सासवडजवळ पूल खचला; पुणे-पंढरपूर मार्गावरील वाहतूक ठप्प

श्रीकृष्ण नेवसे
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

कऱ्हा नदीचें पात्र या विसर्गामुळे अतिशय व्यापक झाले असून राज्यमार्गावरील हा पूल पाण्याखाली गेल्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहनचालकांना केले असल्यामुळे काही वेळानंतर वाहनचालकांनी सासवडच्या दिशेने येणे टाळून दुसरा मार्ग स्वीकारला असल्यामुळे त्यानंतर मात्र वाहतुकीची कोंडी कमी झाली.

सासवड : पुणे-पंढरपूर राज्य मार्गावरील सासवडच्या स्मशानभूमी नजीक असलेल्या कऱ्हा नदीवरील पूल खचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

काल रात्री सासवड व सासवड परिसराच्या पश्चिम भागात सुमारे दोन तास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसाचा जोर इतका प्रचंड होता की रात्री साडे अकरा नंतरच कऱ्हा नदीच्या या मुख्य पुलावरून पाणी वाहत होते. 1967 मध्ये या पुलाची निर्मिती केली होती, त्यानंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी आल्याचे स्थानिकांनी सांगितले. या पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की त्यामुळे हा पूल खचला असेही सांगितले गेले.

हा पूल 10 मीटर रुंद व 15 मीटर लांब असा खचला असून पुण्याहून पंढरपूर कडे व पंढरपूर बारामती हून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी सासवड मार्गे प्रवास करणे टाळावे असे आवाहन सासवडचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी केले आहे.

दरम्यान कऱ्हा नदीला पाणी आल्यामुळे प्रचंड प्रमाणात पूर आलेला असून अनेक वर्षात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात नदीला पाणी आल्याचे अनेकांनी सांगितले.

कऱ्हा नदीचें पात्र या विसर्गामुळे अतिशय व्यापक झाले असून राज्यमार्गावरील हा पूल पाण्याखाली गेल्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहनचालकांना केले असल्यामुळे काही वेळानंतर वाहनचालकांनी सासवडच्या दिशेने येणे टाळून दुसरा मार्ग स्वीकारला असल्यामुळे त्यानंतर मात्र वाहतुकीची कोंडी कमी झाली.मात्र हा पूल खचला असल्यामुळे या पुलावरील संपूर्ण वाहतूक आता पोलिसांनी बंद केली असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा उपयोग करावा असे आवाहन केले आहे. कऱ्हा नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये वसलेले असल्यामुळे शेतीचेही बरेच नुकसान झाले आहे. कऱ्हाकाठच्या लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Pandharpur road closed due to flood on karha river