मुलीने आयुष्याला वेगळा अर्थ दिला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

तिच्या येण्याने आयुष्यात सकारात्मकता आली. ती सध्या पाचवीत शिकते. ती मोठी होताना तिच्यासोबत एक वेगळेच नाते दृढ होत आहे. मुलगी झाल्याचा पश्‍चात्ताप मुळीच वाटत नाही. उलट तिच्या जन्मामुळे आमचे कुटुंब परिपूर्ण झाले आहे

पुणे - ""आर्या जन्मली तेव्हा अनेकांनी मुलीला जन्म दिला म्हणून खूप काही ऐकवले. पण, आमचा निर्णय ठाम होता. आर्याच्या येण्याने आयुष्य फुलले आणि आयुष्याला अर्थही मिळाला. एक मैत्रीण तर ती आहेच, त्याचबरोबर सामाजिक कार्यात आधार देणारी छोटी समाजसेविकाही आहे. एकुलत्या एका मुलीचा वडील असणे ही जगातील सगळ्यात सुंदर भावना असून, मुली आयुष्याला परिपूर्ण करतात हे आर्यामुळे कळाले,'' अशी भावना मैत्रयुवा फाउंडेशनचे संकेत देशपांडे यांनी व्यक्‍त केली. मुलगी असणे शाप समजला जातो. त्याच समाजात असेही पालक आहेत, ज्यांनी एकुलत्या एका मुलीला जन्म देऊन आयुष्याला वेगळा अर्थ दिला आहे.

मुलगी झाली म्हणून एका आईने आपल्या चिमुकलीलाच बोपोडी येथील नदीपात्रात फेकून दिल्याची घटना नुकतीच घडली. या पार्श्‍वभूमीवर "सकाळ'ने एकुलत्या एका मुलीला जन्म देऊन वेगळी वाट शोधणाऱ्या पालकांची भावना जाणून घेतली. एका मुलीला वाढविताना काय अडचणी येतात, कोणती आव्हाने पेलावी लागतात आणि एक मुलगी जन्माला येण्याने आयुष्यात काय बदल होतो, याविषयी वडील भरभरून बोलले. एक मैत्रीण, एक आधार, एक सावली आणि एक प्रतिबिंब अशा वेगवेगळ्या रूपात मुलगी गवसते आणि आयुष्याला अर्थ देते, असे त्यांचे म्हणणे आहे.

आर्याबद्दल बोलताना मैत्रयुवा फाउंडेशनचे संकेत देशपांडे म्हणाले, ""तिच्या येण्याने आयुष्यात सकारात्मकता आली. ती सध्या पाचवीत शिकते. ती मोठी होताना तिच्यासोबत एक वेगळेच नाते दृढ होत आहे. मुलगी झाल्याचा पश्‍चात्ताप मुळीच वाटत नाही. उलट तिच्या जन्मामुळे आमचे कुटुंब परिपूर्ण झाले आहे. तिला वाढविताना कोणतेही आव्हान पेलावे लागत नाही. दुसऱ्या मुलाची आस कधीच जाणवली नाही. माझ्या सामाजिक कार्यात आर्याचा सहभाग असतोच. तिच्याशी असलेले नाते अव्यक्त असेच आहे.''

स्वरालीचे लग्न झाले अन्‌ मनात हुरहूर होती आता ती कधीतरीच भेटणार; पण, स्वरालीने लग्नानंतरही माझ्याशी तेच मैत्रीचे नाते जपल्याचे राजा नेर्लेकर सांगत होते. नेर्लेकर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील निवृत्त कर्मचारी आहेत. स्वरालीबद्दल ते म्हणाले, ""आपल्याकडे मुलीला धनाची पेटी म्हणून पाहिले जाते. ही मानसिकता साफ चुकीची आहे. एकुलत्या एक मुलीचा वडील असल्याचा मला अभिमान वाटतो. मुलगी जन्माला येण्याबद्दल आपण स्वतःला नशीबवान समजले पाहिजे. मुलगी झाली म्हणून समाजात चाललेल्या अमानुष अत्याचाराला माझा विरोध आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत आपण करायला हवे.''

Web Title: pune news:daughters life