Pune PMPML : ‘क्यूआर कोड’चा १५०० प्रवाशांकडून वापर ;‘ पहिल्या दिवशी घेतला लाभ; पालकमंत्र्यांच्या हस्ते सेवेचे लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pmpml

Pune PMPML : ‘क्यूआर कोड’चा १५०० प्रवाशांकडून वापर ;पहिल्या दिवशी घेतला लाभ; पालकमंत्र्यांच्या हस्ते सेवेचे लोकार्पण

पुणे - क्यूआर कोड’चा वापर करून पहिल्याच दिवशी सुमारे १५०० प्रवाशांनी ‘पीएमपी’ने प्रवास केला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवारी (ता. १) दुपारी या सेवेचे लोकार्पण करण्यात आले. येत्या काही दिवसांत क्यूआर कोडने तिकीट काढणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होईल, असा अंदाज ‘पीएमपी’ने व्यक्त केला.

गेल्या अनेक दिवसांपासून पीएमपी प्रशासनाने डिजिटल व्यवहार सुरू करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. आता क्यूआर कोडमुळे प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी सुटे पैसे बाळगण्याची गरज नाही. सेवेच्या लोकार्पणानंतर दुपारी साडेतीनपर्यंत ९३१ प्रवाशांनी क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट काढले. यातून २६ हजार ७४३ रुपयांचे उत्पन्न मिळाले. रात्रीच्या सत्रात सुमारे ५०० तिकिटे काढण्यात आली.

यातून सुमारे १४ हजारांचे उत्पन्न मिळाले. कोथरूडच्या डेपोत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘पीएमपी’चे अध्यक्ष डॉ. सचिंद्र प्रताप सिंह, सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार, माजी नगरसेवक गणेश वरपे, नवनाथ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. डिजिटल व्यवहाराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यासाठी आग्रह आहे. ‘पीएमपी’ने सुरू केलेली कॅशलेस तिकिटाची सुविधा चांगली आहे. एकाच तिकिटातून प्रवाशांना पीएमपी आणि मेट्रोने प्रवास करता यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’’

गेल्या तीन महिन्यांपासून ‘पीएमपी’ नागरिकांना चांगली सुविधा देण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करत आहे. याबाबत पालकमंत्र्यांनीही दोन वेळा आढावा घेतला. अनेक प्रवाशांनी कॅशलेस पेमेंटद्वारे तिकीट मिळण्याची मागणी केली होती. ती आता पूर्ण झाली आहे.

डॉ. सचिंद्र प्रताप सिंह, अध्यक्ष, पीएमपीएमएल