#PuneFlood पुणे-पिंपरी-चिंचवड कनेक्टेड 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

मुळा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे सोमवारी पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांना जोडणारे औंध परिसरातील पाच पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले.

पुणे - मुळा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे सोमवारी पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांना जोडणारे औंध परिसरातील पाच पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. मात्र, मंगळवारी पहाटेपासून पावसाने उघडीप दिल्याने नदीतील पाण्याची पातळी कमी झाली. त्यामुळे सर्व पूल सकाळपासून वाहतुकीसाठी खुले करण्यात आल्याने कामासाठी ये-जा करावे लागणाऱ्या लाखो नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला.

पूल बंद असल्याचा परिणाम सोमवारी पुण्यातील वाहतुकीवरदेखील झाला होता. त्यामुळे अनेक रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली होती. मात्र मंगळवारी पुलालगतच्या रस्त्यांवरील पाणी ओसरल्याने वाहतुकीची कोंडी फुटली. सोमवारी महत्त्वाचे पूल बंद झाल्याने दोन्ही शहरांमध्ये नोकरी, उद्योग, व्यवसायानिमित्त दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली होती. 

बहुतांश नोकरदारांना औंधमधील राजीव गांधी पुलासह अन्य पुलांजवळूनच माघारी फिरावे लागले होते; तर काही नागरिकांनी बोपोडी व बालेवाडी येथील पुलावरून इच्छितस्थळी जाण्यास प्राधान्य दिले. मात्र त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर कमी झाल्याने मंगळवारी पहाटेपासून मुळा नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली. त्यानंतर औंध परिसरातील पुलांभोवती जमा झालेले पाणी ओसरले. त्यामुळे चतुःशृंगी वाहतूक विभागाने मंगळवारी सकाळी लवकरच औंधमधील राजीव गांधी पूल, महादजी शिंदे पूल, जुनी सांगवी पूल वाहतुकीसाठी खुला केले. त्याचबरोबर पिंपळे-निलख-बाणेरला जोडणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूल व बोपोडी येथील वि. भा. पाटील रस्त्याजवळील पूलही खुला करण्यात आला आहे. 

जुना होळकर पूल बंदच
खडकी येथील ब्रिटिशकालीन होळकर पूल वाहतुकीसाठी अद्यापही बंद ठेवण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पूल बंद असून, तेथे खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या अग्निशामक दलाचे कर्मचारी तैनात असल्याची माहिती बोर्डाचे आरोग्य अधीक्षक बी. एस. नाईक यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune pcmc connected