‘जीएसटी’चा लाभ कोणाला?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

मालवाहतुकीसाठी लागणाऱ्या इंधनावरील कराविषयी अस्पष्टता
पुणे - जुलै महिन्यापासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू होणार आहे. याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चावर होणार असून, ज्या वस्तूंवरील कर कमी झाला, त्याचा प्रत्यक्ष लाभ उपभोक्‍त्याला मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मालवाहतुकीसाठी लागणाऱ्या इंधनावरील कराविषयी स्पष्टता नसल्यामुळे हा खर्च वाढला, तर त्याचा परिणाम मालाच्या किमतीवर होण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे.

अंमलबजावणीसंदर्भात संभ्रम
नोटाबंदीनंतर जीएसटी हा विषय उद्योग, व्यापार आणि ग्राहक क्षेत्रात जास्त चर्चिला जात आहे. या कराच्या अंमलबजावणीसंदर्भात अद्याप स्पष्टता नसल्याने व्यापारीवर्गात संभ्रम आहे. त्यामुळे विविध व्यापारी संघटनांकडून या कराविषयी कार्यशाळा घेतल्या जात आहेत. सर्व सामान्य ग्राहकांच्या दृष्टीने दैनंदिन आणि जीवनावश्‍यक वस्तू हा भाग महत्त्वाचा असून, सरकारने धान्य करमुक्त केले असले, तरी ब्रॅंड म्हणून विकल्या जाणाऱ्या धान्यावर पाच टक्के कर लागू केला आहे. सध्या बहुतेक धान्य हे ‘ब्रॅंड’म्हणून विकले जात आहे. त्यामुळे प्रत्यक्षात ग्राहकांना त्याचा फटका बसू शकतो. 
 
मालवाहतूक खर्चाचा बोजा
जीसटी कराच्या अंमलबजावणीनंतर खऱ्या अडचणी समोर येतील, असे नमूद करत ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक म्हणाले, ‘‘मालवाहतुकीच्या खर्चाचा बोजा हा नेहमीच उत्पादनाच्या किमतीवर पडतो. पेट्रोल आणि डिझेलवर किती कर लागणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पुढील काळात हा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. ब्रॅंडेड धान्य आणि प्रक्रिया केलेल्या मालावर कर लावला नाही, तर ग्राहकांना नक्कीच दिलासा मिळेल.’’
 
लक्ष ठेवणारी यंत्रणा प्रभावी हवी
जीएसटी करामध्ये सर्वच करांचा समावेश केला आहे. आधीच्या करपद्धतीत मूल्यवर्धित कर आणि अबकारी कर लागू केला जात होता. सर्व सामान्यांच्या दृष्टीने हा कर संमिश्र स्वरूपाचा लाभ देणारा असल्याचे कर सल्लागार अभय बोरा यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘साखर, फरसाण, दुग्धजन्य पदार्थ, एलएडी दिवे, मेणबत्ती, केसांचे तेल, टूथ पावडर, टूथपेस्ट, साबण आदी वस्तूंवरील कर कमी झाला असला, तरी त्याचा प्रत्यक्षात लाभ उपभोक्‍त्याला मिळणे आवश्‍यक आहे. त्याची अंमलबजावणी होते की नाही यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा प्रभावीपणे काम करणारी हवी. प्रत्येक वस्तूंवरील ‘एमआरपी’ बदलावी लागेल. सर्वसामान्यांना काही वस्तू महागात, तर काही स्वस्तात मिळतील. त्यामुळे फारसा लाभ त्यांच्या पदरात पडेल, असे सध्या तरी दिसत नाही.’’

Web Title: pune news Who benefits from GST?

फोटो गॅलरी