एक.. दोन.. तीन... दे धक्का!

PMP
PMP

चिंगे, अगं थांब, थांब. पीएमपीची बस दिसली की लगेच त्यात शिरायची घाई करू नकोस. आधी त्यात चालक आहे का ते बघ. हल्ली पुण्यात चालकाविना बस धावू लागल्या आहेत, म्हणून म्हटलं. युरोपीय देशांत चालकांविना गाड्या चालविण्याचे प्रयोग केले जात आहेत, त्याचाच हा एक भाग तर नसेल ना, अशी मला शंका आहे. कारण पुण्यात प्रयोग वगैरे काही नसतं. थेट अंमलबजावणीच असते. 

या सगळ्यावरून पुण्यात मेट्रोआधीच चालकाविना बसगाड्या धावू लागतील की काय, अशी शंका घेण्यास वाव आहे. 

चिंगे, पीएमपीच्या प्रवासाची तू पूर्वतयारी केली आहेस ना? अशी वेड्यासारखी माझ्याकडे काय पाहतेस? अगं चंद्रावर जाण्याच्या पूर्वतयारीविषयी मी बोलत नाही. अर्थात, एक वेळ चंद्रावर जाणं सोप्पंय, हे तुला पीएमपीतून प्रवास केल्यानंतर लक्षात येईलच.

बसमधून प्रवास करायचा असल्यास तुला आधी धावण्याचा सराव केला पाहिजे. बस कधीही थांब्याजवळ थांबत नसते. एकतर ती मागे किंवा पुढे थांबत असते. अशावेळी धावण्याचा सराव उपयोगी पडतो. पुणेकरांनी धावण्याचा व्यायाम करावा, यासाठीच पीएमपी प्रशासनाने ही सोय केली आहे.  

चिंगे, त्यानंतर तू ढकलण्याचा सराव कर. अगं पीएमपीची बस रस्त्यात कोठेही आणि केव्हाही बंद पडू शकते, त्या वेळी प्रवाशांनाच ही बस ढकलावी लागते. आयुष्यातील संकटे, ही अशीच ढकलून पुढे रेटावी लागतात, याचा धडा पुणेकरांना मिळावा, यासाठी ही सोय असते. 

आता या साऱ्या गोष्टींची तयारी झाल्यानंतर कंडक्‍टर नावाच्या हल्ल्याला तोंड देण्यास सज्ज राहा. सुट्या पैशांवरून वा इतर किरकोळ कारणावरून त्याचे खेकसणे, आवाज चढवून बोलणे या गोष्टीला संयमाने सामोरे जाण्यास शिक. ते एकदा जमले, की खासगी आयुष्यातही तुझ्यात संयम हा गुण वाढीस लागेल. 

बसमध्ये एकदा बसल्यावर चालक अधून-मधून करकचून ब्रेक दाबत असतो, त्यामुळे धक्के सहन करायला शिक. पीएमपीमध्ये धक्के खाल्ल्यानंतर भावी आयुष्यातील धक्के खाणे एकदम सुकर होऊन जाते, याचा धडा मिळण्यासाठीच हे सगळे घडवले जाते.      

चिंगे, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बसमध्ये शिरण्याआधी आगीपासून संरक्षण करण्याचे प्रशिक्षण घेतले आहेस का? अगं कशाला म्हणून काय विचारतेस? पीएमपीच्या बसला रस्त्यात कधीही आग लागते, हे तुला माहिती नाही का? त्यामुळे चिंगे, सगळी तयारी झाली असेल, तरच ‘पीएमपी’मधून प्रवास कर. 
काय समजले... दे धक्का !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com