'संशोधनात महिलांनी भरारी घ्यावी'

गायत्री वाजपेयी
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

एखाद्या प्रकल्पासाठी काम करताना ते वेळेत करणे बंधनकारक असते. अशा वेळी तुम्ही प्रचंड तणावात असता; मात्र त्याही परिस्थितीत आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे आवश्‍यक असते.
- डॉ. एस. सीता, शास्त्रज्ञ, इस्रो

पुणे - आपल्या कामातून देशसेवा घडत असेल, तर त्यातून स्वतःला आणि कुटुंबीयांना त्याचा अभिमान वाटतोच. त्यातही जर ती महिला असेल आणि संशोधन करून देशाच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा उचलत असेल, तर ही बाब खरोखरच अभिमानास्पद ठरते. असाच अभिमान भारताच्या ‘रॉकेट वुमन’ समजल्या जाणाऱ्या आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) शास्त्रज्ञ डॉ. एस. सीता यांच्या कुटुंबीयांना वाटतो. डॉ. सीता या एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आल्या होत्या, तेव्हा त्यांनी ‘सकाळ’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या. 

अधिकाधिक महिलांनी संशोधनात यावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.   कमी खर्चात, कमी वेळेत विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरलेल्या ‘मंगळयान’ मोहिमेच्या त्या प्रकल्प संचालिका होत्या. तसेच, ‘पीएसएलव्ही- सी ३७’ च्या यशस्वी उड्डाणामागेही त्यांचा मोलाचा सहभाग होता. ‘‘संशोधन क्षेत्रात एका प्रकल्पावर अनेक जण काम करत असतात. अशावेळी तुम्ही तुमच्या कामात कमी पडलात अथवा त्यात दिरंगाई केली, तर इतरांचेही काम खोळंबते. अशावेळी तुम्हाला दिलेली जबाबदारी पूर्ण केल्याशिवाय तुमची सुटका नसते. त्यामुळे या क्षेत्रात कामाच्या तासांची निश्‍चिती नसते. या क्षेत्रात येण्यापूर्वीच महिलांनी, कामाचे तास निश्‍चित न ठेवता काम करण्याची मानसिकता ठेवावी. तसेच, कुटुंबालाही तुमच्या कामाबाबत पूर्वकल्पना द्यावी,’’ असा कानमंत्र डॉ.सीता यांनी दिला. 

‘‘इतर ठिकाणीदेखील महिला काम करतात, त्याही कितीतरी जबाबदारीची कामे करतात, तरीदेखील वेळेत घरी येतात. मात्र, तुमच्या कामाचे तास इतके अनिश्‍चित कसे? अशी विचारणा अनेकदा संशोधन क्षेत्रातील महिलांना त्यांच्या कुटुंबीयांकडून केली जाते. अशा वेळी त्यांना जर कामाविषयी पूर्वकल्पना असेल, तर तुमची परिस्थिती समजावून सांगणे अधिक सोयीस्कर ठरेल,’’ असेही त्यांनी सांगितले.  

महिलांनी संशोधनात यावे 
या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणींसाठी डॉ. सीता सांगतात, ‘‘प्रत्येक क्षेत्रात एखादी महिला आदर्श असली पाहिजे, तिला बघून त्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुण मुलींना प्रेरणा मिळाली पाहिजे. स्वातंत्र्यानंतर बहुतांश क्षेत्रांत महिलांनी एक उंची गाठत स्वतःचा आदर्श निर्माण केला आहे. संशोधन क्षेत्रातदेखील अशाप्रकारे आदर्श निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी अधिकाधिक महिलांनी संशोधन क्षेत्रात यावे.’’  

Web Title: pune news women research

टॅग्स