‘कमवा व शिका’च्या अनुदानात वाढ

संतोष शाळिग्राम 
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

कमवा आणि शिका योजनेचा फायदा करून घेत विद्यापीठाला आवश्‍यक लिफाफे आणि फाइल या विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतली जाणार आहेत. तसेच या विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कौशल्याचे प्रशिक्षण मिळावे म्हणून रिटेल सेल, नर्सिंग असिस्टंट, ऑटो सेल्स कन्सल्टंट आदीचे प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे.
- डॉ. प्रभाकर देसाई, संचालक, विद्यार्थी विकास मंडळ

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत महाविद्यालयांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात २५ हजार ते दीड लाख रुपयांची वाढ प्रस्तावित केली आहे. व्यवस्थापन परिषदेत मंजुरी घेतल्यानंतर ती महाविद्यालयांना दिली जाईल.

महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी संख्येनुसार कमवा व शिका योजनेसाठी अनुदान दिले जाते; परंतु ते कमी पडत असल्याने त्यात वाढ करण्याची मागणी पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यांतील महाविद्यालयांच्या विद्यार्थी विकास अधिकाऱ्यांनी केली होती. त्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. सध्या ५०० विद्यार्थी संख्येच्या महाविद्यालयांना ५० हजार अनुदान मिळत होते, ते ७५ हजार होईल.

विद्यार्थी संख्या एक हजार असेल, त्या महाविद्यालयांना दीड लाख, दीड हजार विद्यार्थी संख्या असल्यास सव्वादोन लाख आणि विद्यार्थी संख्या दोन हजार असेल, त्या महाविद्यालयास तीन लाख रुपये अनुदान मिळेल. व्यवस्थापन परिषदेत यासंबंधीचा ठराव मांडण्यात येणार आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर ही वाढ लागू होईल, असे विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी सांगितले.

कमवा व शिका योजनेत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ई कंटेंट निर्मिती कार्यक्रम वर्षभर राबविला जाणार आहे. यामध्ये ई बुक आणि व्हॉइस बुक निर्मितीचे काम त्यांना दिली जाईल. याशिवाय जे विद्यार्थी कार्यालयीन कामकाज करतात, त्यांना दोन दिवस कार्यालयाबाहेर काम दिले जाईल. जे विद्यार्थी बागकाम वा तत्सम कामे करतात, त्यांना दोन दिवस कार्यालयीन काम देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे डॉ. देसाई यांनी सांगितले.

Web Title: pune news work & learn subsidy increase