'वायरलेस मायक्रोचिप'चे वरदान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

पुणे - 'वायरलेस मायक्रोचिप' म्हणजे एक प्रकारचा "रोबोटिक इम्प्लांट' असून, अशा इलेक्‍ट्रॉनिक चिपचा उपयोग औषधस्रोत म्हणून करण्याचा प्रयत्न आधुनिक वैद्यकशास्त्रात यशस्वीपणे केला जात आहे. सुईच्या टोकाइतक्‍या छोट्या आकाराच्या वस्तूमध्ये औषधद्रव्य भरले जाते. त्यातून इलेक्‍ट्रिकल सिग्नलच्या आदेशावरून रुग्णाच्या शरीरात हे औषध सोडण्यात वैद्यकीय तज्ज्ञांना यश आले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील हा क्रांतिकारी प्रयोग आहे.

याबाबत माहिती देताना वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अनिल गांधी म्हणाले, 'वायरलेस मायक्रोचिप म्हणजे रोबोटिक इम्प्लांटच आहे. पेसमेकरसारखे हृदयाची गती नियमित करणारे इलेक्‍ट्रॉनिक उपकरण बऱ्याच काळापासून वापरले जात आहे. अशा इलेक्‍ट्रॉनिक चिपचा उपयोग औषधाचा स्रोत म्हणून करण्याचा नवा प्रयोग सुरू आहे. सुईच्या टोकाइतकी छोटी औषध साठविण्यासाठी जागा असते. त्याला वेढून प्लॅटिनम किंवा टिटॅनिअमचा पापुद्रा असतो. इलेक्‍ट्रिकल सिग्नल गेला की हा पापुद्रा वितळतो आणि औषध शरीरात सोडले जाते. याशिवाय रेडिओलहरी आणि विशेष असा संवाद साधणाऱ्या सर्व्हरचा वापर करूनही रुग्णाच्या शरीरात सोडायच्या औषधाच्या मात्रेवर नियंत्रण ठेवणे डॉक्‍टरांना शक्‍य होत आहे.''

काही रुग्णांना एकापेक्षा जास्त औषधे नियमितपणे घ्यावी लागतात, त्यासाठी बहुऔषधी रोबोटिक चिप (पॉलिफार्मसी) विकसित करण्याचा प्रयत्नही सुरू आहे. एक चिप शरीरात बसवायची आणि आवश्‍यकतेनुसार ती पुन्हा औषधाने भरायची, असेही संशोधन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

औषधांसाठी रिंगटोन
सर्वसाधारणपणे 50 टक्के रुग्ण हे औषधांचा वापर योग्य प्रकारे करत नाहीत, असे बहुतांश डॉक्‍टरांचे निरीक्षण आहे. त्यात मुख्य भाग असतो ते औषध घेण्याचे विसरणे किंवा त्यास टाळाटाळ करणे, यावर उपाय म्हणून रुग्णाला वेळेवर व योग्य प्रकारे औषध घेता यावे यासाठी आधुनिक तंत्रज्ञानात क्रांतिकारी संशोधन होत आहे. याबाबत डॉ. गांधी म्हणाले, 'रुग्णाची औषध घेण्याची वेळ झाली की विशिष्ट प्रकारची "रिंगटोन' वाजते. त्याच वेळी औषधाची आठवण करून देणारा "एसएमएस' रुग्ण, त्याचे नातेवाईक आणि डॉक्‍टर यांच्या मोबाईलवर जातो. त्या बाटलीत किती औषध आहे, याची अद्ययावत माहितीही यातून मिळते.''

'स्मार्ट पिल्स'
अलीकडे काही "स्मार्ट पिल्स' विकसित करण्यात संशोधकांना यश आले आहे. या गोळ्यांमध्ये वाळूच्या कणांएवढ्या "मायक्रोचिप्स' मिसळल्या जातात. ही गोळी पोटात जाऊन जठररसाच्या संपर्कात आली, की रुग्णाने त्वचेवर लावलेल्या पॅचकडे विशिष्ट इलेक्‍ट्रिकल सिग्नल जातात. तेथून तो संदेश डॉक्‍टरांपर्यंत, त्यांच्या मोबाईलवर मिळतो. यासाठी वापरण्यात येणाऱ्या "मायक्रोचिप्स' शौचातून बाहेर पडतात. या दरम्यान, या औषधाचा परिणाम शरीरावर काय आणि कसा होत आहे, याची सविस्तर माहिती डॉक्‍टरांना मिळालेली असते.

Web Title: pune news wireless microchip