जीवाची पर्वा न करता युवकांनी वाचविले दोघींचे प्राण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

प्रज्ञा आणि मेघा या दोघी पाण्यात वाहून चालल्याचे विशालच्या लक्षात आल्यावर त्यांने क्षणाचाही विचार न करता पाण्यात धाव घेतली. त्याच्या पाठोपाठ जीवाची पर्वा न करता त्याचा सख्खा भाऊ दत्ताने सुध्दा पाण्यात उडी घेतली

कडूस - शाळा सुटल्यावर घरी परतत असताना नदीला अचानक वाढलेल्या पुराच्या पाण्यात दोन विद्यार्थीनी वाहून चालल्या होत्या. तेथून चाललेल्या दोन मुलांच्या लक्षात आल्यानंतर त्या दोघांनी जीवाची पर्वा न करता नदीत धाव घेतली. मुलींना वाचवताना त्यातील एकाला दुखापत झाली, परंतु हार न मानता या दोघा सख्ख्या भावांनी अथक परिकश्रमानंतर वाहून जाणा-या दोन्ही मुलींना वाचवले. विद्यार्थीनींचा जीव वाचवणा-या या दोन्ही शाळकरी आदिवासी मुलांच्या शौर्याचे परिसरातून कौतुक होत आहे.

ही घटना कडूस (ता.खेड) येथे गुरूवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. मुसळेवाडी, तेलदरा ठाकरवस्तीवरील मुला-मुलींना शाळेसाठी कडूस येथे यावे लागते. यासाठी विद्यार्थ्यांना कुमंडला नदी पार करावी लागते. जवळचा मार्ग म्हणून विद्यार्थी तसेच ग्रामस्थ कुमंडला नदीवरील बंधा-याच्या सांडव्यावरून पायी ये-जा करतात. हा परिसर गावच्या बाहेर असल्याने या ठिकाणी जास्त वर्दळ नसते. दररोज प्रमाणे सायंकाळी शाळा सुटल्यानंतर आठवीत शिकणा-या प्रज्ञा लक्ष्मण उघडे, मेघा विजय कदम, दर्शना राजाराम मुसळे व अक्षदा राजाराम मुसळे या कडूस येथील रामभाऊ म्हाळगी विद्यालयात आठवीत शिकणा-या चौघी विद्यार्थीनी मुसळेवाडी येथे आपल्या घरी चालल्या होत्या. परिसरात पाऊस पडून गेला होता, त्यामुळे नदीच्या पाण्यात अचानक वाढ झाली होती. या चौघी बंधा-याच्या सांडव्यावरून नदी ओलांडत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने मेघाचा पाय पाण्यात घसरला. तिला पकडण्याचा प्रयत्न करीत असताना प्रज्ञा, दर्शना व अक्षदा त्या नदीच्या पाण्यात ओढल्या गेल्या. दर्शना व अक्षदाने स्वतःला सावरले, परंतु प्रज्ञा व मेघा प्रवाहाबरोबर वाहून जावू लागल्या. त्याच वेळेस दहावीत शिकणारा दत्ता बबन काळे, त्याचा भाऊ विशाल बबन काळे व मंगेश काळे हे त्याच मार्गाने चालले होते. दत्ता व मंगेश हे शाळेतून घरी चालले होते, तर अकरावीत शिकणारा विशाल हा व्यायामासाठी कडूसकडे चालला होता.

प्रज्ञा आणि मेघा या दोघी पाण्यात वाहून चालल्याचे विशालच्या लक्षात आल्यावर त्यांने क्षणाचाही विचार न करता पाण्यात धाव घेतली. त्याच्या पाठोपाठ जीवाची पर्वा न करता त्याचा सख्खा भाऊ दत्ताने सुध्दा पाण्यात उडी घेतली. पन्नास फुटांवर विशालने प्रज्ञाला प्रवाहातून सुखरूप नदीच्याकडेला आणून सोडले. पण मेघा मात्र वाहत चालली होती. विशाल परत मेघाला वाचवण्यासाठी धावला. या ठिकाणी खडकाळ भाग असल्याने त्याच्या हात, पाय, बरगड्यांना मार लागला. जखमी अवस्थेत तो वाहून चालला होता, परंतु प्रसंगावधान राखून त्याने एका झूडपाला पकडले. दगड व झुडपाच्या आधाराने तो पाण्यात अडकला. तोपर्यंत दत्ता मेघाला वाचवण्याचा प्रयत्न करीत होता. सुमारे अडीचशे ते तीनशे फुट वाहून गेल्यानंतर दत्ताने मेघाला पकडले. तिला काठावर आणले, परंतु काटेरी झुडपे, खडकाळ-निसरडा भाग तसेच पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे त्याला मेघाला घेवून नदीच्या प्रवाहातून बाहेर येता येत नव्हते. तो एकाच ठिकाणी अडकला होता. सुमारे वीस ते पंचवीस मिनिटांनंतर मदतीला आलेल्या ग्रामस्थांनी त्या दोघांना बाहेर काढले.

मेघा लांबवर वाहून गेल्याने बेशुध्द झाली होती. तिला मार लागला आहे. मेघा व विशालवर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले. नंतर त्यांना घरी सोडण्यात आले. दोघांचीही प्रकृती चांगली आहे. दोन्ही विद्यार्थींनींना वाचवणारे दोन्ही युवक आदिवासी ठाकर समाजातील आहेत. शिवाय ते दोघे सख्खे भाऊ आहेत. जीवाची पर्वा न करता दोन्ही विद्यार्थीनींना वाचवल्याने त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे. दोघा भावांच्या शौर्याबद्दल सरपंच शशिकला ढमाले, उपसरपंच साबीर मुलाणी व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक शेंडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: pune news: youth saved two lives