व्हॉट्‌सॲपमुळे ज्येष्ठांचे ‘भेटीविना संवादू’

सुवर्णा चव्हाण 
शनिवार, 1 जुलै 2017

पुणे - ‘काय, आज बालगंधर्व रंगमंदिरात नाटक पाहायचे का?’, ‘मी रोज योगा करतो, सुनील तू पण करत जा’, ‘महाबळेश्‍वरची ट्रीप मस्त झाली, पुन्हा जाऊयात...’ असा संवाद त्यांच्या व्हॉट्‌सॲप ग्रुपवर दररोजच होतो... नोकरी अन्‌ कामानिमित्त बाहेर असणाऱ्या मुलांना त्यांच्यासाठी वेळ नाही... पण काय झाले... ज्येष्ठांनी यावर तोडगा काढत व्हॉट्‌सॲप ग्रुपद्वारे आपला वेगळा विरंगुळा शोधला आहे. मित्र-मैत्रिणींच्या संवादासह आरोग्याशी निगडित गप्पा असो वा एखाद्या सहलीतील भन्नाट अनुभव... या ग्रुपच्या माध्यमातून शेअर केले जात असून, अनेक ज्येष्ठांसाठी हे ग्रुप एक आधारवड बनले आहेत.

पुणे - ‘काय, आज बालगंधर्व रंगमंदिरात नाटक पाहायचे का?’, ‘मी रोज योगा करतो, सुनील तू पण करत जा’, ‘महाबळेश्‍वरची ट्रीप मस्त झाली, पुन्हा जाऊयात...’ असा संवाद त्यांच्या व्हॉट्‌सॲप ग्रुपवर दररोजच होतो... नोकरी अन्‌ कामानिमित्त बाहेर असणाऱ्या मुलांना त्यांच्यासाठी वेळ नाही... पण काय झाले... ज्येष्ठांनी यावर तोडगा काढत व्हॉट्‌सॲप ग्रुपद्वारे आपला वेगळा विरंगुळा शोधला आहे. मित्र-मैत्रिणींच्या संवादासह आरोग्याशी निगडित गप्पा असो वा एखाद्या सहलीतील भन्नाट अनुभव... या ग्रुपच्या माध्यमातून शेअर केले जात असून, अनेक ज्येष्ठांसाठी हे ग्रुप एक आधारवड बनले आहेत. वैयक्तिक आयुष्यातील समस्या असो वा एखादी शासकीय योजना... अशा कित्येक विषयांवर अगदी सहजपणे ते संवाद साधू लागले आहेत. व्हॉट्‌सॲपसह फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरही त्यांच्यासाठी व्यक्त होण्याचे प्रभावी माध्यम ठरत आहे. 

सोशल मीडियावर तरुणाईची मक्तेदारी आहे, हा समज ज्येष्ठ नागरिकांनी खोडून काढला आहे. ज्येष्ठही आता सोशल मीडियाचा वापर कुशलतेने करत आहेत. ज्येष्ठ नागरिक संघांनी तयार केलेल्या व्हॉट्‌सॲप ग्रुपद्वारेही त्यांना ‘शेअरिंग’चे माध्यम मिळाले आहे. त्याचा सर्वाधिक वापरही होत आहे. पुण्यातील १७० ज्येष्ठ नागरिक संघांकडून ज्येष्ठांशी संबंधित असलेली माहिती पोचविण्यासाठी खास व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केले आहेत.

याबाबत ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) पुणे प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष श्रीराम बेडकीहाळ म्हणाले, ‘‘मी महासंघाच्या पुणे, सातारा आणि सोलापूर विभागाचे काम पाहतो. महासंघाशी ७१० ज्येष्ठ नागरिक संघ जोडले गेले आहेत. त्याचे ३५ हजार सदस्य आहेत. या सर्वांना जोडण्याचे प्रभावी माध्यम ठरले ते व्हॉट्‌सॲप. या तीनही विभागांचे प्रत्येकी १५ व्हॉट्‌सॲप ग्रुप असून, सोशल मीडियाचा कुशलतेने वापर करणारे ज्येष्ठ या ग्रुपमध्ये आहेत. आरोग्य, शासकीय योजना, सांस्कृतिक कार्यक्रम, कौटुंबिक वाद-समस्या आणि मित्र-मैत्रिणींशी मनमोकळा संवाद साधण्यासाठी याद्वारे त्यांना प्रभावी माध्यम मिळाले असून, प्रत्येकजण यावर ॲक्‍टिव्ह आहे.’’

आम्ही पुणे विद्यापीठातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ‘विद्यापीठ कट्टा’ हा ग्रुप केला आहे. त्यातील मी आणि माझे मित्र फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्‌सॲप वापरतो. आमच्या मुलांनी आम्हाला मोबाईल भेट दिले आणि सोशल मीडियाचे रीतसर प्रशिक्षणही. त्यामुळेच प्रत्येक जण त्याचा सहज वापर करू लागला आहे. मित्र-मैत्रिणींशी संवाद साधता येतोच; पण प्रत्येक गोष्टीची माहितीही मिळते. 
- राजा नेर्लेकर, ज्येष्ठ नागरिक

शंभरी गाठलेलेही व्हॉट्‌सॲपवर
आरोग्य वा कौटुंबिक समस्येशी निगडित प्रत्येक गोष्टीवरचे प्रभावी उपाय ज्येष्ठांना आता सहज मिळत आहेत तेही व्हॉट्‌सॲप ग्रुपद्वारे. अगदी शंभरीतले ज्येष्ठही व्हॉट्‌सॲपचा वापर करत आहेत. ‘शतायुषी क्‍लब’ या ग्रुपवर शंभरीतले ८५ ज्येष्ठ आहेत. जे या माध्यमातून मनमोकळा संवाद साधू लागले आहेत.

ज्येष्ठ महिलांकडूनही वापर
भिशी, पाककला व महिला मंडळ अशा कित्येक व्हॉट्‌सॲप ग्रुपद्वारे ज्येष्ठ महिलाही संवाद साधू लागल्या आहेत. घरगुती कार्यक्रम असो वा एखादी रेसिपी... याचे संपूर्ण शेअरिंग व्हॉट्‌सॲपद्वारे करत आहेत. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर ॲक्‍टिव्ह असणाऱ्या महिलांचे प्रमाणही मोठे आहे.

उपक्रमांसाठी नवे व्यासपीठ
नाटकाचे परीक्षण, जुन्या मित्र-मैत्रिणी शोधण्याचे माध्यम, चित्रपटांवरील गप्पा, सहल व अनौपचारिक कार्यक्रमांचे नियोजन, सामाजिक बांधिलकी अशा विविध उपक्रमांसाठी ज्येष्ठ सोशल मीडियाचा वापर करत आहेत. अगदी ४० वर्षांपूर्वी दुरावलेला मित्रही त्यांना फेसबुकवर सहज सापडत आहे; तर उतारवयात आयुष्य पुन्हा एकदा जगण्याची नवी ऊर्मी यातून मिळत आहेत तेही छायाचित्र-व्हिडिओच्या शेअरिंगमधून.

Web Title: pune news whatsapp