गुरू आणि शिष्येचा एकाच वेळी गौरव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

पद्मा तळवलकर, यशस्वी सरपोतदार यांची ‘संगीत नाटक अकादमी’कडून दखल 

पुणे - ‘‘शिष्य घडतो आणि पुढे त्याचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान होतो, हा क्षण स्वतःच्या सन्मानापेक्षाही मोठा असतो,’’ अशा भावना गुरू आनंदाने व्यक्त करत होत्या, तर शिष्या ‘‘हा सन्मान गुरूंमुळेच तर मला मिळाला. त्यांनी मेहनत करवून घेतली नसती, तर हा आनंद मिळाला नसता,’’ अशा भावना नम्रपणाने व्यक्त करत होत्या. प्रसंग होता, गुरू आणि शिष्येचा एकाच वेळी होत असलेल्या गौरवाचा.

संगीत नाटक अकादमीचा मुख्य पुरस्कार जयपूर- अत्रौली घराण्याच्या गायिका पद्मा तळवलकर यांना, तर अकादमीचाच ‘युवा पुरस्कार’ पद्माताईंच्या शिष्या यशस्वी सरपोतदार यांना रविवारी जाहीर झाला. एकाच वेळी गुरू आणि शिष्येचा होत असलेला हा सन्मानाचा क्षण दुर्मिळच. यानिमित्ताने ‘सकाळ’ने गुरू- शिष्येशी संवाद साधला. तेव्हा दोघींनीही आनंद तर व्यक्त केलाच. शिवाय, ‘हा गुरूंमुळे मिळालेला गौरव आहे’ अशा भावनाही व्यक्त केल्या.

पद्माताई म्हणाल्या, ‘‘जवळजवळ ६० वर्षे संगीतक्षेत्रात कार्यरत आहे. या काळात साधना करता आली. अनेक शिष्यांना घडवता आले, याचे मनापासून समाधान आहे. हे समाधान मिळाले ते माझ्या गुरूंमुळे. त्यांनी आमच्यावर मेहनत घेतली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत रियाज करवून घेतला, या कष्टाचे पुरस्काराच्या रूपाने चीज झाले, असे वाटते. साठ वर्षांपूर्वीचे पुणे आठवून पाहा. संगीतात करिअर करणे अवघड होते; पण कुटुंबीयांनी भक्कम साथ दिली, त्यामुळे हा पुरस्कार गुरूंना आणि कुटुंबीयांना समर्पित करत आहे. विशेष म्हणजे, हा पुरस्कार शिष्येसोबत मिळत आहे, याचा आनंद जास्तच आहे. कारण वयाच्या पाचव्या वर्षापासून यशस्वी माझ्याकडे गायन शिकत आहे आणि आज ती उत्तमच गात आहे.’’

कडक शिस्तीच्या, तितक्‍याच प्रेमळ
‘‘मी लहानपणापासून पद्माताईंकडे गायन शिकत आहे. वयाची २५ वर्षे त्यांच्याकडे तालीम घेतली. संगीतातील अनेक बारकावे त्यांच्याकडून शिकता आले. संगीत समजून घेता आले. आधी गोरेगावात आणि आता पुण्यात त्यांच्याकडेच शिकत आहे. त्यांचे घर म्हणजे आम्हा शिष्यांचेच असते. त्या जितक्‍या कडक शिस्तीच्या आहेत, तितक्‍याच प्रेमळ आहेत. त्यांनी आमच्यावर घेतलेल्या कष्टामुळेच आज हा पुरस्कार मिळत आहे,’’ अशा भावना यशस्वी सरपोतदार व्यक्त करत होत्या. गाणे थोडे जरी यायला लागले, तरी वेगवेगळी आकर्षणे समोर येऊन उभी राहतात, तरीसुद्धा त्यांना भुलायचे नाही, हे पद्माताईंमुळे शिकता आले, असेही त्या म्हणाल्या.

Web Title: pune news yuva puraskar