंभर मुली जन्माला येणार असतील, तर ७५ मुलींची जन्मापूर्वीच हत्या होते; केवळ २५ मुली हे जग पाहू शकतात. समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपला वाटा उचलल्यास ही परिस्थिती बदलली जाऊ शकते. परंतु, ही सामाजिक लढाई खूप मोठी आहे, प्रदीर्घ काळ चालणार आहे. असे असले तरी काही पावले तत्काळ उचलण्यासारखी आहेत. 

बैठकीतील चर्चेनुसार, बाळंतपण रुग्णालयांमध्येच होण्याची संख्या आता वाढली आहे. मग ते सरकारी रुग्णालय असेल किंवा खासगी. ही वस्तुस्थिती पाहता डॉक्‍टर मंडळी अशा दांपत्यांच्या सर्वाधिक जवळचे घटक आहेत.

त्यामुळे त्यांची सर्वाधिक जबाबदारी आहे. अनेक डॉक्‍टरांनी या मोहिमेमध्ये स्वतःला झोकून दिले आहे; परंतु हे डॉक्‍टरांचे जनआंदोलन होण्याची गरज आहे आणि त्यासाठी प्रत्येक खासगी रुग्णालयाने मुलगी जन्माला आली तर बाळंतपण निःशुल्क करावे. निःशुल्क शक्‍य नसेल, तर सवलतीच्या दरात करावे, जो खर्च सामान्य कुटुंबाला पेलवणारा असावा. सरकारी किंवा पालिकेच्या रुग्णालयांमध्ये निःशुल्क ‘डिलिव्हरी’ होतातच. यात खासगी, कॉर्पोरेट क्षेत्राचा सहभाग वाढला, तर नक्कीच परिस्थिती सुधारू शकेल. ज्यांचे हॉस्पिटल नाही; पण ते तज्ज्ञ आहेत, त्यांनी या मोहिमेत आपले योगदान म्हणून शुल्क आकारू नये.

हे कसे जमेल?
पुण्यातीलच मेडिकेअर हॉस्पिटलचे डॉ. गणेश राख यांनी सात वर्षांपूर्वी आपणच पुढे येऊन योगदान देऊ, या विचाराने मुलीच्या जन्माचे आपल्या रुग्णालयात आगळ्यावेगळ्या स्वागताची परंपरा सुरू केली. मुलगी झाली की ‘डिलिव्हरी चार्जेस’ शून्य आणि रुग्णालयात उत्सव. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत सुमारे सातशेवर मुली जन्माला आल्या. या उपक्रमामुळे पालकांचे मनपरिवर्तन होत आहे, असे लक्षात आल्यानंतर त्यांनी अन्य रुग्णालयांना अनुभव सांगितले आणि बरीच रुग्णालये पुढे आली. डॉ. राख यांच्या माहितीनुसार, आजघडीला शहरात शंभरावर खासगी रुग्णालये मुलींच्या जन्माचे असे आगळेवेगळे स्वागत करत आहेत. 

‘नोबल’चाही सहभाग
नोबल हॉस्पिटलचे डॉ. दिलीप माने यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत मुलींच्या जन्माचे स्वागत करून ते पालकांनाही काही सवलती देतात. मुलगी जन्माला आली तर बिलामध्ये ६० टक्के सवलत आणि मुलगी एक वर्षाची होईपर्यंत तिची तपासणी आणि वैद्यकीय सल्ला निःशुल्क आहे, शिवाय मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत सर्व प्रकारच्या शुल्कामध्ये २० टक्के सूट देण्यात येते, असे सांगताना ‘मुलीच्या जन्माचे आम्ही सेलिब्रेशन करतो’, असे डॉ. माने अभिमानाने सांगतात. पुण्यात ही चळवळ जोर धरत आहे, त्यामुळे मुलींच्या जन्माचे अशा पद्धतीने ‘सेलिब्रेशन’ करणारे देशातील पहिले शहर म्हणून मान मिळू शकेल. आता उर्वरित रुग्णालयांनी या मोहिमेत उडी घ्यावी. यासाठी गणेशोत्सवापेक्षा दुसरा कोणता चांगला मुहूर्त असेल?

करमाळा ठरणार राज्यातील पहिला तालुका
कसलेही शुल्क न आकारता मुलींच्या जन्माचे स्वागत करणाऱ्या डॉ. गणेश राख यांनी हे काम स्वतःपुरते मर्यादित न ठेवता देशभर याचा प्रसार करण्याचे ठरवले. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. राख यांच्या अनुभवानुसार, ‘या मोहिमेत योगदान देण्याची अनेक डॉक्‍टरांची इच्छा आहे, त्यामुळेच अशा डॉक्‍टरांची संख्या काही हजार झाली आहे. एकट्या महाराष्ट्रात पाच हजारांवर डॉक्‍टरांनी या मोहिमेत सहभाग घेतला आहे.

करमाळा तालुक्‍यातील सर्व डॉक्‍टर, नर्सिंग होमनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, येत्या १५ सप्टेंबर रोजी शहरात ‘बेटी बचाव’ची हाक देत मोठी रॅली काढून, सर्व मॅटर्निटी होम्स ‘मुलींच्या जन्माचे स्वागत कसलेही शुल्क न आकारता आम्ही आमच्या रुग्णालयात करू’, अशी सामूहिक घोषणा करणार असल्याचे डॉ. राख यांनी सांगितले. पुण्यातील कॉर्पोरेट रुग्णालयांनी आता या मोहिमेत उतरून नवा आदर्श निर्माण करावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.

(‘सकाळ’ला कळवा - आपण किंवा आपले रुग्णालय मुलींसाठी अशा स्वरूपाचे काम करत असल्यास जरूर ‘सकाळ’ला कळवा, आपल्या उपक्रमांना प्रसिद्धी दिली जाईल.)

Web Title: pune news welcome girl born