
बाणेर परिसरात १९७७ पासून वृत्तपत्र विक्री करणाऱ्या राजेंद्र पिंगळे यांनी केवळ संसार सावरला नाही तर दोन मुलींना उच्च शिक्षण देत स्वतःच्या पायावर उभे केले.
Success Story : पुण्यातील वृत्तपत्र विक्रेत्याची एक मुलगी संचालक तर दुसरी सहाय्यक उपाध्यक्ष
पुणे - येथील बाणेर परिसरात १९७७ पासून वृत्तपत्र विक्री करणाऱ्या राजेंद्र पिंगळे यांनी केवळ संसार सावरला नाही तर दोन मुलींना उच्च शिक्षण देत स्वतःच्या पायावर उभे केले. आज त्यांची मोठी मुलगी स्नेहल सनदी लेखापाल (सीए) आणि धाकटी मुलगी निकीता कंपनी सेक्रेटरी (सीएस) झाली असून, स्नेहल एका आंतरराष्ट्रीय कंपनीत संचालक पदावर, तर निकीता ब्रिटनच्या एका कंपनीची सहाय्यक उपाध्यक्ष म्हणून रुजू झाली आहे.
याबाबत राजेंद्र म्हणतात, ‘आज वृत्तपत्र विक्रीच्या व्यवसायाला एक सन्मानाने पाहिले जाते. पण मी जेव्हा काम सुरू केले तेव्हा अशी स्थिती नव्हती. कोणताही जोडधंदा नसताना या व्यवसायावर मी माझे कुटुंब चालविले. परिस्थितीशी संघर्ष जरी असला तरी मुलींच्या शिक्षणाकडे मी कधीच दुर्लक्ष केले नाही. मी स्वतः वाणिज्य शाखेचा विद्यार्थी असल्याने मुलींतही ती आवड रुजविली. लहानपणापासूनच त्यांनी या परीक्षांचा ध्यास घेतला होता. आज त्या इतक्या मोठ्या हुद्द्यावर कार्यरत असून, माझ्यासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.’
स्नेहलने बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स तर धाकट्या निकीताने मराठवाडा मित्र मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्याचे राजेंद्र सांगतात. २००१ च्या दरम्यान महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत स्नेहलने डिलाईट या आंतरराष्ट्रीय सीए फर्ममध्ये कामाला सुरवात केली. आता त्याच कंपनीच्या संचालक पदावर ती कार्यरत आहे. तर निकीताला सहाय्यक उपाध्यक्ष म्हणून ७० लाखांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. राजेंद्र यांच्या प्रवासात त्यांची पत्नी प्रीती हिची मोलाची साथ मिळाली आहे.
पालकत्वासंबंधी पिंगळे म्हणतात...
‘मुलगा हवा’ या हव्यासापायी अनेक पालकांना हिणवलं जाते. समाजावरील हा पगडा दूर होण्याची गरज
मुलींना मुलगा समजून वागवा, असे म्हणणे चुकीचे आहे. माझ्या मुली या मुलीच असून, त्यांचे अवकाश ते शोधतील
मुलींना शिकवावे, त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करावे. त्या कधीच कुणावर अवलंबून राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी
मुलींना शिक्षणाबरोबरच करिअर करण्याची संधी द्यावी
वृत्तपत्र व्यावसायात ४५ पावसाळे मी बघितले असून, आजही मी ३०० पेपर टाकतो. माझ्या कष्टाचे चीज मुलींनी केले असून, स्वतः स्वावलंबी बनल्या आहे. त्यांनी आज संपादित केलेले यश माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.
- राजेंद्र पिंगळे