पुण्यात थंडी अंशतः कमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

पुणे - मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा कमी असला तरीही पुण्यात मात्र थंडी अंशतः कमी झाली आहे. पुण्यात डिसेंबरच्या शेवटी ८.७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरलेला किमान तापमानाचा पारा नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी १०.८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नाशिक येथे ८.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

पुणे - मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा कमी असला तरीही पुण्यात मात्र थंडी अंशतः कमी झाली आहे. पुण्यात डिसेंबरच्या शेवटी ८.७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरलेला किमान तापमानाचा पारा नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी १०.८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नाशिक येथे ८.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

उत्तर आणि ईशान्येकडून मध्य महाराष्ट्राच्या दिशेने कोकणाकडे थंड वारे वाहत आहेत. मराठवाडा आणि विदर्भानंतर कोकण, मध्य महाराष्ट्रातही चांगलीच थंडी वाढली आहे. दिवसभर ऊन असले तरी थंडीच्या गारव्यामुळे हे ऊन सुखद दिलासा देऊन जात आहे. सायंकाळनंतर पुन्हा हवेत गारवा तयार होत आहे. त्यामुळे सायंकाळपासून थोडी-थोडी थंडी वाढत आहे; मात्र मध्यरात्रीपासून थंडीत वाढ होऊन पहाटेच्या थंडीमुळे किमान तापमानाचा पाराही घसरत आहे. 

सध्या मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, डहाणू येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. मुंबईत १४.१ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद मंगळवारी (ता. २) सकाळी झाली. मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागातही थंडी वाढली आहे. त्यामुळे किमान तापमानात घट झाली असून, निफाड, नाशिक येथील किमान तापमान दहा अंशांच्या खाली उतरले आहे. महाबळेश्वर, सांगली येथील किमान तापमान सरासरीएवढे होते. जळगाव, कोल्हापूर, महाबळेश्वर, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर येथील किमान तापमान दहा अंशांच्यावर होते; परंतु सरासरीच्या तुलनेत येथील किमान तापमानात काही प्रमाणात चढ-उतार सुरू होते. 

यातील परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या परिसरात सर्वांत कमी म्हणजेच ८.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली. त्यापाठोपाठ उस्मानाबादमध्ये ९.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. औरंगाबाद, नांदेड येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंशांनी वाढले. विदर्भातील गोंदिया येथे ८.५ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी तापमान नोंदविले गेले. अमरावती, बुलडाणा, नागपूर, वाशीम, यवतमाळ येथील किमान तापमान सरासरीएवढे होते. चंद्रपूर, गोंदिया येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने घटले होते. 

Web Title: pune news winter weather