लष्कर भागात खंडणीखोरांचा धुमाकुळ; चौघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

पुणे : लष्कर भागात खंडणीखोरांनी दुकानांमध्ये घुसून तोडफोड केली. खंडणी न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याने व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. 
 

पुणे : लष्कर भागात खंडणीखोरांनी दुकानांमध्ये घुसून तोडफोड केली. खंडणी न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याने व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. 

आदित्य उर्फ मन्या भोसले(28,रा.भवानी पेठ), सुशील दिनेश भडकवाल (27,भवानी पेठ), संतोष उर्फ बाळा रघुनाथ गायकवाड (35,रा.मोदीखाना), डेनलील डिक्रुज जोन्स (35,रा.भवानी पेठ) यांना अटक केली आहे. आनंद गुलाब जवारे (वय 43, रा, गुलटेकडी) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवारे यांचे लष्कर परिसरात न्यूयॉर्क वाईन्स नावाचे दुकान आहे. मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास चौघे दुकानात आले. ''दोन लाख रूपये खंडणी दे नाही तर, ठार मारेन'' अशी धमकी दिली. त्यावेळी सिमेंटचा ब्लॉक दुकानातील काचेच्या रॅकवर मारून 1 लाख 10 हजाराचे नुकसान केले. त्यानंतर क्‍लासिक स्क्वेअर सोसायटीतील प्रतिक धनराज जैन यांच्या दुकानात ही तोडफोड करून खंडणी मागितली. तुकाराम कुंभार यांच्याही दुकानात घुसून त्यांच्यावर कोयता उगारून पैसे मागितले. तसेच ''राहुल रॉयचा मॅटर क्‍लोज कर, नाहीतर मारुण टाकीन'' अशी धमकी देत मारहाण केली. त्याच प्रमाणे आणखी दोन दुकानात खंडणी मागितली आहे. 

भर दिवसा हातामध्ये कोयते घेऊन व्यापाऱ्यांना खंडणी मागण्याचे प्रकार घडल्याने या परिसरात दहशत निर्माण झाली आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी या चौघांना अटक केली. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक वर्षा शिंदे करत आहे.

Web Title: Pune Police booked Four for extortion in Cantonment area

टॅग्स