कष्टकऱ्यांची पत निर्माण करा - डॉ. बाबा आढाव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

पुणे - ""छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणाऱ्या महाराष्ट्रात सामाजिक सुरक्षा कायदा होतो; परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे,'' अशा शब्दांत कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी सोमवारी खंत व्यक्त केली. या कायद्याची अंमलबजावणी करून कष्टकऱ्यांची पत निर्माण करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बॅंकेतर्फे डॉ. आढाव यांना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते "पुणे पीपल्स पुरस्कार' प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी डॉ. रामचंद्र देखणे, बॅंकेचे अध्यक्ष ऍड. सुभाष मोहिते, शीला आढाव, उपाध्यक्ष बबनराव भेगडे, नगरसेविका मुक्ता टिळक आदी मान्यवर उपस्थित होते. एक लाख एक हजार, सन्मानपत्र, फुले पगडी आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. 

राजवट बदलली, घोषणाही खूप झाल्या, असे सांगून डॉ. आढाव म्हणाले, ""या देशात सर्वांना मत आहे; पण कष्टकऱ्यांना पत नाही. पत नसेल तर लोकशाही कशी टिकणार? रोजगार हमी, माथाडी कामगार कायदा असे अनेक कायदे महाराष्ट्राने देशात पहिले स्वीकारले. त्याच महाराष्ट्रात सामाजिक सुरक्षा कायदा होतो; परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. कष्टकऱ्यांना पत मिळवून देणाऱ्या कायद्यावर आपण सर्वजण बोलतो, मग एवढी उपेक्षा का? विचार करतो, असे सांगणारे सरकार किती दिवस विचार करणार? देशमुख यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा.'' 

त्यावर सहकारमंत्री देशमुख म्हणाले, ""कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची पत निर्माण कशी होईल, यासाठी आपण प्रयत्न करू.'' या वेळी देखणे यांचे भाषण झाले. मोहिते यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर "मराठी बाणा' हा कार्यक्रम झाला. 

बॅंकेने रुग्णालय सुरू करावे 
बॅंकेचे कौतुक करून सुभाष देशमुख म्हणाले, ""सर्वसामान्य नागरिकांना सरकारी दवाखान्यात चांगले उपचार मिळत नाहीत. खासगी रुग्णालय परवडत नाही. त्यामुळे बॅंकेने पुढाकार घेऊन सहकारी तत्त्वावर रुग्णालय सुरू करावे. त्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा द्यावी. त्यासाठी बॅंकेचे खातेदार आणि ठेवीदारही सहकार्य करतील, अशी अपेक्षा आहे.'' 

Web Title: Pune People's Award