पुणेकरांना घेता येणार जंगलाची अनुभूती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जानेवारी 2017

भांबुर्डा, हिंगणे, पाचगाव पर्वती, वारजे येथे लवकरच साकारणार नागरी वन उद्याने

पुणे - वनक्षेत्रातील अतिक्रमण रोखण्याबरोबरच शहरवासीयांना जंगलाची अनुभूती मिळावी, या उद्देशाने शहरात नव्याने चार नागरी वन उद्याने साकारण्यात येणार आहेत. वनक्षेत्रातील पर्यटनस्थळांचा विकास आणि इको टुरिझम या योजनेतंर्गत भांबुर्डा, हिंगणे, पाचगाव पर्वती, वारजे (सर्व्हे क्र. १२०) येथे ही वनउद्याने साकारण्यात येत आहेत. येत्या दोन वर्षात या उद्यानांची कामे पूर्ण होतील.

आधुनिक काळातही माणसाचे जंगलाशी नाते टिकून राहावे आणि लोकसहभागातून वनसंवर्धन व्हावे, या उद्देशाने वन विभागाने ‘नागरी वन उद्यान’ हा प्रकल्प शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राबविण्याचे ठरविले आहे. जून २०१५ मध्ये याची सुरवात झाली पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सुमारे दोनशे हेक्‍टर राखीव वनक्षेत्रातील ओसाड जागेवर वन उद्यान साकारून वनसंपत्ती समृद्ध करण्याचा प्रकल्प हाती घेणार असल्याचे वन विभागाने त्या वेळी जाहीर केले होते. याच शृंखलेतील वारजे आणि आनंदवन ही दोन उद्याने उभारली आहेत.

याविषयी ‘सकाळ’शी बोलताना वनपरिक्षेत्र अधिकारी (भांबुर्डा) रूपलग-पुंडे म्हणाल्या, ‘‘गेल्या अनेक वर्षांपासून हिंगणे परिसरात अतिक्रमण होत आहे. मागील वर्षात वनक्षेत्रातील ६०-७० झोपड्यांचे अतिक्रमण हटविले होते. आता वनक्षेत्रात सीमाभिंत बांधण्याचे काम हाती घेतले आहे. येत्या पावसाळ्यात येथे सुमारे एक हजार देशी वृक्षांची लागवड केली जाईल. ‘कॅम्पा’अंतर्गत वारजे येथील वन उद्यानासाठी ६० लाख रुपये, तर पाचगाव पर्वतीसाठी दोन लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.’’

उद्यानांची वैशिष्ट्ये
प्रवेशद्वार, माहिती फलक
निसर्ग तलाव
फिरण्यासाठी निसर्ग पायवाट
देशी वृक्षांची लागवड 
सौरदिवे, पर्यटकांसाठी पॅगोडा‘

डीपीडीसी’नुसार निधी मंजूर
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वनक्षेत्रातील पर्यटन स्थळांचा विकास (डीपीडीसी) यानुसार आता हिंगणे आणि भांबुर्डा येथे उद्यान विकसित करण्यात येणार आहे. यासाठी अनुक्रमे ५० लाख आणि ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याशिवाय ‘कॅम्पा इको टुरिझम’मध्येही नागरी वन उद्यान प्रकल्प आहे. यासाठी हिंगणे येथील १७ हेक्‍टर परिसरात विस्तारलेल्या छोट्या टेकडीवरील जागा निवडली आहे.

‘स्मार्ट सिटी’ योजनेअंतर्गत देशातील काही मोजक्‍या शहरांमध्ये ‘नागरी वन उद्यान’ योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. त्यात पुण्याचाही समावेश आहे. त्यानुसार पाचगाव पर्वती आणि वारजे (सर्व्हे नंबर १२०) येथील छोट्या टेकड्यांवर वन उद्याने साकारण्यात येईल.
- देवयानी रूपलग-पुंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, भांबुर्डा 

Web Title: pune people will take cognizance forest