
‘पीएमपी’च्या चार कंत्राटदारांनी सुरू केलेला संप सोमवारी रात्री अखेर मागे घेतला.
PMP Bus : संप मिटला अन् पीएमपी बस धावल्या
पुणे - ‘पीएमपी’च्या चार कंत्राटदारांनी सुरू केलेला संप सोमवारी रात्री अखेर मागे घेतला. पीएमपी प्रशासनाने थकीत बिलापोटी ६६ कोटीची रक्कम अदा केल्यानंतर कंत्राटदारांनी हा संप मागे घेत असल्याची घोषणा केली. दोन दिवस चाललेल्या संपात सुमारे आठ लाख प्रवाशांना फटका बसला. उर्वरित रक्कमही लवकरच देण्याची हमी पीएमपी प्रसशासाने दिली. मंगळवारपासून ‘पीएमपी’ची बस सेवा सुरू झाली. मात्र, मंगळवारी शासकीय सुट्टी होती. परिणामी प्रवासी संख्या कमी असल्याने पीएमपीची बस संख्या कमी होती. बुधवारपासून मात्र पूर्ण क्षमतेने बस सेवा सुरू राहणार आहे. संप मिटल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.
पीएमपीच्या चार कंत्राटदारांचे चार महिन्यांचे ९९ कोटी रुपयांचे बिल थकल्याने रविवारी दुपारपासून संप सुरू झाला. संपात सुमारे ९०७ बस सहभागी झाल्याने रविवारी व सोमवारी मोठ्या प्रमाणात पीएमपीची प्रवासी सेवा बाधित झाली. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेने सोमवारी ९० कोटी रुपये पीएमपी प्रशासनाला दिले. यात पुणे महापालिकेने ५४ कोटी तर पिंपरी चिंचवड महापालिकेने ३६ कोटी रुपये दिले. त्यापैकी कंत्राटदारांचे ६६ कोटी रुपये देण्यात आले. तर २४ कोटी रुपये हे ‘एमएनजीएल’चे देण्यात येणार आहे. कंत्राटदारांचे नोव्हेंबर ते फेब्रुवारी असे चार महिन्यांचे बिल थकले होते. पैकी नोव्हेंबर ते जानेवारी असे तीन महिन्यांचे बिल सोमवारी देण्यात आले. संपात ओलेक्ट्रा, ट्रॅव्हल टाइम, अँथनी व हंसा या चार कंत्राटदारांनी सहभाग नोंदविला होता.
वेतन थकल्याने चार कंत्राटदारांनी संप केला होता. सोमवारी थकीत रकमेतील ६६ कोटी रुपये देण्यात आले. मंगळवारपासून बससेवा पूर्ववत झाली.
- ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे
राजकीय नेत्यांच्या भेटी
‘पीएमपी’ची बससेवा पूर्ववत व्हावी याकरिता सोमवारी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ‘पीएमपी’चे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांची भेट घेऊन चर्चा केली. यात आमदार रवींद्र धंगेकर, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, संतोष नांगरे आदीनीही भेट घेऊन संपावर तोडगा काढण्याची मागणी केली होती.