तुमचा महंमद अझहरुद्दीन होईल - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

पुणे - ‘‘पुणेकरांचे प्रश्‍न आणि पक्ष हिताच्या धोरणांमध्ये ‘फिक्‍सिंग’ केलेत, तर ‘तुमचा महंमद अझहरुद्दीन’ होईल. मग तुमच्यावर केवळ चित्रपट निघेल,’’ अशा शब्दांत पक्ष विरोधी कारवाई करणाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बुधवारी तंबी दिली. पक्षाचे ‘लेटरहेड’ मिरविण्यापुरते ठेवू नका. पक्ष संघटनेचे काम करायला वेळ नसलेल्यांची गय केली जाणार नाही, असे सांगत, निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखविण्याचा इशाराही त्यांनी दिला.

महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर पक्ष संघटनेत चैतन्य निर्माण करण्यासाठी आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. पक्षाच्या विविध २४ सेलच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांची फळी भक्कम असायला हवी, त्यांनी कामात सातत्य ठेवावे, हजारी यंत्रणा नेहमी सक्रिय असावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या.

पवार म्हणाले, ‘‘निवडणुकांमधील पराभवातून पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी चिंतन केले पाहिजे. त्यातून धडा घेऊन कामाचा झपाटा वाढविण्याची गरज आहे. अशा कार्यकर्त्यांना नेहमी बळ देऊ. मात्र उगाचच मिरविण्यासाठी लेटरहेडपुरते कार्यकर्त्यांना थारा देणार नाही. ज्या कार्यकर्त्यांना स्वगृही यायचे आहे, त्यांना हारतुरे नसतील. पक्षात यायचे असेल, तर इतर पक्षांत जाऊन चूक झाल्याचा अर्ज द्यावा लागेल. सोशल मीडियाचा चांगला वापर केला पाहिजे. या माध्यमातून विरोधी पक्षाच्या नेत्यांचीही बदनामी करू नये. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ती केल्यास पोलिसांकडे तक्रार करेल.’’

... तर माझेही तिकीट कापले जाईल
पक्षाच्या मेळाव्यातील आपल्या भाषणात अजित पवार यांनी नेहमीप्रमाणे जोरदार टोलेबाजी केली. ‘‘पक्ष बांधणीसाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर दौरे सुरू आहेत. त्यामुळे पुण्यात फारसा वेळ देता येत नाही. प्रदेशाध्यक्ष सांगेल, तिकडे जावे लागत आहे. त्यांचे ऐकावेच लागते. पुढील विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी तटकरे यांच्याकडेच असेल तर? निवडणुकीत तिकीट देण्याचे काम त्यांच्याकडे असते. त्यामुळे त्यांचे मला ऐकावेच लागते, नाही तर माझे तिकीट कापले जाईल, अशी फिरकीही पवार यांनी घेतली. त्यावर टाळ्या वाजवून उपस्थितांनी दाद दिली.

तारतम्य सोडाल, तर घरी बसाल
लोकांपर्यंत पोचण्यासाठी पक्षात चांगले प्रवक्ते निर्माण झाले पाहिजेत. मात्र प्रवक्ता हा संशयी असावा लागतो. तो सटकणारा नसावा. काही जणांची सटकत असते. ‘माझी सटकते, त्यामुळे मी प्रवक्ता होऊ शकत नाही. तारतम्य सोडून बोलाल, तर मोठी किंमत मोजावी लागेल.. असे म्हणताच, पुन्हा टाळ्यांची दाद मिळाली. ‘बोलण्यामुळे काय होते, याची चांगली कल्पना मला आहे. त्यातून मी (अजित पवार) होतो, म्हणून उभा राहिलो, अन्यथा शक्‍य नसते,’ अशी टिप्पणीही त्यांनी केली.

Web Title: pune news Your majesty will be Azharuddin