पार्किंगमुळे सोसायट्या मालामाल 

शनिवार, 14 एप्रिल 2018

आपल्या सोसायटीत पार्किंगचा प्रश्‍न असेल तर सोसायटी काय उपाययोजना करते, याची माहिती "सकाळ'ला webeditor@esakal.com या ई-मेलवर कळवा. प्रातिनिधीक अनुभवांची दखल घेऊन वाचकांसमोर मांडण्यात येईल. माहिती पाठविताना सोसायटीचे नाव, पत्ता, पदाधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक आदी तपशील आवर्जून पाठवावा.

पुणे - गृहरचना सोसायट्यांत कार पार्कसाठी जागा पुरत नसल्यामुळे खुली जागा सोसायटीच्या सदस्यांना दरमहा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचा "ट्रेंड' आता लोकप्रिय होऊ लागला आहे. त्यातून पार्किंगचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटत असून सोसायट्यांनाही उत्पन्नाचे हमखास साधन मिळत आहे. यातून सोसायट्यांना खर्चासाठी अतिरिक्त रक्कम हाती येत आहे. 

शहरात गृहरचना सोसायट्यांची संख्या आता जवळपास 25 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. त्यातील अनेक सोसायट्या सुमारे 15 वर्षांपूर्वीच्या आहेत. त्या वेळी पार्किंग विकत घेणे, ही बाब ऐच्छिक होती. त्यामुळे अनेक सोसायट्यांत प्रती सदनिका एक कार पार्किंग उपलब्ध आहे. मात्र, आता अनेक सोसायट्यांत एक कुटुंबात एकापेक्षा जास्त मोटारी आहेत. त्यामुळे या कार उभ्या कोठे करायच्या, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यावरून वाद, भांडणे नेहमीचेच होऊ लागली आहेत. वानवडीत गेल्या महिन्यात पार्किंगवरून खून झाला. त्यामुळे अनेक सोसायट्यांनी त्यांच्या आवारातील खुल्या जागा पार्किंगसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा फंडा राबविण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी लिलाव, लॉटरी आदींचा अवलंब केला जातो. त्यातून मिळणारे उत्पन्न सोसायटीसाठी वापरले जाते. तसेच सदस्यांना विशिष्ट जागी कार पार्क करण्यासाठी जागा उपलब्ध होते. काही सोसायट्यांत सदस्यांनी पैसे भरण्यास नकार दिला तर, ती रक्कम त्या सदनिका धारकांच्या नावावर थकबाकी म्हणून दाखविली जाते. 

नव्या सोसायट्यांत पार्किंग "मस्ट' 
गेल्या सात - आठ वर्षांत उभ्या राहिलेल्या सोसायट्यांत पार्किंगचा फारसा प्रश्‍न भेडसावत नाही. दोन किंवा तीन खोल्यांच्या सदनिकेसाठी दोन कारसाठी पार्किंग उपलब्ध करून दिले जाते. विकास नियंत्रण नियमावलीतही त्यासाठी भरघोस तरतूद करण्यात आली आहे. नवी सदनिका घेताना आता ग्राहकही पहिल्यांदा पार्किंगचाच विचार करतो. परिणामी बहुतेक नव्या सोसायट्यांत पार्किंगची फारशी समस्या नाही. 

मध्यभागात प्रश्‍न कायम 
शहराच्या मध्यभागात मोठ्या सोसायट्या नाहीत. वाड्यांतील रहिवाशांकडेही आता मोटारी आल्या आहेत. पार्किंग नसल्याने त्यांना त्या रस्त्यावर उभ्या कराव्या लागतात. त्यातही अनेकदा वाद-विवाद, भांडणे होतात. रस्त्यावर मोटार उभी करतानाही नागरिकांना पी-1, पी-2 मुळे मोटार लावण्याची जागा दररोज बदलावी लागते. काही ठिकाणी एखाद्या इमारतीत पार्किंग उपलब्ध असेल तर, ते भाडेतत्त्वावर घेण्याचाही पर्याय अवलंबविला जातो. त्यासाठीही प्रती मोटार दरमहा 300 ते 900 रुपये शुल्क देखभाल आकारले जाते. 

विविध सोसायट्यांचे फंडे 

1 - लेकटाऊन सोसायटी, कात्रज - 34 इमारती 1278 फ्लॅट - 95 मोटारींच्या पार्किंगसाठी खुली जागा उपलब्ध करून दिली. दरमहा प्रती मोटार एक हजार रुपये शुल्क. 
- व्हिजिटर पार्किंगमध्ये सदस्याने मोटार लावल्यास 300 रुपये दंड, दुचाकीसाठी 100 रुपये दंड. 
- व्हिजिटरर्सला पार्किंग 24 तास फ्री, त्यानंतर प्रती दिन 300 रुपये शुल्क 

2 - गंगाधाम फेज फेज 2, बिबवेवाडी - 20 इमारती 738 फ्लॅट - खुली जागा 650 रुपये दराने भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव मंजूर , एलिव्हेटेड पार्किंगसाठी प्रयत्न सुरू 

3 - गगन गॅलेक्‍सी, बिबवेवाडी - 5 इमारती 220 फ्लॅट - 75 मोटारींसाठी खुली जागा उपलब्ध. प्रती मोटार 500 रुपये शुल्क. 

4 - गंगाधाम फेज 1, बिबवेवाडी - 406 सदनिका, खुली जागा पार्किंगसाठी देण्याचा ठराव सर्वसाधारण सभेपुढे 

5 - गुरुगणेश सोसायटी, कोथरूड - खुली जागा पार्किंगसाठी 300 रुपये प्रती मोटार दराने उपलब्ध 

6 - स्वागत रेसिडेन्सी, कोथरूड - खुली जागा 500 रुपये प्रती मोटार दराने उपलब्ध 

7 - स्वप्नशिल्प सोसायटी, कोथरूड - 484 सदनिका, - खुली जागा 800 रुपये दरमहा दराने उपलब्ध. 
व्हिजिटर्स पार्किंगमध्ये सदस्यांनी मोटार लावल्यास 100 रुपये दंड 
9 - वर्धमानपुरा सोसायटी, बिबवेवाडी - व्हिजिटर पार्किंगमध्ये सदस्याने मोटार लावल्यास 200 रुपये दंड. दुचाकीसाठी 50 रुपये दंड 

आपल्या सोसायटीत पार्किंगचा प्रश्‍न असेल तर सोसायटी काय उपाययोजना करते, याची माहिती "सकाळ'ला webeditor@esakal.com या ई-मेलवर कळवा. प्रातिनिधीक अनुभवांची दखल घेऊन वाचकांसमोर मांडण्यात येईल. माहिती पाठविताना सोसायटीचे नाव, पत्ता, पदाधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक आदी तपशील आवर्जून पाठवावा.

Web Title: Pune parking Society issue