पुणे शहर, जिल्ह्याची मंत्रिपदाची पाटी कोरीच!

गजेंद्र बडे
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

- इच्छुकांची निराशा

- आता मंत्रिमंडळ विस्तारात आशा

पुणे : राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात पुणे शहर व
जिल्ह्याची मंत्रिपदाची पाटी कोरीच राहिली आहे. नवनियुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आज (ता.28) शपथ घेतलेल्या सात मंत्र्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील एकाचीही वर्णी लागली नाही. परिणामी जिल्ह्याची मंत्रिपदाची पाटी सध्यातरी कोरीच राहिली आहे. यासाठी इच्छुक असलेल्या आमदारांना आता दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत वाट पाहावी
लागणार आहे.

जिल्ह्यातील आंबेगावचे आमदार व माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे (सर्व राष्ट्रवादी कॉंग्रेस), भोरचे आमदार संग्राम थोपटे (कॉंग्रेस) आदींची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. परंतु यापैकी नेमक्या किती जणांना संधी मिळेल, हे मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतरच समजू शकणार आहे.

राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. या तीनपैकी शिवसेनेचा शहर व जिल्ह्यात एकही विधानसभेचा आमदार नाही. मात्र, हे तीनही
पक्ष आपापल्या पक्षातील किमान एका व्यक्तीला मंत्रिपदाची संधी देतील, अशी चर्चा केली जाऊ लागली आहे. मात्र, सेनेकडून कोण, याचा अद्यापही उलगडा होत नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तिघेजण अत्यंत इच्छुक आहेत. यापैकी अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. वळसे-पाटील हेही इच्छुक असून, ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्‍वासू मानले जातात. भरणे हे दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आलेले आहेत. शिवाय धनगर समाजातील ते राज्यातील एकमेव आमदार आहेत. त्यामुळे या
समाजाला प्रतिनिधित्व मिळावे, असा एक मतप्रवाह पुढे आला आहे.

कॉंग्रेसचे जिल्ह्यात दोनच आमदार आहेत. त्यापैकी पुरंदरचे संजय जगताप हे पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यामुळे भोरमधून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले संग्राम थोपटे यांच्या नावावर कॉंग्रेसचे एकमत होऊ शकते. या तीनही पक्षांना जिल्ह्यात आपापल्या पक्षाची ताकद वाढवायची
असल्याने, प्रत्येकी किमान एक मंत्री होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

अजित पवार पालकमंत्री

अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रिपदासाठी अडून बसल्याची चर्चा आहे. त्यांचा आजच्या पहिल्या टप्प्यात मंत्री म्हणून शपथविधी होऊ शकला नाही. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी कार्यकर्त्यांना आशा आहे. पवार हे उपमुख्यमंत्री झाले तरी, जिल्ह्याचे पालकमंत्रिही तेच असणार
आहेत. परिणामी पाच वर्षाच्या खंडानंतर पवार पुन्हा एकदा पालकमंत्री बनण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune not get ministry in Thackeray Government till now