
Pune News : पिंपळवंडी येथील युवक बिबट्याच्या हल्ल्यात जखमी
पिंपळवंडी : आदित्य शांताराम गायकवाड या तरुणावर शुक्रवारी मध्यरात्री (ता.२४) बिबट्याने हल्ला करून त्यास जखमी केले. आदित्य गायकवाड हे रुग्णवाहिका चालक असुन रात्री दीडच्या सुमारास ते पिंपळवंडी (ता.जुन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या एका रुग्णाला घेऊन जाण्यासाठी गावातून चालत निघाले असता,आरोग्यकेंद्राच्या काही मीटर अंतरावर आल्यावर त्यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला.अचानक झालेल्या या हल्ल्याने आदित्यने आरडाओरड करत बिबट्याचा प्रतिकार करत आपला जीव वाचवला.
बिबट्या आकाराने लहान असल्याने मी या हल्ल्यातून बचावलो असे आदित्यने सांगितले. या हल्ल्यात आदित्यच्या हाताला जखम झाली असुन प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. सदर घटनेची माहिती वनविभागाचे वनपाल संतोष साळुंखे यांना कळविली असता त्यांनी आदित्यची चौकशी केली तसेच रात्रीच्या वेळी सहसा एकट्याने बाहेर पडु नये व बिबट प्रवण क्षेत्रात आपण वावरत असताना योग्य ती काळजी घ्यावी असे सांगितले.
पिंपळवंडी व पंचक्रोशीमध्ये बिबट्याचे पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढलेले असतानाच मनुष्यावर देखील बिबट्याने हल्ले सुरु केले असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली असुन लवकरात लवकर बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.