वनक्षेत्रातील वन्यप्राण्यांच्या प्रगणनेस सुरवात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

पुणे - अभयारण्यांबरोबरच माळरान, टेकड्या अशा वनक्षेत्रातील वन्यप्राण्यांची प्रगणना करण्यास वन विभागाने नुकतीच सुरवात केली आहे. या प्रगणनेमुळे जिल्ह्यातील वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाच्या खुणा नोंदविल्या जाणार आहेत. बिबट्यापासून हरणे, भेकर अशा वन्यप्राण्यांची ढोबळ आकडेवारी आणि अधिवासांची ठिकाणे माहिती होणार आहेत.

पुणे - अभयारण्यांबरोबरच माळरान, टेकड्या अशा वनक्षेत्रातील वन्यप्राण्यांची प्रगणना करण्यास वन विभागाने नुकतीच सुरवात केली आहे. या प्रगणनेमुळे जिल्ह्यातील वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाच्या खुणा नोंदविल्या जाणार आहेत. बिबट्यापासून हरणे, भेकर अशा वन्यप्राण्यांची ढोबळ आकडेवारी आणि अधिवासांची ठिकाणे माहिती होणार आहेत.

केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयातर्फे दर चार वर्षांनी देशभरातील सर्व वनक्षेत्रात वन्यप्राणी प्रगणना केली जाते. याअंतर्गत वाघांसह सर्व प्रकारचे वन्यप्राणी आणि त्यांच्या वस्तीस्थानांचे सर्वेक्षण करण्यात येते. गेल्या आठवड्यापासून सर्व राज्यांमध्ये वन कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि प्रगणनेचा सराव सुरू झाला होता. पुणे जिल्ह्यातील वन्यप्राण्यांची सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी प्रगणनेला सुरवात झाली आहे. 

या प्रगणनेत अभयारण्याबरोबरच शहरातील टेकड्या, पडीक जमीन, डोंगरदऱ्यांमधील वनक्षेत्राची पाहणी करण्यात येणार आहे. येत्या गुरुवारपर्यंत (ता. २५) ही प्रगणना करण्यात येणार आहे. गुरुवारपर्यंत वन अधिकारी, कर्मचारी जंगलात फिरून प्राण्यांचे ठसे, विष्ठा, इतर पुरावे जमा करणार आहेत. कोणताही वन्यप्राणी प्रत्यक्ष दिसल्यास त्याची सविस्तर नोंदणी केली जाणार आहे, असे सहायक वनसंरक्षक महेश भावसार यांनी सांगितले. 

विभागीय वन अधिकारी शिवाजी फटांगरे म्हणाले, ‘‘ही प्रगणना ट्रांजेक्‍ट लाइन पद्धतीने होणार आहे. यासाठी वन कर्मचाऱ्यांनी जंगलामध्ये ट्रांजेक्‍ट लाइन आखली असून, त्यानुसार वन कर्मचारी नोंदी घेणार आहेत. गुरुवारपर्यंत वन कर्मचाऱ्यांनी केलेल्या नोंदीची पडताळणी करून ही माहिती संबंधित सॉफ्टवेअरमध्ये नोंदविण्यात येईल.’’

वन विभागामार्फत (वन्यजीव) दरवर्षी बुद्धपौर्णिमेदरम्यान पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यप्राण्यांची प्रगणना करण्यात येते; परंतु चार वर्षांनी राष्ट्रीय पातळीवर होणारी ही गणना सर्व वन विभागांना बंधनकारक आहे. प्रगणनेमुळे शहरातील वन क्षेत्रात असलेल्या प्राण्यांची माहितीही उपलब्ध होते. ही प्रगणना कशी करावी, त्यासाठीचे तंत्रज्ञान कसे हाताळावे, नोंदी कशा घ्याव्यात, या संदर्भात मागील आठवड्यात वन अधिकाऱ्यांना प्रशिक्षण 
देण्यात आले.

Web Title: pune news wild area animal counting start