पोलिसांच्या कामगिरीवर पुणेकर खूष

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

शहरातील पोलिस ठाण्यांना वेगवेगळ्या कामानिमित्त गेल्या ११ महिन्यांत भेट देणाऱ्या एक लाख नऊ हजार नागरिकांपैकी लाखभर नागरिक पोलिसांच्या कामगिरीवर खूष असून, केवळ ३४ नागरिक असमाधानी असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. पोलिस कर्मचाऱ्यांबरोबरच विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने पोलिस ठाण्यांना भेटी देणाऱ्यांकडे विचारणा केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

पुणे - शहरातील पोलिस ठाण्यांना वेगवेगळ्या कामानिमित्त गेल्या ११ महिन्यांत भेट देणाऱ्या एक लाख नऊ हजार नागरिकांपैकी लाखभर नागरिक पोलिसांच्या कामगिरीवर खूष असून, केवळ ३४ नागरिक असमाधानी असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. पोलिस कर्मचाऱ्यांबरोबरच विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने पोलिस ठाण्यांना भेटी देणाऱ्यांकडे विचारणा केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

पुणे पोलिस आयुक्तालयांतर्गतच्या सर्व पोलिस ठाण्यांना दररोज भेटी देणाऱ्या नागरिकांची नोंदणी व्हावी, त्यांचे प्रश्‍न सुटावेत, यासाठी पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी एक सप्टेंबर २०१८ पासून ‘सेवा ॲप’ सुरू केले. पोलिस ठाण्यास भेट देणाऱ्या प्रत्येक नागरिकाची नोंद घेऊन दुसऱ्या दिवशी त्यांना फोन करून प्रश्‍न सुटला का? याबाबत नियंत्रण कक्षातील पोलिसाला विचारणा करण्यात आली.

नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवायोजनेतील विद्यार्थ्यांचीही मदत घेण्यात आली. या विद्यार्थ्यांनी २८ हजार नागरिकांशी फोनद्वारे संपर्क साधून त्यांच्या प्रश्‍नांबाबत विचारणा केली. संबंधित विद्यार्थ्यांशी अपर पोलिस आयुक्त सुनील फुलारी, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांनी सोमवारी संवाद साधून त्यांच्या अनुभवांची नोंद घेतली.

पोलिस ठाण्याला भेटी देणाऱ्या प्रत्येक नागरिकाची सेवा कार्यप्रणालीमध्ये नोंद घेतली जाते. दुसऱ्या दिवशी त्यांना फोन करून त्यांचा प्रश्‍न सुटला आहे का? याची विचारणा केली जाते. त्यामध्ये बहुतांश नागरिक समाधानी असल्याचे स्पष्ट झाले. केवळ ३२ नागरिक असमाधानी असून, त्यांच्या तक्रारी अन्य विभागांशी निगडित आहेत.
- सुनील फुलारी, अपर पोलिस आयुक्त

डेक्कन पोलिस ठाण्यास भेट दिलेल्या २०० लोकांशी मी फोनद्वारे संपर्क साधला. त्यापैकी बहुतांश नागरिक समाधानी होते. एक-दोन जण असमाधानी होते. परंतु, त्यांचेही काम पोलिसांच्या प्रक्रियेमध्ये होते.
- शिवानी मुळे, विद्यार्थिनी, आबासाहेब गरवारे महाविद्यालय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune People Happy on Police Service Work