'कमी दाब क्षेत्राचे पूर्वानुमान आता बिनचूक

अमोल कुटे
शुक्रवार, 23 मार्च 2018

पुणे - कमी दाबक्षेत्राचे हवामान अंदाजात महत्त्वाचे स्थान आहे. कमी दाबाच्या क्षेत्रांच्या निर्मितीचा अंदाज घेणे आणि देणे आव्हानात्मक असते, मात्र क्षेत्रनिर्मितीच्या पूर्वानुमानात अचूकता आणण्यासाठी ‘कपल्ड माॅडेल’चा वापर भारतीय हवामान विभाग करणार अाहे.

पुणे - कमी दाबक्षेत्राचे हवामान अंदाजात महत्त्वाचे स्थान आहे. कमी दाबाच्या क्षेत्रांच्या निर्मितीचा अंदाज घेणे आणि देणे आव्हानात्मक असते, मात्र क्षेत्रनिर्मितीच्या पूर्वानुमानात अचूकता आणण्यासाठी ‘कपल्ड माॅडेल’चा वापर भारतीय हवामान विभाग करणार अाहे.

वातावरणीय हवामान घटक आणि समुद्राच्या स्थितीचा एकत्रितपणे विचार करून तयार केलेल्या या माॅडेलच्या मदतीने चक्रीवादळांच्या तीव्रतेचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

अचूक अंदाजासाठी हवामान विभाग विविध माॅडेल्स वापरते. उच्च क्षमतेच्या या माॅडेल्समुळे कमी क्षेत्रावरील हवामानाचा अंदाज वर्तविता येणार आहे. त्यामधून हवामान घटकांची ठराविक वेळी सातत्याने मिळणारी शास्त्रीय माहिती (वेदर डाटा) साठविण्याची सोय नसल्याने अनेक माॅडेल्स सक्षमतेने कार्यरत नव्हती. पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेमध्ये (आयआयटीएम) नुकत्याच कार्यान्वित झालेल्या ‘प्रत्युष’ संगणकामुळे हा डाटा अाता साठविता येणार आहे.

यापूर्वी चक्रीवादळाचे पूर्वानुमान देताना तापमान, वारे, आर्द्रता, हवेचा दाब, ढग, पाऊस वातावरणीय आणि समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान, खोलीनुसार पाण्याचे तापमान, वाऱ्यांचा वेग या मापदंडाचा विचार व्हायचा. मात्र चक्रीवादळाची सद्यःस्थिती, मार्गक्रमानानुसार या मापदंडांचा डाटा (रिअल टाइम डाटा) मिळत नव्हता. उपलब्ध माहितीच्या आधारे दिले जाणारे चक्रीवादळाचे पूर्वानुमानही अचूक देता येत नव्हते. मात्र आता ‘रिअल टाइम डाटा’ अभ्यासून अचूक पूर्वानुमान देता येणार अाहेत. पुढील काळात सातत्याने निरीक्षणे नोंदविली जाणार असल्याने कपल्ड माॅडेलच्या माध्यमातून कमी दाबाच्या पूर्वानुमानातही अचूकता येणार असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.

मानवी हस्तक्षेप कमी होणार
याशिवाय हवामान विभागाकडे उपलब्ध हवामान बदल मापदंडाच्या माहितीमध्ये (डाटा) मानवी हस्तक्षेप कमी करून अचूकतेसाठी देशभरात १३० स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित केली आहेत. वर्षभरात आणखी ५३० केंद्रे सुरू होतील. यात हवामान विभागाला डाटा पुरविणाऱ्या पार्टटाइम वेधशाळांमध्ये केंद्र सुरू करून पूर्णवेळ सातत्याने माहिती उपलब्ध होणार अाहे. विविध केंद्रांतून उपग्रह जोडणीद्वारे उपलब्ध डाटा पुढील काळात जीपीएसच्या आधारे मोबाईल एसएमएसने मिळेल. कृषी हवामान सल्ल्यासाठी जमिनीची आर्दता, तापमान, पिकांच्या पानाचे तापमान, बाष्पीभवनाचे प्रमाण लक्षात येण्यासाठी पानाजवळच्या आर्द्रतेची नाेंदी घेणारे सेन्सर बसविण्यात येतील. विमानांच्या उड्डाणांसाठी वैमानिकांना दृश्यता (व्हिजिबिलिटी) कळावी यासाठी ‘दृष्टी’ सेन्सर वापरण्यात येत आहे. चक्रीवादळातील वेगवान वाऱ्यांच्या नोंदी किनारपट्टीवरील ७० जिल्‍ह्यांमध्ये घेण्यासाठी हाय स्पीड रेकाॅर्डिंग सिस्टिम बसविण्यात येणार असल्याचे हवामान उपकरण शास्त्रज्ञांनी सांगितले.

तालुकास्तरीय अंदाज
हवामान विभागाकडील अंदाजाची परिणामकारकता, विश्‍वसनीयता वाढविण्यासाठी कमी अंतरावरील क्षेत्राचे पूर्वानुमान देण्याचे प्रयत्न आहेत. हवमान विभागस्तरीय, जिल्हास्तरीय अंदाजापाठोपाठ आता प्रायोगिक तत्त्वावर तालुकास्तरीय अंदाज वर्तविण्यास सुरवात केली आहे. यात पाऊस, कमाल, किमान तापमान, ढगांचे अच्छादन, कमान किमान आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या मापदंडांचा पाच दिवसांचा अंदाज देण्यात येतो. पुढील काळात आणखी कमी क्षेत्रावरील अंदाज देणे शक्य होणार असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.

उष्णता, थंडीचाही अंदाज
काही वर्षांपासून माॅन्सूनच्या कालावधीतील (जून ते सप्टेंबर) पावसाचा दीर्घकालीन अंदाज हवामान विभागातर्फे दिला जायचा. मात्र आता हिवाळा आणि उन्हाळा या दोन्ही हंगामांचेही अंदाज हवामान देणार आहे. उन्हाळ्याकरिताचा मार्च ते मे या तीन महिन्यांचा अंदाज विभागाने दिला आहे.

असे आहे ‘कपल्ड मॉडेल’
- हवामानातील दोन प्रमुख घटकांच्या एकत्रीकरणामुळे म्हणतात ‘कपल्ड मॉडेल’
- जमिनीवरील आणि समुद्रातील वातावरणीय घटक यांचा मॉडेलमध्ये वापर
- अंदाजातील अचूकतावाढीसाठी मॉडेलमध्ये ‘रियल टाइम डाटा’चा वापर
- वादळाची दिशा व बदलाची नोंद या मॉडेलद्वारे सलगतेने घेता येणार
- चक्रीवादळाच्या काळात पाऊस, वाऱ्याच्या वेगाचा अंदाज बांधता येणार
- मालमत्ता, जीवितहानीचे संभाव्य नुकसान टाळण्यास अंदाजाच वापर होणार

Web Title: pune news world environment day