पडतेय नवे क्रांतिकारी पाऊल!

बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

पुणे - करमाळा ते सिन्नर व्हाया पुणे .... डॉक्‍टरांची एक मोहीम अधिक गतिमान झाली आहे. नव्या सामाजिक क्रांतीसाठी पाऊल पुढे पडले आहे. ही क्रांती आहे ‘नकुशीला हवीशी’ करण्याच्या प्रयत्नांना सक्रिय प्रोत्साहन देणारी. मोठा वाटा उचलणारी. पुणे, करमाळा, सिन्नर, अकलूज, माळशिरस, इंदापूर... असे करत तिचा परीघ वाढत चालला आहे.

पुणे - करमाळा ते सिन्नर व्हाया पुणे .... डॉक्‍टरांची एक मोहीम अधिक गतिमान झाली आहे. नव्या सामाजिक क्रांतीसाठी पाऊल पुढे पडले आहे. ही क्रांती आहे ‘नकुशीला हवीशी’ करण्याच्या प्रयत्नांना सक्रिय प्रोत्साहन देणारी. मोठा वाटा उचलणारी. पुणे, करमाळा, सिन्नर, अकलूज, माळशिरस, इंदापूर... असे करत तिचा परीघ वाढत चालला आहे.

मुलीच्या जन्माचे आगळे-वेगळे स्वागत करण्यासाठी नि:शुल्क बाळंतपणाबरोबरच रुग्णालयात स्वागत सोहळा करणे, असे या मोहिमेचे स्वरूप आहे. ‘सकाळ’ने या विषयावर ठोस भूमिका घेऊन विविध स्तरांवर चर्चा घडवून आणली आहे, तर मोहिमेसाठी पुण्यातील डॉ. गणेश राख यांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये शेकडो डॉक्‍टरांचा मोहिमेला पाठिंबा मिळाला आहे. काही डॉक्‍टरांनी तर मुलगी मोठी होईपर्यंत तिच्यावरील सर्व प्रकारचे उपचार सवलतीमध्ये करण्याची घोषणा केली आहे.

या क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली सात वर्षांपूर्वी डॉ. राख यांच्या पुढाकाराने. त्यांचे काम समाजापर्यंत पोचण्याचे काम ‘सकाळ’ने वेळोवेळी केले. मात्र त्यावर न थांबता या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेऊन तिला अधिक गती देण्याच्या उद्देशाने गेल्या २३ ऑगस्ट रोजी सर्व संबंधित घटकांची बैठक आयोजित केली. मुलींची गर्भातच हत्या, मोठी झालीच तर तिची सर्व ठिकाणी होणारी कुचंबणा, तिला मिळणारी दुय्यम वागणूक, सुरक्षितता इत्यादी विविध मुद्यांवर चर्चा झाली. सर्वच मुद्दे महत्त्वाचे होत; मात्र कुठून तरी सुरवात करण्याची गरज असल्याने गर्भात होणाऱ्या मुलींच्या हत्या थांबण्यासाठी जनजागृती करण्याचा मुद्दा आधी घेण्याचे ठरले. त्यासाठी डॉ. राख यांनी विडा उचलला आणि दोन - अडीच महिन्यांमध्ये शेकडो डॉक्‍टर मोहिमेमध्ये सहभागी झाले.

डॉक्‍टरांचे मेळावे आणि फलक
करमाळा, अकलूज, माळशिरस, इंदापूरसह नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे डॉक्‍टरांचे मेळावे झाले. ‘मुलीच्या जन्माचे आगळे-वेगळे स्वागत’, ही संकल्पना डॉक्‍टरांनी उचलून धरली. अकलूजमध्ये कालच झालेल्या मेळाव्यात यासाठी पुढाकार घेणाऱ्या डॉक्‍टरांचा सत्कार करण्यात आला. सिन्नरमधील रॅलीमध्ये डॉक्‍टरांसोबत स्वयंसेवी संस्था, विविध समाजांच्या संघटना, औषधविक्रेते संघटना आदींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. मुलीच्या जन्माचे स्वागत बाळंतपण नि:शुल्कपणे करून आणि पुढेही सवलतीच्या दरात उपचार करण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला. डॉक्‍टर एवढ्यावरच थांबले नाहीत, तर तसे फलकदेखील बाह्यरुग्ण विभागात किंवा प्रतीक्षागृहामध्ये लावण्यात आले आहेत. मुलगी झाल्यास प्रसूतीसाठी लागणाऱ्या औषधांवर २० टक्के सूट देण्याची घोषणा सिन्नरच्या औषधविक्रेता संघटनेने केली.

माझ्या रुग्णालयात मुली आणि पालक दोघांनाही पन्नास टक्के सवलत देत आहे. केवळ एवढ्यावर न थांबता येणाऱ्या रुग्णांचे प्रबोधन करण्याचे कामदेखील सुरू केले आहे. ‘बेटी बचाव मोहिमे’साठी मी आणि माझी पत्नी पाच वर्षांपासून काम करत आहोत. आमच्या मोहिमेला अलीकडच्या काळात चांगला प्रतिसाद मिळत असून, इंदापूर तालुक्‍यातील सुमारे ४० डॉक्‍टर यात सहभागी झाले आहेत.
- डॉ. संतोष खाडे, शहाजीनगर, इंदापूर

सिन्नर येथे नुकताच मेळावा घेतला. डॉक्‍टरांची भव्य रॅली काढली. विशेष म्हणजे तिला सर्व समाज घटकांचा, संस्थांचा सक्रिय पाठिंबा मिळाला. त्यामुळे हुरूप वाढला आहे. बहुतांश डॉक्‍टरांनी मुलींवर नि:शुल्क किंवा सवलतीच्या दरात उपचार करण्याची घोषणा केली आहे. सुरगणा येथेही मेळावा घेणार आहोत. 
डॉ. प्रमोद लोहार, सिन्नर

माळशिरसच्या ५२२ डॉक्‍टरांचा सहभाग
माळशिरस तालुक्‍यातील सर्वच म्हणजे सुमारे ५२२ डॉक्‍टरांनी ‘कन्या वाचवा, कन्या शिकवा’, या अभियानामध्ये सहभाग घेतला आहे. अर्थात, हे यश आहे ‘मिशन राजकुंवर’चे. शीतलदेवी मोहिते-पाटील यांनी स्थापन केलेल्या ‘डॉटर-मॉम संघटने’च्या वतीने हे अभियान राबवले जात आहे. यासंदर्भात शीतलदेवी म्हणाल्या, ‘‘मुलींच्या घटत्या संख्येवर आम्ही काम करायला सुरवात केली तेव्हा यात डॉक्‍टरांचा सहभाग खूप महत्त्वाचा असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांना यात सहभागी करून घेणे आवश्‍यक होते; पण त्यांच्याकडे जायचे कसे? तो नैतिक अधिकार आपल्याकडे हवा म्हणून एकच मुलगी असेल तर तिचे केजी ते पीजीपर्यंतचे शिक्षण शिवरत्न शिक्षण संस्थेमध्ये पूर्णपणे मोफत करण्याचा निर्णय घेतला आणि मग डॉक्‍टरांकडे गेलो. डॉक्‍टरांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. तालुक्‍यातील सर्वच डॉक्‍टर यात सहभागी झाले. त्यांनी दहा टक्‍क्‍यांपासून ते शंभर टक्‍क्‍यांपर्यंत सूट जाहीर केली. गेल्या काही महिन्यांमधील हा खर्च पैशामध्ये मोजला चार कोटींच्या वर जातो. सरकारचा या मोहिमेवरील एकूण बजेट शंभर कोटी आहे, यावरून डॉक्‍टरांच्या योगदानाची कल्पना येईल. हे मिशन नवरात्रीपर्यंत पूर्ण करून दाखवले.

मुलगी झाल्यास प्रसूती दरामध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी करत आहोत. याचा जास्तीत जास्त पालकांना लाभ मिळावा यासाठी शिबिरांचे आयोजन, मोक्‍याच्या ठिकाणी फलक, रुग्णालयात दर्शनी भागात फलक याद्वारे प्रसार केला जात आहे.
डॉ. आदिती राहुल कराड, विश्‍वराज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, लोणी

सात वर्षांपूर्वी ‘बेटी बचाव’चा नारा दिला. तिला चांगले यश मिळत आहे. ‘सकाळ’ने यात सहभाग घेतल्याने डॉक्‍टरांचा प्रतिसाद वाढला आहे. आमच्या रुग्णालयात मुलगी झाल्यास प्रसूती नि:शुल्क तर केली जातेच, अनेक डॉक्‍टर आणि रुग्णालयेही आता हे सामाजिक काम करत आहेत. पुणे जिल्ह्यात अशा डॉक्‍टरांची संख्या चारशेवर गेली आहे. 
डॉ. गणेश राख, पुणे 

Web Title: pune news world girl day