पुणे-पानशेत रस्त्यावर झालेला 'तो अपघात' नसून कट ;महिला सापडली कोंढव्यात मैत्रीणीकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

पुणे-पानशेत रस्त्यावर झालेला 'तो अपघात' नसून कट ;महिला सापडली कोंढव्यात मैत्रीणीकडे

सिंहगड : 4 नोव्हेंबर रोजी दुपारी महिला मुलाला फोन करून पानशेत जवळील मूळ गावातून घरी येण्यासाठी निघाल्याचे सांगते. रात्री उशीर झाला तरी संबंधित महिला घरी न आल्याने कुटुंबीय व नातेवाईकांकडून शोध सुरू होतो. दुसऱ्या दिवशी पुणे-पानशेत रस्त्यावरील कुरण खुर्द गावच्या हद्दीत अपघातग्रस्त स्थितीत दुचाकी आढळून येते आणि कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकते.

रस्त्यावरुन खाली जाऊन झुडपात अडकलेली दुचाकी व पाण्याजवळ आढळलेली चप्पल पाहून संबंधित महिला पाण्यात बुडाली असावी अशी परिस्थिती दिसून येते. वेल्हे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मनोज पवार व इतर पोलीस कर्मचारी आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाचे जवान दोन दिवस संबंधित ठिकाणापासून पाचशे मीटर पर्यंत पाण्यात शोध घेतात परंतु महिलेचा थांगपत्ता लागत नाही. सोबतच महिलेचे कुटुंबीय व नातेवाईकांचा आक्रोश सुरू असतो.

दरम्यान अपघाताचे ठिकाण, दुचाकी व चप्पल यांची बारकाईने पाहणी केल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीलाच हा काहीतरी वेगळा प्रकार असावा असा संशय व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने तपास करत असताना गोपनीय बातमीदार व तांत्रिक तपासातून संबंधित महिला कोंढवा येथे असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांना मिळाली. महिला जीवंत असल्याचे कळताच कुटुंबीयांना धीर आला. कौटुंबिक वादातून संबंधित महिलेने हे कृत्य केल्याचे पवार यांनी सांगितले मात्र त्यामुळे पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान नाहक भर थंडीत कुडकुडत तिचा शोध घेण्यात अडकून पडले होते.